गोवा सरकारने घेतला नवीन एसओपी लागू करण्याचा निर्णय: आरोग्यमंत्री विश्वजित राणे

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे आणि विमानांच्या बाबतीत सरकारने नवीन एसओपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.

पणजी: देशाची राजधानी दिल्ली येथे गेल्या कित्येक दिवसांपासून कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्यामुळे रेल्वे आणि विमानांच्या बाबतीत सरकारने नवीन एसओपी लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाची स्थिती दिल्ली येथे वाढणाऱ्या रुग्णांमुळे भविष्यात अधिक बिकट होऊ नये म्हणून हा निर्णय घेतला असून याबाबतची माहिती आरोग्य खात्याला दिली आहे. 
आता राज्यात महाराष्ट्राप्रमाणे एसओपी असणार आहे. राज्यात दिल्ली येथून येणाऱ्या लोकांच्या बाबतीत आता वेगळी नियमावली ठरविण्यात येणार आहे. छठ पूजा झाल्यानंतर राज्यात मोठ्या प्रमाणात कामगार येतात. त्यामुळे राज्यातील उद्योगांसाठीसुद्धा नवीन शिष्टाचाराची नियमावली असणार असल्याचे आरोग्यमंत्री म्हणाले. 

उत्तर आणि दक्षिण गोव्यातील कोविड इस्पितळांमध्ये उपचारासाठी पुरेशी जागा शिल्लक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तर गोव्यात खाटांची संख्या २७५ इतकी असून सध्या २०२ खाटा वापरासाठी उपलब्ध आहेत, तर दक्षिण गोव्यात २३२ इतकी खाटांची संख्या असून सध्या २१६ खाटा उपलब्ध आहेत.

आज दिवसभरात ८९ लोकांनी गृह अलगीकरणाचा पर्याय स्वीकारला, तर ४८ लोकांना इस्पितळात उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. आज दिवसभरात अठराशे पन्नास इतके लाळेचे नमुने तपासण्यात आले.
माहितीनुसार, डिचोली आरोग्य केंद्रात ३२, म्हापसा आरोग्य केंद्रात ५२, पणजी आरोग्य केंद्रात ८४, चिंबल आरोग्य केंद्रात ४५, पर्वरी आरोग्य केंद्रात ८६, मडगाव आरोग्य केंद्रात ९०, कुडतरी आरोग्य केंद्रात १९, फोंडा आरोग्य केंद्रात ९९ रुग्ण, वास्को आरोग्य केंद्रात ७५ रुग्ण इतके कोरोनाचे रुग्ण उपचार घेत असून राज्यात इतर ठिकाणीही रुग्ण आहेत.

आणखी वाचा:

संबंधित बातम्या