म्हादईप्रश्नी पुढील तारीख का मागितली नाही? मुख्यमंत्री सावंतांचा वकिलांवर पलटवार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 2 फेब्रुवारी 2021

विरोधी पक्षांकडून सरकारने म्हादई विकल्याचा आरोप केला जात असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

पणजी : म्हादई नदीच्या निवाड्यासंदर्भात विरोध करू नका, अशी कोणतीही सूचना वकिलांना सरकारने केलेली नव्हती. आपल्याकडे सरकारची सूचना नसल्याने पुढील तारीख मागणे वकिलांच्या हाती होते, तसे त्यांनी का केले नाही, अशी विचारणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी येथे केली.सरकारने म्हादईसंदर्भातील निवाड्यास लवादासमोर विरोध करू नका, असे कळवल्याने विरोध केला नाही, असे म्हादईची बाजू मांडणाऱ्या वकीलांनी जाहीर केल्यानंतर हा वाद सुरू झाला आहे.

विरोधी पक्षांकडून सरकारने म्हादई विकल्याचा आरोप केला जात असून विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांना आज सायंकाळी विचारले असता ते म्हणाले, वकिलांना लेखी स्वरुपात सूचना दिली जाते. त्या सुनावणीवेळी जलसंपदा खात्याचे तीन अधिकारी तेथे उपस्थित होते. सरकारने विरोध करू नका असे वकिलांना सांगितले नव्हते.

अद्याप हा विषय सर्वोच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. विरोधी पक्षनेते कामत यांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. सर्वोच्च न्यायालयात गोव्याची बाजू मांडणारे वरिष्ठ वकील ॲड. अरविंद दातार यांनी सरकारचा सल्ला घेऊनच म्हादई जलतंटा लवादाचा निवाडा अधिसूचित करण्यास विरोध केला नव्हता हे उघड केल्याने, भाजप सरकारने आई म्हादईचा विश्वासघात केल्याचे उघड झाले आहे. 

संबंधित बातम्या