जिल्हा पंचायतीची निवडणूक १२ डिसेंबरला होण्याची शक्यता

दैनिक गोमंतक
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

सरकारने या अधिकाराचा वापर करत १२ डिसेंबर रोजी निवडणूक घेता येईल, असे आयोगाला कळवले आहे. सरकारने नाताळपूर्वी निवडणूक घेण्याचे ठरवले आहे.

पणजी: जिल्हा पंचायतीची निवडणूक १२ डिसेंबरला होण्याची शक्यता आहे. कोविड टाळेबंदीआधी जिल्हा पंचायत निवडणुकीची प्रक्रिया प्रचाराचा टप्पा संपल्यानंतर स्थगित केली होती. नाताळपूर्वी (ता.२५ डिसेंबर) जिल्हा पंचायत निवडणूक घेण्याचा सरकारचा विचार आहे. कायदा सुव्यवस्था, कर्मचाऱ्यांची उपलब्धता, मतदान केंद्रांची स्थिती आदी विषय राज्य सरकारच्या अखत्यारीत येत असल्याने सरकार निवडणुकीची संभाव्य तारीख कळवत असते. त्यामुळे सरकारने या अधिकाराचा वापर करत १२ डिसेंबर रोजी निवडणूक घेता येईल, असे आयोगाला कळवले आहे. सरकारने नाताळपूर्वी निवडणूक घेण्याचे ठरवले आहे.

विश्वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजप आणि सरकार यांच्यात या निवडणुकीविषयी चर्चा झालेली आहे. निवडणुकीविषयी अधिसूचना जारी झाल्यानंतर प्रचारासाठी पुरेसा वेळ नाही, असे कारण पुढे करून कोणीतरी न्यायालयात दाद मागेल तर पुढे काय? याचाही विचार करण्यात आला आहे. १२ डिसेंबर रोजी शनिवार असल्याने त्या दिवशी निवडणूक घेण्याची शिफारस सरकारकडून राज्य निवडणूक आयोगाला करण्यात आली आहे. 

४८ मतदारसंघात निवडणूक
पक्षीय पातळीवर ही निवडणूक लढवली जात आहे. राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघासाठीची पूर्ण तयारी केलेली आहे. मात्र, ४८ मतदारसंघासाठी ही निवडणूक होणार आहे. सांकवाळ मतदारसंघातून एकाच उमेदवाराचा अर्ज आल्याने तसेच नावेली मतदारसंघात उमेदवारांपैकी एकाचा मृत्यू झाल्याने या दोन्ही मतदारसंघामध्ये निवडणूक घेतली जाणार नाही. 
कोविड टाळेबंदीमुळे पंचायत निवडणूक ऐनवेळी स्‍थगित करण्‍यात आली होती. त्‍यासाठी उमेदवारांनी जोरदार प्रचाराचा तडाखा लावला होता. मात्र, अखेरच्‍या दोन दिवसांत टाळेबंदीचा निर्णय झाल्‍याने उमेदवारांचे भवितव्‍य टांगणीला लागले होते. आता त्‍यांची प्रतीक्षा संपणार आहे.
 

संबंधित बातम्या