कडधान्यांना प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारची एकही योजना नाही

गोमंन्तक वृत्तसेवा
बुधवार, 27 जानेवारी 2021

मुग हे गोव्यातील लोकप्रिय कडधान्य. पारंपरिक मुगाच्या वाणांची लागवड गोव्यात सर्वच तालुक्यात होत असे. आता अवघ्या काही ठिकाणी मुग लावला जातो. भेडशे हे अत्यंत दुर्मिळ कडधान्य हळदोणेत लावले जायचे. ते नष्ट झाल्यात जमा आहे.

पणजी: प्रथिनयुक्त कडधान्ये फार प्राचीन काळापासून भारतात लावली जातात. सुमारे 11 हजार वर्षांपूर्वी भूमध्यसामुद्रीक प्रदेशात कडधान्यांची शेती सुरू झाली. आज तुर्कस्थानसारख्या देशात कडधान्यांचे विशेषतः लाल मसूर, चणे, वाटाणे हरभऱ्यांचे प्रचंड उत्पादन होते. भारताला मोठ्या प्रमाणावर कडधान्ये लागतात.

गोव्याच्या कृषी खात्याकडे स्थानिक पारंपरिक कडधान्यांची कसलीही माहिती नाही. दुर्मिळ स्थानिक कडधान्यांच्या पारंपरिक वाणांच्या छोट्या प्रमाणावरील लागवडीला उत्तेजन देण्याची गोवा सरकारची एकही योजना नाही. कृषी खात्याचा भर फक्त संकरीत बियाणे वाटपावर व कडधान्यांच्या संकरीत बियाणे वितरीत करण्यावर आहे. त्यामुळे साडेतीन हजार वर्षांची गोव्यातील स्थानिक पारंपरिक दुर्मिळ कडधान्यांची वाणे फक्त गोव्यातूनच नव्हे, तर संपूर्ण पृथ्वीतलावरून कायमची नष्ट होण्याचा भयंकर धोका आहे. मुग, उडीद, चवळी, हरभरे, चणे, वाटाणे, मसूर, तूर अनेक तऱ्हेच्या डाळी या सर्वच कडधान्यांची मागणी सातत्याने वाढत आहेत. सुमारे साडेतीन हजार वर्षांपूर्वी कडधान्यांची शेती भारतात सुरू झाली. विविध तऱ्हेच्या कडधान्यांची शेकडो वाणे भारतातील आदिवासी प्रदेशात लावली जातात. हे पीक वैविध्य तज्‍ज्ञांनाही चकीत करणारे आहे. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे कसलीही शासकीय मदत, प्रोत्साहन नसताना भारतात कडधान्यांची शेकडो पारंपरिक वाणे सांभाळली गेली आहेत. पण, हळूहळू पारंपरिक कडधान्‍यांचे उत्‍पादन घटत आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद सोडवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं पुढचं पाऊल -

सरकार जास्त उत्पादन देणाऱ्या बियाण्यांचा प्रसार करीत आहे. बाजारात महागडी असली, तरी सर्व तऱ्हेची कडधान्ये, डाळी विपुल प्रमाणावर उपलब्ध आहेत. त्यामुळे पारंपरिक कडधान्यांचे व दुर्मिळ वाणांचे छोट्या प्रमाणावर उत्पन्न घेणारे शेतकरी निरुत्साही बनले आहेत. या लेखात छोट्या गोवा राज्याच्या अभिमानास्पद पारंपरिक कडधान्य लागवड संस्‍कृतीवर भर दिलेला आहे. अवघ्याच काही शेतकरी कुटुंबांनी जीवापाड जतन केलेली खास गोमंतकीय स्थानिक दुर्मिळ कडधान्यांची वाणे सांभाळून ठेवण्याची व जास्त प्रमाणावर सेंद्रीय पद्धतीने उत्पादित करण्याची गरज आहे.यातील काही वाणे आधीच नष्ट झाली असावीत. राज्यातील पारंपरिक कृषी जीवसंपदा ॲग्रो- बायोडायव्हर्सिटी नष्ट करून फक्त काही मोजक्याच संकरीत पिकांवर भर देऊन स्थानिक शेतकऱ्यांना बाजारातील बियाण्यांचे कायमचे गुलाम करणारी ही व्यवस्था आहे. त्यामुळे ग्रामीण समाजाच्या पारंपरिक प्रथिनयुक्त आहारावर गंभीर परिणाम होऊ लागला आहे. जगातील कडधान्यांच्या लागवडीखालील 43 टक्के जमीन भारतात आहे. जगातील कडधान्यांच्या एकूण वार्षिक उत्पादनात भारताचा वाटा 28 टक्के आहे. सुमारे तीन कोटी हेक्टर्स शेतीत भारतात प्रतिवार्षिक हवामानाप्रमाणे दोन ते अडीच कोटी टन कडधान्यांचे उत्पादन होते. संकरीत बियाण्यांच्या प्रसारामुळे दर हेक्टरमागील उत्पादन 625 किलोंवरून 864 किलोंवर पोहोचले आहे. लागवडीखालील संकरीत वाणांची संख्या 2008 ते 2018 या काळात 21 वरून 43 वर पोहोचली. देशांतर्गत कडधान्यांची मागणी वाढत राहिल्याने भारताला ती आयात करावी लागतात. गरजेप्रमाणे एखाद्या वर्षी ही आयात 50 लाख टनांपर्यंत पोहोचते. संपूर्ण देशाची अन्नधान्याची गरज 2029-30 सालापर्यंत 32 कोटी टन असेल. त्यासाठी 12 कोटी टन तांदूळ, 11 कोटी टन गहू, 7 कोटी टन इतर तृणधान्ये व 3 कोटी टन कडधान्यांचे उत्पादन घ्यावे लागेल. कडधान्यांचे संशोधन करताना प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की, पारंपरिक वाणांवर बरेच संशोधन झाले आहे. कोईंबतोर, तामिळनाडूच्या के. जनार्थनन या या भारतीहार विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी सातत्याने आदिवासी प्रदेशातील कडधान्यांच्या दुर्मिळ पारंपरिक वाणांचे सर्वेक्षण केलेले आहे. 2003 साली त्यांना एका सर्वेक्षणात आदिवासी वाणांची लागवड स्वतःच्या उद्योगासाठी करीत असल्याचे आढळले. आता 18 वर्षांनी यातील किती वाणे शिल्लक राहिली असतील याची माहिती मिळत नाही. माझी पत्नी कृषीशास्त्रज्ञ असल्याने तिच्या मदतीने मी गेल्या वीस वर्षांपासून आज दुर्मिळ झालेल्या स्थानिक पारंपरिक कडधान्यांच्या वैविध्यपूर्ण वाणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काही कडधान्यांचे नमुने मिळवले. इतरांचा प्रयत्न करूनही शोध लागला नाही. कारण, फक्त दोन - तीन गावांतच अवघी काही कुटुंबे ही कडधान्ये लावतात. शेकडो वर्षे पावसाळ्यात भात शेतीबरोबर उडीदाचे आंतरपीक गोव्यात घेतले जायचे. उडीद व उडीद डाळीचा गोव्यात फार मोठ्या प्रमाणावर वापर होतो. गोवा मुक्तीनंतर भातशेतीत उडीदाचे आंतरपीक घेण्याची प्रथा नष्ट झाली. कारण, केंद्र सरकार तायचुंग, आयआर-8 अशी संकरित बियाणे लावावीत म्हणून हट्टाग्राही होते. जपानी भातलावणी पद्धत, हल्लीची ‘श्री’ पद्धत यामुळे ‘उडीद’ आंतरपीक घेण्याची तीन हजार वर्षे पुरातन मिश्र. कृषीसंस्कृती कायमची नष्ट करण्यात गोव्याच्या कृषीखात्याला यश मिळाले. उडीद व उडीदडाळ बाजारात मिळत असल्याने शेतकऱ्यांनीही तक्रार केली नाही.

प्रजासत्ताक दिन 2021: वाळपई सत्तरीत भूमिपुत्रांचा हुंकार -

मुग हे गोव्यातील लोकप्रिय कडधान्य. पारंपरिक मुगाच्या वाणांची लागवड गोव्यात सर्वच तालुक्यात होत असे. आता अवघ्या काही ठिकाणी मुग लावला जातो. भेडशे हे अत्यंत दुर्मिळ कडधान्य हळदोणेत लावले जायचे. ते नष्ट झाल्यात जमा आहे. घुलयो आणि गर या ‘वाल’ अथवा ‘इरवील’ शेंगाच्या बियांची कडधान्य म्हणून लागवड केली जायची. यातील ‘गर’ या कडधान्याच्या बिया फक्त पेडणे तालुक्यातच सापडत. ‘घुलयो’ काळसर असत. आता ‘गर’ आणि ‘घुलयो’  शोधूनही सापडणे कठीण. गोव्याच्या ‘अळसांदे’ या चवळी वर्गातील कडधान्‍यांवर वेगळा लेख लिहावा लागेल. एका खासगी बियाणे उत्पादक उद्योगाने स्थानिक अळसांद्याची पारंपरिक वाणे नष्ट करण्यासाठी राजकारण्यांना हाताशी धरून सालसेत व बार्देशमध्ये मोठ्या प्रमाणावर संकरीत चवळीचा प्रसार केला. त्यामुळे गोमंतकीय, पारंपरिक, चविष्ट, शिजायला उत्तम ‘अळसांदे’ची वाणे आता या दोन्ही तालुक्यांतून पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. 

पेडणे तालुक्यात  मोठ्या प्रमाणावर कुळीथ व हुलगे हे पौष्टिक कडधान्ये लावले जायचे. कुळिथाचा रंग, आकार, चवीनुसार बरीच प्राचीन वाणे होती. यातील काही वाणे मुतखड्यावरील उपचारासाठी वापरली जायची. हे कुळीथ उकळून ते पाणी मुतखडा नष्ट करण्यासाठी रुग्णाला पाजत असत. आता कुळीथाचे हे उपयुक्त औषधी वाण नष्ट झाले, तर सरकार काय भरपाई देणार? गोमंतकीयांनी चारशे वर्षांपूर्वी ‘फेजांव’ या पोर्तुगालहून आयात कडधान्याची लागवड सुरू केली. हे तांबडे दाणे फार चविष्ट असतात. अवघ्या काही गावातच आज फेजांव शिल्लक आहेत. हळदोणे, थिवी, मयडे, खोर्जुवे भागातजवळी वर्गातील ‘मेरूले’ हे कडधान्य लावतात. हे फारच प्राचीन कडधान्य आहे. हळदोणेतच ‘धाकटी चवळी’  हे कडधान्य फार छोट्या प्रमाणावर पिकवतात. ते कधीच बाजारात दिसणार नाही.

पावट्यांना गोव्यात ‘आवरे’ म्हणतात. हे जरा तुरट लागणारे पण चविष्ट व पौष्टिक कडधान्य पूर्वी बार्देश तालुक्यात लावले जायचे. आज ‘गोव्याचे आवरे’ म्हणतात. हे जरा तुरट लागणारे पण चविष्ट व पौष्टिक कडधान्य पूर्वी बार्देश तालुक्यात लावले जायचे. आज ‘गोव्याचे आवरे’ सापडणे दुर्मिळ. काणकोणातील आदिवासी प्राचीन काळापासून पारंपरिक ‘तुरी’ ची लागवड करतात. या तुरीचे वरण खूप लोकप्रिय आहे. वेळीप समाजाच्या संपन्न अन्नसंस्कृतीत तुरीच्या वरणाला महत्त्‍वपूर्ण स्थान आहे. पण, काणकोणातील ही प्राचीन ‘तुरी’ची वाणे टिकावीत म्हणून काहीही योजना नाही. वाघासारखे पट्टे असलेले शिरपे अळसांदे पूर्वी पेडण्यात लावले जायचे. काळ्या तोडांची चवळी हे चवदार पौष्टिक कडधान्याही दुर्मिळ झाले. थिवीला काही शेतकरी ‘बुडगे’ हे दुर्मिळ कडधान्य पिकवित. 

गावडोंगरीत अवघ्या काही कुटुंबांकडेच ‘ओसोन्यो’ हे दुर्मिळ कडधान्य सापडेल. कृषी खात्याने ‘काळे चणे’ गोव्यातून हद्दपार केले. या काळ्या चण्यांचे मसालेदार पदार्थ बनवित. फक्त काणकोणात लावले जाणारे मसालेदार पदार्थ बनवित. फक्त काणकोणात लावले जाणारे ‘सावळां’ हे कडधान्य आज विस्मृतीत गेले आहे. काय होणार यापुढे, गोव्याच्या दुर्मिळ पारंपरिक कडधान्यांचे? ही असंख्य वाणे वाचायलाच हवीत. तो एक जागतिक ठेवा आहे. मुगाच्या किमान सहा जाती, भेडश्‍याच्या चार-पांच, घुलयो- गराच्या चार-पाच अळसांद्याच्या किमान वीस, फेजांवाच्या दोन-चार, आवऱ्याच्या दोन, तुरीच्या दोन, कुळीथाच्या सात-आठ, काळे-चणे, काळ्या तोंडाच्या चवळीच्या, ओसोन्यो, उडीद, धाकटी चवळी, बुडगे धरून पारंपरिक गोमंतकीय प्रथिनयुक्त पौष्टिक कडधान्यांच्या जवळजवळ शंभर वाणांवर भयंकर संकट ओढवले आहे, म्हणून ही ‘कडधान्ये वाचवा’ अशी हाक देण्याची व जनजागृती करण्याची ही वेळ आहे.

संबंधित बातम्या