१०० कोटी हे एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी नव्हे तर...

दैनिक गोमन्तक
शुक्रवार, 18 डिसेंबर 2020

सरकार १०० कोटी हे एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी नव्हे, तर वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर तसेच गोवा मुक्तिसंग्रामातील काही स्मृतिस्थळांच्या जीर्णोद्धार व नुतनीकरणासाठीही वापर केला जाणार आहे.

पणजी : गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दी सोहळा हा १९ डिसेंबरपासून सुरू होऊन तो वर्षभर साजरा केला जाणार आहे. सरकार १०० कोटी हे एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी नव्हे, तर वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या कार्यक्रमांवर तसेच गोवा मुक्तिसंग्रामातील काही स्मृतिस्थळांच्या जीर्णोद्धार व नुतनीकरणासाठीही वापर केला जाणार आहे. एका दिवसाच्या कार्यक्रमासाठी हे १०० कोटी रुपये खर्च केले जाणार असा काहींचा गैरसमज व संभ्रम आहे, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले. 

कोविड महामारीमुळे या सोहळ्यासाठी निमंत्रणांचे निर्बंध आहेत. त्यामुळे फक्त ४०० जणांनाच निमंत्रणे देण्यात आली आहेत. ज्यांना या कार्यक्रमासाठीचे निमंत्रण मिळालेले नाही त्यांना तो घरी बसून पाहण्यासाठी थेट प्रक्षेपण केले जाणार आहे. गोव्यातील लोक हे राष्ट्रीय विचारसरणीचे व राष्ट्रीय स्वाभिमानी आहेत. त्यामुळे ते राष्ट्रपतींनी गोव्यात येऊ नका असे म्हणणार नाहीत. लोकांनी त्यांचे स्वागत करणे गरजेचे आहे, असे डॉ. सावंत म्हणाले. 

राज्यात वर्षभर सुरू असणाऱ्या विविध कार्यक्रमांची कंत्राटे तसेच कामे ही गोमंतकीयांनाच दिली जाणार आहेत. तसेच गोमंतकीय कलाकारांना घेऊनच ते साजरे केले जाणार आहे. राज्याबाहेरील कंत्राटदारांना किंवा कलाकारांना सहभागी करून घेतले जाणार नाही असे स्पष्ट करून मुख्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले की, ‘व्होकल फॉर लोकल’ या संकल्पनेतून या कार्यक्रमासाठी ‘कॅलेंडर’ तयार करण्याचे काम सुरू आहे. या वर्षभराच्या कार्यक्रमासाठी केंद्र सरकारकडे १०० कोटी रुपये मागण्यात आले आहेत व ते मिळणार आहेत. 
गोवा मुक्तिदिन षष्ठ्यब्दी सोहळ्याचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे गोवा मुक्तिसंग्रामानंतर गोव्यात जन्मलेल्या पिढीपर्यंत गोव्याच्या इतिहासाची माहिती पोहचणार आहे.

वर्षभर चालणारे हे कार्यक्रम राज्यातील सर्व तालुक्यांत तसेच विविध संस्कृतीवर आधारित असतील. याशिवाय गोवा मुक्तिसंग्रामसंदर्भातील व्याख्याने, चर्चा व परिषदा आयोजित केली जाणार आहेत. आतापर्यंत गोव्यातील सर्व माजी मुख्यमंत्री हे गोवा मुक्तिपूर्वी जन्माला आले होते. त्यामुळे त्यांना पोर्तुगीज राजवट यासंदर्भात माहिती आहे. माझा जन्मच गोवा मुक्तीनंतर झाला आहे. त्यामुळे गोवा मुक्तिसंग्रामासाठी आहुती दिलेल्या स्वातंत्र्यसेनानी तसेच थोर नेत्यांची माहिती नाही. पोर्तगीज राजवटीत गोमंतकीयांना काय अन्याय सहन करावे लागले याची पूर्ण माहिती नाही. त्यामुळे गोव्याचा तीन - चार शतकापूर्वीचा इतिहास याचाही या कार्यक्रमांमध्ये समावेश केला जाणार आहे. 

माझा जन्म गोव्यातलाच; मुख्यमंत्र्यांचा टोला 
माझा जन्म गोव्यातच झाला असून विदेशात झालेला नाही. माझ्या तीन पिढ्या गोव्यातच जन्माला आल्या त्याची खातरजमा मी केली आहे. माझे कूळ दैवतही भगवती आहे असा अप्रत्यक्ष टोला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोणाचेही नाव न घेता आज पत्रकार परिषदेत लगावला. आमदार विजय सरदेसाई यांनी काल सावंत यांच्याबाबत ट्विट करून सावंतवाडीचे मुख्यमंत्री असे उपरोधित भाष्य केले होते.

आणखी वाचा:

इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचा विकासदर सर्वोत्कृष्ट : मुख्यमंत्री -

संबंधित बातम्या