राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भांत परिस्‍थितीचा विचार करूनच सर्वसमावेशक निर्णय घेणार: मुख्‍यमंत्री डॉ. सावंत

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

एकंदर परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

पणजी: राज्यातील शाळा सुरू करण्यापूर्वी पालक, शाळा व्यवस्थापन यांच्याशी येत्या दोन दिवसांत चर्चा करण्यात येईल. त्यांच्या मतानुसारच निर्णय घेतला जाईल. शाळा सुरूच करा, याविषयी सरकार आग्रही नाही. एकंदर परिस्थितीचा विचार करूनच निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्स पद्धतीने आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांच्यासह सर्व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेतली. राज्यात कोविडमुळे मृत्यू होणाऱ्यांचे प्रमाण कसे घटवता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाली. कोविडची लक्षणे दिसल्यावर तातडीने त्यावर उपचार सुरू करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे. यासाठी जनतेने लक्षणे आढळल्‍यास स्वतःहून नजीकच्‍या प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन कोविड चाचणी करून घ्यावी, असेही बैठकीत सुचवण्यात आले. यामुळे येत्या काही दिवसांत सरकार जनजागृतीवर भर देणार आहे.

शिक्षणाबरोबर आरोग्‍यही महत्त्‍वाचे
या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेवेळी शाळा सुरू केल्या जातील का? असे थेटपणे विचारल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, दोन दिवसांपूर्वी मी सर्व संबंधित घटकांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ, असे स्पष्ट केले आहे. याचा अर्थ सरकार एकतर्फी प्रमाणे निर्णय घेणार नाही. शिक्षण महत्त्‍वाचे आहे, पण आरोग्यही तेवढेच महत्त्‍वाचे आहे. दोन्‍हींत समन्वय हवा. पालकांना काय वाटते, हेही जाणून घेतले जाणार आहे. मुख्याध्यापक संघटना, प्राचार्य मंच असेही घटक या निर्णयाशी संबंधित आहेत. सर्वांची मते जाणून घेऊन निर्णय घेतला जाईल. अमूक तारखेपासून शाळा सुरू करणार, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे याविषयी उगाच गैरसमज नको.

इस्‍पितळांत प्राणवायूची कमतरता नाही
गोमेकॉत एका रुग्णाला प्राणवायूअभावी मृत्यू झाल्याची चर्चा सुरू असल्याकडे लक्ष वेधल्यावर मुख्यमंत्री म्हणाले, राज्यात इस्पितळांसाठीच्या प्राणवायूची कमतरता नाही. गोमेकॉत प्राणवायूअभावी कोणत्याही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. ती चर्चा माझ्याही कानावर आल्यानंतर मी चौकशी केली होती. राज्यात कर्नाटकातील एक आणि महाराष्‍ट्रातील एक अशा दोन पुरवठादारांकडून प्राणवायू पुरवण्यात येतो. पुरवठादारांच्या संपर्कात आरोग्य यंत्रणा असून पुरवठा सुरळीत राहील, याकडे लक्ष देण्यात येत आहे. कृत्रिम श्वाच्‍छोश्‍‍वास उपकरणांची कमतरता नाही. मात्र, रुग्णांना थेट प्राणवायू देणारी यंत्रे देशात सध्या कुठेच मिळत नाहीत. त्यांची टंचाई सर्वांनाच जाणवत आहे. तरीही तशी यंत्रे येत्या तीन दिवसांत मिळवण्याचा प्रयत्न आहे.

कोविडसाठी खासगी इस्‍पिळातील शुल्‍क निश्‍चिती
खासगी इस्पितळात कोविड उपचारानंतर डॉक्टर, परिचारीका आणि कर्मचाऱ्याना कोविड लागण होते. त्यामुळे त्या इस्पितळांना अतिरिक्त कर्मचारी नेमावे लागतात. तज्ज्ञ डॉक्टरांना उपचारासाठी पाचारण करावे लागते. यामुळे कोविड उपचार त्यांनाही परवडले पाहिजेत म्हणूनच त्यांना सरकारने शुल्क ठरवून दिले आहेत. सरकारने जनतेच्या सोयीसाठी कोविड इस्पितळे आणि कोविड निगा केंद्रे सुरू केली आहेत. तरीही कोणाला खासगी इस्पितळात दाखल व्हायचे असेल, तर ती त्याची मर्जी. सरकारची सेवा उत्तम आहे. त्यामुळे जनतेने शक्यतो सरकारी सेवेचाच (जी विनामुल्य आहे) वापर करावा, असे आमचे म्हणणे आहे. सर्वसाधारण कक्षात एका दिवसासाठी १२ हजार रुपये, खास कक्षात एका दिवसासाठी १८ हजार, अतिदक्षता विभागात कृत्रिम श्वाच्छोश्‍वास यंत्रणेसाठी दिवसाला २५ हजार रुपये, याशिवाय औषधोपचार, डॉक्टरांचे, औषधांचे, चाचण्यांचे शुल्क वेगळे असा दर ठरवण्यात आला आहे. 

...तर प्‍लाझ्‍मादान करणार : मुख्‍यमंत्री
कोविडमुक्त झाल्यानंतर आता २८ दिवसांनी प्लाझ्मा दानाचा आपला विचार आहे. मात्र, प्लाझ्मा दानासाठी असलेल्या शारीरिक स्थितीच्या अटींनुसार मला प्लाझ्मा दान करता येईल का? हे पाहावे लागेल. रक्तदाबाचा विकार असलेल्यांना प्लाझ्मा दान करता येत असेल, तर मी नक्कीच करेन, असे मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ते म्हणाले, कोविड निगा केंद्रात आणि इस्पितळात जागा आहे. खाटा भरल्या आहेत, असा उगाच अपप्रचार केला जातो. खासगी इस्पितळात उपचार घेणाऱ्या गरोदर स्रिया प्रसुतीसाठी सरकारी इस्पितळातही दाखल होऊ शकतात. प्रसुतीपूर्व कोविड चाचणी अनिवार्य आहे. तिला सर्वांनी सहकार्य करावे. राज्यभरात १६ प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड चाचणीची सोय विनामुल्य आहे. एकमेकांपासून १०-१२ किलोमीटरच्या अंतरात ही केंद्रे आहेत.

कोविड मृत्‍यूदर घटविणे जनतेच्‍या हाती
राज्यात कोविडचा मृत्यूदर शून्य करणे जनतेच्याच हाती आहे, असे मुख्यमंत्री म्‍हणाले. आठ आठ दिवस लोक ताप अंगावर काढतात. अगदीच असह्य होते तेव्हा इस्पितळात उपचारासाठी येतात. तेव्हा वेळ निघून गेलेली असते. जरा जरी लक्षणे दिसली तरी कोविड चाचणी करून घ्यावी. ती मोफत आहे. पाहिजे तर गृह अलगीकरणात राहता येते किंवा कोविड निगा केंद्रात राहता येते. फारच उपचारांची गरज असल्यास कोविड इस्पितळात दाखल केले जाते. त्यामुळे कोविड विषयी जनतेने सतर्कता बाळगल्यास कोविड मृत्यूदर कमी करता येईल. जनतेनेही मुखावरण वापरणे, सार्वजनिक व घराव्यतिरीक्तच्या ठिकाणी दुसऱ्या व्यक्तीपासून सहा फुटांचे अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वारंवार वापर करणे आदींचा अवलंब करणे आवश्यक आहे. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या