पालिका अध्यादेश दुरुस्तीला गोवा सरकारकडून स्थगिती ; ७ जानेवारीला ‘दुकाने बंद’ नाही

दैनिक गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 5 जानेवारी 2021

पालिका मंडळाच्या मालकीच्या दुकानांसंदर्भात पालिका कायद्यात सरकारने दुरुस्ती केलेला अध्यादेश स्थगित ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर येत्या ७ जानेवारीला ‘दुकाने बंद’ ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

पणजी :  पालिका मंडळाच्या मालकीच्या दुकानांसंदर्भात पालिका कायद्यात सरकारने दुरुस्ती केलेला अध्यादेश स्थगित ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्‍वासनानंतर येत्या ७ जानेवारीला ‘दुकाने बंद’ ठेवण्याचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. हे सरकार व्यापाऱ्यांच्या हितासाठी तसेच त्यांचे हित सांभाळणारे आहे. व्यापाऱ्यांना हानिकारक ठरेल असा कोणताही निर्णय घेतला जाणार नाही, असे त्यांनी आश्‍वासन दिले, अशी माहिती अखिल गोवा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नारायण कारेकर यांनी दिली.

पालिका कायद्यातील दुरुस्तीमुळे त्याचा फटका व्यापाऱ्यांना बसणार असल्याने काल म्हापसा व्यापारी संघटनेने म्हापशात बैठक घेऊन याविरोधात येत्या ७ जानेवारीला राज्यातील पालिकेच्या मालकीची सर्व दुकाने बंद ठेवून पणजीतील आझाद मैदानावर जमण्याचे आवाहन केले होते. अखिल गोवा व्यापारी महासंघाच्या शिष्टमंडळाने आज संध्याकाळी पणजीत भाजप कार्यालयात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व नगरविकासमंत्री मिलिंद नाईक तसेच भाजप नेत्यांची भेट घेतली. 

या दुरुस्तीमुळे व्यापाऱ्यांना सोसावे लागणारे नुकसान तसेच समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बाजू ऐकून घेतल्यानंतर पालिका कायद्यातील दुरुस्तीचा निर्णय स्थगित ठेवतो असे स्पष्टपणे सांगितले. ही दुरुस्ती व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच करण्यात आली असून त्यामध्ये व्यापाऱ्यांना संकटात टाकण्याचा सरकारचा हेतू नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या दुरुस्तीमध्‍ये त्यांच्या असलेल्या हरकती तसेच सूचना सुचवाव्यात. त्यासंदर्भात वकिलांचा सल्ला घेऊन त्याची माहिती निवेदनाद्वारे सरकारला द्यावी, असे सांगितले. व्यापाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्‍वासन दिल्याने नियोजित ‘दुकाने बंद’ रद्द करून नेहमीप्रमाणे पालिका मंडळाच्या मालकीची दुकाने जी भाडेपट्टीवर आहेत ती खुली ठेवण्यात येतील. मुख्यमंत्र्यांनी हा अध्यादेश स्थगित ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाचे व्यापारी महासंघाकडून स्वागत करण्यात येत सल्याचे कारेकर यांनी सांगितले. या चर्चेवेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, नगरविकासमंत्री मिलिंद नाईक, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार दामोदर नाईक उपस्थित होते.

सरकारने पालिका कायद्यात दुरुस्ती केलेल्या अध्यादेशानुसार पालिका मंडळाच्या मालकीची दुकाने भाडेपट्टीवर दिल्यास ४० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांचा नव्याने १० वर्षांसाठी करार करण्याचा व त्यानंतर या दुकानांचा लिलाव करण्याची तरतूद त्यामध्ये करण्यात आली होती. यापूर्वी करार करताना त्यामध्ये लिलाव हा शब्द नव्हता. गेली अनेक वर्षे भाडेपट्टीवर दुकाने असलेल्या पालिका व्यापाऱ्यांना मारक ठरणार असल्याने त्याला विरोध करण्यात आला होता. तसेच या भाडेपट्टीच्या दुकानांसाठी पालिका वर्गवारीनुसार भाडेवाढ करण्यात आली आहे. दुकाने अनधिकृतपणे भाड्याने दिल्यास त्यामध्ये दंडवसुली तसेच तुरुंग अशी शिक्षा आहे. ही दुरुस्ती म्हणजे व्यापाऱ्यांवर आघात करण्यासारखा होता. पालिका वर्गवारीनुसार दुकानांची भाडेवाढ करण्यात आली होती. ‘अ’, ‘ब’ व ‘क’ वर्गाच्या पालिकांसाठी दुकानांच्या स्थलांतर शुल्कात केलेली वाढ आवाक्याबाहेर आहे. कोरोना महामारीच्या काळात व्यापारी संकटात होते. त्यामुळे अनेकांना ही भाडेवाढ भरणे शक्य नाही. गेल्या काही महिन्यांपासून व्यापारी या संकटातून बाहेर येत असतानाच सरकारने पालिका दुरुस्ती आणून अडचणीत आणले अशी बाजू मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आल्याचे कारेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, राज्यातील पालिका निवडणुका पुढील महिन्यात होणार आहेत. त्यामुळे त्या जिंकण्यासाठी व्यापाऱ्यांबरोबर जाण्याशिवाय सरकारला पर्याय नव्हता. अशा परिस्थितीत पालिका कायद्यात दुरुस्ती ही भाजप सरकारच्या अंगलट येऊ शकते. त्यामुळे हा अध्यादेश ही निवडणूक होईपर्यंत स्थगित ठेवण्याचा निर्णय घेत सरकार बॅकफूटवर गेले आहे. हा मुद्दा पालिका निवडणुकीचा प्रचारासाठी विरोधकांना फायदेशीर ठरू शकतो व त्यामुळे जिल्हा पंचायतीमध्ये मिळालेले अभूतपूर्व यश पालिका निवडणुकीत विरोधात जाण्याची शक्यता वर्तवून सरकारने या अध्यादेशात व्यापारी महासंघालाच त्यामध्ये ज्या सूचना करायच्या आहेत त्या करण्यास सांगून व्यापारी वर्गाला भाजपकडे आकर्षित करण्यात सध्या तरी यश मिळवले आहे. अध्यादेश स्थगित ठेवून पालिका निवडणुकीतही जिल्हा पंचायतीप्रमाणे सर्व पालिकांमध्ये भाजपला बाजी मारायची आहे. 
 

संबंधित बातम्या