गोव्यातील ऊस उत्पादकांचे आंदोलन तीव्र

दैनिक गोमन्तक
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सांगे येथे शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. या आंदोलनाला शेतकरी संघटनांसह सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे.

सांगे: सांगे येथे शेतकरी आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. या आंदोलनाला शेतकरी संघटनांसह सर्वपक्षीय पाठिंबा मिळत आहे. आमदार गावकर म्‍हणाले, ऊस उत्पादकांचा विषय पूर्णपणे सरकारला कळविण्यात आलेला आहे. लेखी स्वरूपात निवेदन देण्यात आले आहे. तरीही सरकार अजून ठोस निर्णय घेत नाही. गेले तीन दिवस शेतकरी रस्त्यावर ठाण मांडून आहेत. जोपर्यंत शेतकरी आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत रस्त्यावरून उठत नाही, तोपर्यंत आपण शेतकऱ्यांबरोबर ठाम राहणार असल्याचे त्‍यांनी यावेळी जाहीर केले. 

विजय सरदेसाई यांचाही पाठिंबा
आंदोलनाच्या तिसऱ्या दिवशी माजी कृषी मंत्री विजय सरदेसाई यांनी आंदोलकांची भेट घेऊन आपला पाठिंबा व्‍यक्त केला. ते म्‍हणाले, सरकार ऊस पीक नष्ट करून गांजा शेती करण्याची शिफारस करीत आहे. यावरून सरकारची दिशा स्पष्ट होत आहे. भाजपा सरकारला ऊस शेतीचे महत्त्‍व कळले नाही म्हणून कारखाना बंद करून गांजा लागवड करण्याची शिफारस करण्याचा विचार येणे, हे सरकारचे वैचारिक दिवाळे आहे. तुम्ही धरणे आंदोलनास रास्त मागण्या घेऊन बसला आहात. त्‍यासाठी आपला पाठिंबा आहे. गरज पडल्यास सर्व प्रकारची मदत करण्यासाठी आपला पक्ष तयार आहे.

शेतकऱ्यांचा प्रश्‍‍न लवकर सुटावा : वासुदेव मेंग गावकर
प्रदेश भाजपा किसान मोर्चाचे अध्यक्ष तथा माजी आमदार वासुदेव मेंग गावकर धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ते म्‍हणाले, संजीवनी साखर कारखाना सुरू व्हावा ही आपली आजही मागणी आहे. सरकारला आम्ही तशा सूचना केलेल्‍या आहेत. कारखाना सुरू होण्यापूर्वीपासून आपले कुटुंब उसाच्या व्यवसायात आहे. सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांवर विचारपूर्वक विचार विनिमय करण्यात येणार असल्याची आपल्याला खात्री आहे. हा विषय लवकर सुटावा असे सांगून त्‍यांनी आंदोलनाला पाठिंबा व्‍यक्‍त केला.

सरकारने आता तरी सवड काढावी : तारा केरकर 
धरणे आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्‍यासाठी एनजीओ चालविणाऱ्या तारा केरकर उपस्थित राहिल्‍या. एका रात्रीत सत्ता बदल करण्यासाठी पटाईत असलेल्या सरकारला शेतकऱ्यांचा प्रश्न मिटविण्यासाठी आता सवड मिळत नाही काय? असा प्रश्न त्‍यांनी उपस्थित केला. धरणे आंदोलनाला भाटीचे सरपंच उदय नाईक, नेत्रावळीचे उपसरपंच अभिजित देसाई, उदय गावकर, ॲड. आनंद गावकर, ॲड. मार्शल फर्नांडिस, रिवण व्‍हिकेएस सोसायटीचे चेअरमन जुझे अफांसो, मेशु डिकॉस्ता, संतोष गावकर, माजी नगरसेवक रुमाल्डो फर्नांडिस इत्यादींनी आपले विचार मांडले.

काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर 
संध्‍याकाळच्या सत्रात प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी धरणे आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आंदोलकांसमवेत जमिनीवर ठाण मांडले होते. यावेळी ते म्हणाले की, सरकारने शेतकऱ्यांना ऊस लावण्यासाठी आधीपासून प्रवृत्त केले आणि आता सरकारच कारखाना बंद करून शेतकऱ्यांना रस्त्यावर आणू पाहत आहे. शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारी योजनांचा लाभ घ्‍या, असे आवाहन केले जाते, तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या प्रश्नाचे राजकारण केले जात आहे. त्यांच्या मागण्या विचारात घ्‍याव्‍यात. यावेळी त्यांच्यासोबत किसान प्रदेश अध्यक्ष अभिजित देसाई, डॉ. रेवणसिद्ध नाईक, रजनीकांत नाईक उपस्थित होते. 
       
बोडगेश्वर शेतकरी संघाचा पाठिंबा 
बोडगेश्‍‍वर शेकरी संघाचे अध्यक्ष संजय बर्डे म्‍हणाले की, शेतकऱ्यांना शेती करा म्हणणारे सरकार शेतकऱ्यांना रस्त्यावर बसण्याची वेळ आणली आहे. ही तर नामुष्की आहे. यापुढे धरणे आंदोलनाला बसण्याचा प्रसंग आल्यास आमची शेतकरी संघटना नेहमीच सांगेत येण्यास तयार आहे. 

गोंयचे राखणदार संघटना 
गोंयचे राखणदार या संघटनेचे अध्यक्ष रामा काणकोणकर यांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सरकार आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा म्हणते. पण आत्मनिर्भर असलेल्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्यासाठी भाग पाडतात. अशा सरकार विरुद्ध राखणदाराला हाक मारण्याची मागणी करून आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला.

आणखी वाचा:

काणकोणजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडला भीषण अपघात -

संबंधित बातम्या