गोवा सरकार आता ‘टॉप गियर’मध्ये!

Goa government setting up to normalise the things after corona pandemic
Goa government setting up to normalise the things after corona pandemic

पणजी : पुढील महिन्यातील प्रस्तावित सरकारी नोकरभरती, गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभरात देशभरातील कार्यक्रमांचे नियोजन, शाळांच्या अंतर्गत परीक्षांचे वेळापत्रक जाहीर करणे आणि सरकारी महसुलाने ७० टक्क्यांचा टप्पा ओलांडणे यातून सरकारने कोविड महामारीनंतर पुन्हा गाडी ‘टॉप गियर’मध्ये टाकली असल्याचे दिसते. ‘इंडिया टुडे’ या नियतकालिकेने लहान राज्यांच्या गटात गोव्याला सर्वोत्कृष्ट राज्याचा पुरस्कार जाहीर करून सरकारने पुन्हा सारे व्यवहार सुरळीत सुरू करण्याच्या मनसुब्याना खतपाणीच घातले आहे.

कोविड महामारीच्या काळात सरकारचा महसूल १० टक्क्यांपर्यंत घसरला होता. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये त्या महसुलाने ६० टक्क्यांचा टप्पा ओलांडला, या महिन्यात ७० टक्के महसूल मिळेल. त्यातच वस्तू व सेवा कराच्या रुपाने सरकारला दीडशे कोटी रुपये मिळाले, कोविड महामारीविरोधात लढण्यासाठी सामग्री पुरवण्याच्या व्यतिरीक्त केंद्र सरकारने राज्य सरकारला १०-१२ कोटी रुपयांची मदत केली आहे. मध्यंतरी राज्य सरकारने भांडवली बाजारातून पैसे उभे करून खर्च भागवला. पण, त्यानंतर सरकारने नियमित खर्च भागवण्याइतका महसूल जमा करणे सुरू केले. अनेक थकीत अनुदाने देणे सरकारने सुरू केले. कल्याणकारी योजनांचा थकीत लाभ देणे सुरू केले. त्यामुळे सरकार आता पुन्हा आपली गाडी रुळावर आणत असल्याचे दिसते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल शासकीय निवासस्थानी पत्रकार परिषद घेत गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने गोमंतकीय पर्यटनाला वेगळी दिशा देण्याचा मनसुबा जाहीर केला. गोव्याची ही नवी ओळख देशभरातील पर्यटकांना गोव्याकडे खेचून आणेल, असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

देशभरात कार्यक्रमांचे नियोजन

गोवा मुक्तीच्या हीरक महोत्सवी वर्षात देशभरात कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. याची सुरवात १९ डिसेंबरला सायंकाळी पणजीतील आझाद मैदानावर आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांसह होणार आहे. सूर्य (सन), रेती (सॅण्ड) आणि समुद्र (सी) यापुरती मर्यादित असलेली गोव्याची ओळख आता बदलायची आहे. गोमंतकीय संस्कृती, खाद्यसंस्कृती, लोकजीवन, स्थापत्यशास्त्र, संगीत, कलाकार यांची ओळख सगळ्यांना व्हायला हवी. त्यासाठी पर्यटक गोव्यात यायला हवेत. येथील सुंदर मंदिरे, चर्च पाहण्यासाठी लोक यावेत यासाठी सांस्कृतिक गोव्याचे दर्शन प्रत्येक राज्य, संघप्रदेशांच्या राजधानीत आणि प्रमुख शहरांत घडवण्यात येणार आहे. यासाठी १९ डिसेंबर २०२० ते १९ डिसेंबर २०२१ पर्यंत भरगच्च वेळापत्रक ठरवण्यात येत आहे. यासाठी माझ्याच अध्यक्षतेखाली आयोजन समिती नेमली असून केंद्र सरकारकडे यासाठी शंभर कोटींहून अधिक रकमेची मागणी करण्यात आली आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

परीक्षांचेही वेळापत्रक निश्‍चित

सर्वकाही सुरळीत झाले हे दर्शवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचेही सरकारने ठरवले आहे.पहिली ते बारावीपर्यंतच्या अंतर्गत परीक्षांचे वेळापत्रक शिक्षण खात्याने निश्चित केले आहे. ज्या शाळांनी यापूर्वी अंतर्गत परीक्षा घेतली आहे, त्यांना पुन्हा परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे. कोविड महामारीमुळे पहिली ते नववी आणि अकरावीचे वर्ग ऑनलाईन पद्धतीने भरविले जात असतानाच हे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे.

महोत्‍सव समितीची निवड

ते म्हणाले, या समितीच्या सहअध्यक्षपदी केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक आहेत. याशिवाय समितीवर उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, मनोहर आजगावकर, सभापती राजेश पाटणेकर, खासदार फ्रान्‍सिस सर्दिन, विनय तेंडुलकर, मंत्री जेनिफर मोन्सेरात, गोविंद गावडे, नीलेश काब्राल, माविन गुदिन्हो, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, आमदार सुदिन ढवळीकर, प्रतापसिंह राणे, माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मंत्री राजेंद्र आर्लेकर, दत्ता भि. नाईक, पत्रकार संजय ढवळीकर, स्वातंत्र्यसैनिक संघटनेचे पांडुरंग कुंकळकर, ज्योकीम पिंटो, अरुण साखरदांडे, गोवा मराठी अकादमी, गोवा कोकणी अकादमी आणि दाल्गाद कोकणी अकादमीचे अध्यक्ष, शिल्पकार सचिन मदगे, माजी आमदार तिओतिन परेरा तसेच सरकारी अधिकाऱ्यांची निवड केली आहे.
 

परीक्षा घेण्‍याचे शिक्षण खात्‍याचे निर्देश

पहिली ते अकरावीपर्यंतची पहिली परीक्षा १५ जानेवारीपासून तर दुसरी परीक्षा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घ्यावी, असे शिक्षण संचालक संतोष आमोणकर यांनी शाळांना कळवले आहे. आज जारी केलेल्या परिपत्रकात त्यांनी दहावी ते बारावीच्या अंतर्गत पहिली परीक्षा १५ जानेवारीपासून तर दुसरी परीक्षा मार्चच्या अखेरीस घ्यावी, असे नमूद केले आहे. पहिली ते नववी आणि अकरावीचा निकाल ८ मे किंवा त्यानंतर जाहीर करावा. दहावी आणि बारावी परीक्षेचे वेळापत्रक गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ जाहीर करेल, असेही त्यांनी परिपत्रकात स्पष्ट केले आहे.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com