स्व. मनोहर पर्रिकरांचा "मी पणा" व "अहंकार" यामुळेच गोवा आर्थिक संकटात - ॲड. रमाकांत खलप

दैनिक गोमन्तक
शनिवार, 12 डिसेंबर 2020

३५ हजार कोटी रुपयांच्या  खाण घोटाळ्याचे भूत स्व. मनोहर पर्रिकर यांनी राजकीय स्वार्थासाठी तयार केले होते हा आरोप खोडुन काढण्याचा प्रयत्न केला होता.

पणजी: गोव्यात सन २०१२ पासून सत्तेत असलेल्या भाजप सरकारचा भ्रष्टाचार, असंवेदनशीलता व दादागिरी यामुळे गोवा आज गंभीर संकटात असुन, भाजपचे माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रिकर, लक्ष्मीकांत पार्सेकर व प्रमोद सावंत यांच्या नेत्वृखालील तिन्ही सरकारांना गोवा लोकायुक्तांची " भ्रष्टाचाराची प्रमाणपत्रे" मिळाली आहेत असा टोला माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी लगावला आहे. भाजपला इतरांना दोष देण्याचा नैतिक अधिकार नाही असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

भाजपचे माजी खासदार ॲड. नरेंद्र सावईकर यांनी गोव्यातील बेकायदा खाण व्यवसायास कॉंग्रेस पक्षच जबाबदार असल्याचे वक्तव्य करुन,   कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी अस्तित्वातच नसलेला लोक लेखा अहवाल व न घडलेल्या ३५ हजार कोटी रुपयांच्या  खाण घोटाळ्याचे भूत स्व. मनोहर पर्रिकर यांनी राजकीय स्वार्थासाठी तयार केले होते हा आरोप खोडुन काढण्याचा प्रयत्न केला होता. ॲड. नरेंद्र सावईकरांच्या आरोपांना आज ॲड. रमाकांत खलप यांनी उत्तर देत भाजपवरच पलटवार केला.

आणखी वाचा:

गोव्यात दुपारी १२ वाजेपर्यंत २६.३२ टक्के मतदानाची नोंद -

भाजपचे माजी खासदार नरेंद्र सावईकर यांनी स्व. मनोहर पर्रिकरांचा "मी पणा" व "अहंकार" यामुळे  एकाएकी खाण व्यवसाय बंद करण्याचा त्यांनी घेतलेला निर्णय, सर्वोच्च न्यायालयात गोव्यातील खाणी पूढे बंदच ठेवण्यास विरोध न करणे  तसेच पर्रिकर-पार्सेकरांनी केलेल्या  ८८ खाण पट्ट्यांचे बेकायदा  नुतनीकरण यामुळेच गोव्यातील अर्थव्यवस्थेचा कणा मोडला हे मोठ्या मनाने मान्य करायला हवे होते असे माजी केंद्रीय मंत्री ॲड. रमाकांत खलप यांनी म्हटले आहे.

गोव्याचे लोकायुक्त न्यायमूर्ति पी. के. मिश्रा यांनी भाजप सरकारच्या २०१२ ते २०२० या काळातील राजवटीतील मुख्यमंत्री, इतर मंत्री व उच्च पदस्थ अधिकारी यांचा सहभाग असलेल्या २१ भ्रष्टाचाराच्या प्रकरणांचा अहवाल  सरकारकडे पाठवुन त्यावर सीबीआय व इतर यंत्रेणेकडुन चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आजपर्यंत त्यावर कोणताच निर्णय घेतलेला नाही अशी टीका ॲड. रमाकांत खलप यांनी केली.

कॉंग्रेस पक्षाला काहीच लपवायचे नसुन, आम्ही वारंवार मागणी करुनही सरकार सर्व तथ्ये व आकडेवारी यासह राज्याची अर्थव्यवस्था, म्हादई, कोविड महामारी, कोळसा हाताळणी, पर्यावरणास मारक तिन प्रकल्प यांवर श्वेतपत्रीका काढण्यास घाबरत आहे. सरकारने हिम्मत दाखवुन सत्य लोकांसमोर ठेवावे अशी मागणी खलप यांनी केली.

ज्या लोक लेखा समितीच्या अहवालाचा स्व. मनोहर पर्रिकरांनी बाऊ केला होता व कॉंग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री दिगंबर कामत यांच्यावर आरोप केले होते, तो तथाकथीत लोक लेखा समितीचा अहवाल भाजप लोकांसमोर ठेवण्याची हिम्मत का दाखवित नाही असा प्रश्न ॲड. रमाकांत खलप यांनी विचारला आहे.

गोवा पोस्टल चा ख्रिसमस निमित्त विशेष स्टॅम्प -

स्व. मनोहर पर्रिकर यांनी यू-टर्न घेण्याची व लोकांच्या भावनांशी खेळून राजकीय स्वार्थ साधण्याची  कला आत्मसात केली होती.  माध्यम प्रश्न, कॅसिनो, सेझ प्रवर्तकांना दिलेले व्याज यावर पर्रिकरांनी घेतलेले यू-टर्न गोमंतकीय कधीच विसरणार नाहीत असे ॲड. रमाकांत खलप म्हणाले.

पाटो-पणजीच्या स्पेसिस इमारतीला भाड्यापोटी कोट्यावधी रुपये फेडण्याचा निर्णय, इफ्फिची कंत्राटे व पणजी पे पार्कींग कंत्राटदाराच्या भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत पर्रिकरांनी सरकारी तिजोरी रिकामी केली हे उघड सत्य आहे.

मांडवी नदीवरील अटल सेतू विद्यूतीकरण कामांसाठी टाकलेले वीज खांबाचा भ्रष्टाचार तसेच सदर पूलाला गेलेले तडे व रस्त्याला पडलेले खड्डे हे पर्रिकरांच्या कारकिर्दीतील भ्रष्टाचाराचे  ज्वलंत पुरावे आहेत असा दावा खलप यांनी केला.

भाजप सरकारने आता इतरांना दोष न देता, सन २०१२ पासुन आजपर्यंत केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड लोकांसमोर ठेवावे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी हिम्मत व धमक दाखवुन लोकायुक्तांनी शिफारस केलेल्या २१ भ्रष्टाचार प्रकरणांची चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी ॲड. रमाकांत खलप यांनी केली आहे.

संबंधित बातम्या