गोव्यातील शेतकऱ्यांच्या ऊसाला मिळणार प्रतिटन तीन हजारांचा भाव

दैनिक गोमंतक
शनिवार, 21 नोव्हेंबर 2020

गेल्यावर्षी देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सरकार कायमचा बंद करणार नाही, यासाठी सरकारने शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे.

पणजी : गेल्यावर्षी देखभाल व दुरुस्तीअभावी बंद पडलेला संजीवनी सहकारी साखर कारखाना सरकार कायमचा बंद करणार नाही, यासाठी सरकारने शेतकऱ्यांशी संवाद सुरू केला आहे. कृषी खात्याचा ताबा असलेले उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी आज धारबांदोडा येथील या कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. यावेळी कारखाना सुरू करण्यासाठी नेमलेल्या समितीचे अध्यक्ष माजी खासदार नरेंद्र सावईकर त्यांच्यासोबत होते. यंदा शेतकऱ्यांना टनामागे तीन हजार रुपयांचा भाव सरकार देणार आहे.

राज्यात पेडणे, डिचोली, सत्तरी, सांगे, केपे आणि काणकोण तालुक्याच्या काही भागात ऊस लागवड केली जाते. सांगे तालुक्यात सर्वाधिक ऊस लागवड होते. गेल्या वर्षी कारखान्यात गाळप सुरू न झाल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते. त्यानंतर सरकारने ऊस तोड करून तो कारखान्यापर्यंत आणल्यानंतर सरकारी खर्चाने तो ऊस खुपूटगिरी खानापूर येथील लैला साखर कारखान्यात पाठवला होता. यंदाही सरकार तसे करणार का? अशी विचारणा शेतकरी करत होते.

शेतकऱ्यांकडे संवाद सुरू
हा कारखाना सुरवातीला सहकार खात्याच्या अख्यत्यारीत येत होता. सहकारमंत्री गोविंद गावडे यांनी हा कारखाना आता सुरू करताच येणार नाही, असे जाहीर केल्यानंतर शेतकरी संभ्रमित झाले होते. त्याचे पडसाद काँग्रेसने सांगे परिसरात घेतलेल्या शेतकरी मेळाव्यातही उमटले होते. अखेर सांगे शेजारील केपे मतदारसंघाचे प्रतिनिधित्‍व करणारे उपमुख्यमंत्री कवळेकर यांनी यात लक्ष घातले. त्यांनी हा कारखाना सहकार खात्याकडून कृषी खात्याकडे वर्ग करून घेतला आणि शेतकऱ्यांशी संवाद साधणे सुरू केले. त्यांनी शेतकरी व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या बैठकाही घडवून आणल्या. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या कारखान्याचा प्रश्न मार्गी लावून कारखाना सुरू करण्यासाठी माजी खासदार आणि गोवा बागायतदारचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. त्यानंतर हा दौरा आज आयोजित करण्यात आला होता.

कारखाना बंद होणार नाही : कवळेकर
चया भेटीवेळी सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक प्रभू पाऊसकर, कृषी खात्याचे संचालक नेविल आफोन्सो यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते. उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी कारखाना फिरून पाहणी केली. यावेळी कारखान्यातील कामगार व जमलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की, कुठल्याही परिस्थितीत कारखाना बंद केला जाणार नाही. मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी हल्लीच जाहीर केल्याप्रमाणे संजीवनी साखर कारखाना परत रीतसर सुरू करण्यात येणार आहे. तसेच कामगारांच्या पगारासंबंधी तक्रारीही दूर केल्या जाणार आहेत. ॲड. सावईकर आणि पाऊसकर यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या कारखाना चालू करण्याच्या निर्णयाचे स्वागत केले.

कारखान्‍याच्‍या आवारात गूळ उत्‍पादन : सावईकर
समितीचे अध्यक्ष ॲड. नरेंद्र सावईकर यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचे साडेचार हजार कुटुंबीय आणि कर्मचाऱ्यांचे साडेपाचशे कुटुंबीय थेटपणे कारखान्यावर अवलंबून आहेत. याशिवाय ऊस तोडणी कामगार, वाहतुकदार, कारखाना परिसरातील दुकानदार, गिरणीचालक, घर भाड्याने देणारे अशा सर्वांसाठी कारखाना आधार आहे. तो सरकार हिरावून घेणार नाही. कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी चांगल्या वाणाच्या ऊसाची लागवड शेतकऱ्यांनी करावी यासाठी ऊसाचा बगीचा कारखान्यासमोरील जागेत करण्यात येणार आहे त्याशिवाय कारखान्याच्या आवारात गूळ उत्पादन करण्याचा छोटा प्रकल्प घालण्याचा विचार आहे. इथेनॉल, मद्यार्क आदींचेही उत्पादन घेण्यात येणार आहे.

आणखी वाचा;

गोव्यात आजपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू - 

 

संबंधित बातम्या