गोवा सरकारची जाहिरातबाजी वादात; शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त उल्लेख

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 2 एप्रिल 2021

पर्यटन वाढीसाठी जाहिरातबाजी करताना कशाचेही भान न बाळगता गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना आक्रमक असे संबोधले आहे. यामुळे गोवा सरकारची पुरती नाचक्की झाली असून समाज माध्यमावर सरकारची अक्कल काढण्यात येत आहे.

पणजी: पर्यटन वाढीसाठी जाहिरातबाजी करताना कशाचेही भान न बाळगता गोवा सरकारच्या पर्यटन खात्याने छत्रपती शिवाजी महाराज यांना 'INVADER' असे संबोधले आहे. यामुळे गोवा सरकारची पुरती नाचक्की झाली असून समाज माध्यमावर सरकारची अक्कल काढण्यात येत आहे. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी सरकारने या प्रकरणी कोण दोषी आणि त्याला कोणती कारवाई केली ते जाहीर करावे अशी मागणी केली आहे. गोव्याच्या भाजप सरकारच्या या पोर्तुगीजधार्जिणेपणाचा निषेध होत असून सरकारला याचा समाज माध्यमावर आता जाब विचारण्यात येत आहे.

गोवा सरकारने पर्यटकांसाठी जाहिरातबाजी करताना केलेल्या चुकीमुळे गोवा सरकारला टीकेचे धनी व्हावे लागले आहे. ही चुक नेमकी कोणी केली याचा शोध घेऊन त्याला शासन करावे अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

संगीतरजनी, पार्ट्यांकडे गोवा प्रशासनाचे दुर्लक्ष 

उत्तर गोव्यातील आग्वाद किल्ल्याची जाहिरातबाजी करताना या किल्ल्याने पोर्तुगीजांचे मराठा आक्रमकांपासून रक्षण केले अशी जाहिरातबाजी पर्यटन खात्याने केली होती. आग्वाद किल्ला हा उत्तर गोव्यातील एक पर्यटन स्थळ आहे. अलीकडेच त्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे आणि पर्यटकांसाठी तो खुला करण्यात आलेला आहे. त्याची जाहिरातबाजी करताना सरकारने मराठा शासकांना आक्रमक असे संबोधले आहे. वास्तविक पोर्तुगीजांच्या कह्यातून यातून गोवा मुक्त करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर त्यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज यांनी गोव्यावर स्वार्‍या केल्या होत्या. त्यानी पोर्तुगिजांना सळो कि पळो करून सोडले होते. एक वेळा तर  मोगलांचे आक्रमण झाले म्हणून छत्रपतींच्या फौजांना परत फिरावे लागले होते अन्यथा त्याच वेळी पोर्तुगिजांच्या तावडीतून गोवा मुक्त झाला असता.

हा इतिहास असतानाही पोर्तुगीज धार्जिणे पणा करून मराठी शासकांना आक्रमक म्हणून समजल्या बद्दल गोवा सरकारची समाज माध्यमावर निंदानालस्ती होऊ लागलेली आहे. पर्यटन खात्याने तत्काळ आपल्याला डच आक्रमक असे म्हणायचे होते असा खुलासा केला असला तरी हा वाद आता शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. गोवा सरकारने शिवजयंतीनिमित्त कळंगुट येथे काढण्यात येणारी फेरी रोखण्याचा प्रयत्न यापूर्वी केला होता, मात्र राज्यभरातील शिवछत्रपती प्रेमींनी सरकारचा हा प्रयत्न हाणून पाडत हजारोंच्या संख्येने मोठी फेरी काढून दाखवली होती.

गावठी मिठाची विक्री थंडावली; व्यावसायिक ग्राहकांच्या प्रतीक्षेत 

विरोधीपक्षनेते दिगंबर कामत यांनी गोव्यातील भाजपचे सरकार आता नव्याने इतिहास लिहू लागले आहे, ते छत्रपती शिवाजी महाराजांना आक्रमक संबोधू लागले आहे ,यावरून भाजपाचे इतिहास प्रेम किती सच्ची आहे हे दिसून येते अशी टीका केली आहे. समाज माध्यमावर सरकार वरील टीकेचा पाऊस आता सुरू झाला आहे पर्यटन खात्याने दिलगिरी व्यक्त केली तरी सरकारवरील टीका थांबलेली नाही, हा वाद आणखीन वाढण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, ही चूक नेमकी कोणी व कशासाठी केली याची चौकशी आता सरकारने उच्च पातळीवर सुरू केलेली आहे.

संबंधित बातम्या