केंद्र सरकारच्या आदेशनानंतरही गोवा सरकारचे सीमा खुल्या न करण्याचे धोरण

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 29 ऑगस्ट 2020

कारवारमधील विद्यार्थी उद्या पोळे येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातही गोव्याने सीमा खुल्या न केल्याने अस्वस्थता आहे.

पणजी, कारवार: गोव्याच्या केरी, पत्रादेवी, दोडामार्ग, पालये, न्हयबाग आणि पोळे येथील सीमा खुल्या कराव्यात, यासाठी सरकारवर वाढता दबाव आहे. कारवारमधील विद्यार्थी उद्या पोळे येथे रास्ता रोको आंदोलन करणार आहेत. सिंधुदुर्ग आणि बेळगाव जिल्ह्यातही गोव्याने सीमा खुल्या न केल्याने अस्वस्थता आहे. गोव्यात जाणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा रोखण्याची तयारी त्या भागात सुरू झाली आहे. देशभरात राज्यांनी आपल्या सीमा केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर खुल्या केल्या असताना गोवा सरकार आठमुठे धोरण का अवलंबिते? असा प्रश्न विचारला जात आहे.

राज्य सरकारने राज्यात येणाऱ्यांसाठी ई पासची सक्ती हटवली, तरी येणाऱ्या व्यक्तीने आपणाला कोविडची लागण झाली नसल्याचे ४८ तास आधी घेतलेले प्रमाणपत्र सोबत आणावे, किंवा दोन हजार रुपये शुल्क भरून चाचणी करून घ्यावी किंवा १४ दिवस गृह अलगीकरणात राहावे, अशा अटी कायम ठेवल्या आहेत. शेजारील भागातील जनता या ना त्या कारणास्तव दररोज गोव्यात ये - जा करत असते. त्यांना सीमाबंदीचा फटका बसत आहे. 

त्याशिवाय पेडणे, डिचोली, काणकोण तालुक्यातील लोकांचे सिंधुदुर्ग आणि कारवारमध्ये दररोजचे जाणे येणे असते. त्यांना या अटी जाचक वाटू लागल्या आहेत. सरकारच्या सीमा खुल्या करणार नाही, या हट्टामुळे राज्यात आणि राज्याबाहेर सरकारविषयी असंतोष वाढू लागला आहे. 

कारवार येथे आज रास्‍ता रोको
कारवारचे माजी आमदार सतीश सैल यांनी माजाळी येथे ३१ ऑगस्ट रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला. त्यानंतर कारवारच्या भाजपच्या आमदार रुपाली नाईक यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी १ सप्टेंबरनंतर बैठक घेऊ त्यानंतर काही अटी शिथील करण्याचा विचार करू, असे आश्वासन दिल्याचे नाईक यांनी सैल यांना कळवले. यामुळे सैल यांनी ३१ रोजीचे आंदोलन तूर्त पुढे ढकलले. मात्र, कारवारच्या वक्रतुंड विद्यार्थी संघटनेने उद्या (ता.२९) माजाळी येथे सकाळी रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवलेे. या संघटनेचे अध्यक्ष राघू नाईक यांनी सांगितले की, १ सप्टेंबरपासून गोव्यात विनाअट प्रवेश देण्यात येईल, या आश्वासनासाठी हे आंदोलन आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या