गोव्यातील संपूर्ण दिव्यांगांसाठी ‘खास परिचय पत्र’ देण्याची व्यवस्था

दैनिक गोमन्तक
शनिवार, 5 डिसेंबर 2020

समाज कल्याण खाते आणि केंद्रीय समाज न्याय खाते आणि भारत सरकारच्या दिव्यांग विकास खाते या तिन्ही खात्याच्या सहकार्याने गोव्यातील संपूर्ण दिव्यांगांसाठी ‘खास परिचय पत्र’ देण्याची व्यवस्था करण्यात येईल.

पर्वरी: समाज कल्याण खाते आणि केंद्रीय समाज न्याय खाते आणि भारत सरकारच्या दिव्यांग विकास खाते या तिन्ही खात्याच्या सहकार्याने गोव्यातील संपूर्ण दिव्यांगांसाठी ‘खास परिचय पत्र’ देण्याची व्यवस्था करण्यात येईल. यासाठी जिल्हाधिकारी आणि इतर संबंधित खात्यांना सूचना देणार येतील. 

येत्या तीन महिन्यात प्रत्येक दिव्यांगांपर्यंत त्यांना आवश्यक असलेली साधनसुविधा कशी मिळेल, याची माहिती घेण्यासाठी बाराही तालुक्यात शिबिरे आयोजित करण्यात येणार असून दिव्यांगांसाठी सर्व सरकारी योजना आणि मोफत साधनसुविधा शंभर टक्के त्यांच्यापर्यंत पोहोचाव्या असा संकल्प, आजच्या जागतिक पर्यावरणदिनानिमित्त आम्ही करीत आहोत, असे उद्‍गार मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी (ता. ४) येथील संजय स्कूलमधील ज्ञानवर्धिनी दिव्यांग प्रशिक्षण महाविद्यालयाच्या उद्‍घाटन प्रसंगी काढले.

दिव्यांगांसाठी जी जिल्हास्तरीय चिकित्सा केंद्र आहेत, ती तालुका पातळीवर करण्यात यावी, अशी संजय स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर यांनी केली आहे. त्याचाही विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यानी पुढे सांगितले. दिव्यांगांसाठी सर्व तऱ्हेच्या सरकारी योजना आणि  साधनसुविधा पुरविणे  तसेच त्यांचा भावी काळ सुरक्षित राहावा, याबद्दल सरकार काळजी घेईल, असेही त्यांनी पुढे सांगितले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त संजय स्कूलमधील कार्यक्रमात दिव्यांगांसाठी महाविद्यालयाच्या उद्‍घाटनप्रसंगी मनोहर पर्रीकर मेमोरियल सभागृहात संजय स्कूलतर्फे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

प्रारंभी "माणसाने माणसासारखे वागावे आणि माणसासंग रहावे" या गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली मुख्यमंत्री  सावंत आणि मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्याच्या हस्ते  "ज्ञानवर्धिनी दिव्यांग प्रशिक्षण महाविद्यालया"चे उद्‍घाटन करण्यात आले. व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांसह संजय स्कूलचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर, उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, गोवा विद्यापीठाचे व्ही. पिंटो, समाज कल्याण खात्याचे संचालक उमेशचंद्र जोशी, कुंदा चोडणकर, मित्तल आमोणकर, आणि  संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी संध्या काळोखे यांनी मुख्यमंत्र्याकडे दिव्यांगांसाठी खास शिक्षण पद्धतीबद्दल माहितीपत्र सादर केले. 

समाज कल्याण खात्याचे संचालक जोशी यांनी प्रास्ताविक आणि उपस्थितांचे स्वागत केले. अध्यक्ष पावसकर यांनी संस्थेची संपूर्ण माहिती सांगितली. यावेळी कुंदा चोडणकर आणि प्रसाद लोलयेकर यांनी आपले विचार मांडले. यावेळी दिव्यांगांना भेटवस्तू देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. सूत्रसंचालन दुर्गेश माजिक आणि स्कार्लेट गोन्साल्विस यांनी केले तर मित्तल आमोणकर यांनी आभार मानले.  संस्थेचे अध्यक्ष गुरुप्रसाद पावसकर यांच्या वाढदिनानिमित्त केक कापण्यात आला.

 

संबंधित बातम्या