
नवा झुआरी पूल पूर्णत्वास येत आहे खरा; परंतु कधी एकदा 29 तारीख उजाडतेय आणि तो वाहतुकीस खुला होतोय, असे हजारो वाहनचालकांना झाले आहे. गेल्या तीन दिवसांपासून दक्षिण गोव्यात जाणाऱ्या मार्गावर कुठ्ठाळी येथे सतत वाहतूक कोंडी होत आहे. मंगळवारी या कोंडीचा फटका राज्यपालांनाही बसला.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नव्या झुआरी पुलावर सायंकाळच्या वेळी नागरिकांना प्रवेशाची मुभा दिल्यानंतर कुठ्ठाळी भागात लोकं वाहने ठेवून पुलावर जात आहेत. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून सायंकाळनंतर वाहतुकीचे तीन-तेरा वाजत आहेत. मंगळवारी सकाळपासून कुठ्ठाळी भागात वाहतूक कोंडी सुरू झाली. सर्व लेनमध्ये वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहावयास मिळाल्या. वाहतूक पोलिसांचे पूर्ण नियंत्रण सुटल्याचे जाणवले.
राज्यपालांना ‘नो एन्ट्री’मधून वाट
आगशी-कुठ्ठाळी महामार्गावरून मंगळवारी सायंकाळी 4.53 वाजता राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई हे दोनापावल येथून वास्कोच्या दिशेने जात होते. त्यामुळे काही वाहने त्यांच्या पोहचण्याच्यावेळी थांबवून ‘नो एन्ट्री’ मधून या ताफ्याला वाट करून देण्यात आली. या पोलिसांनी केलेल्या तत्परतेप्रमाणे सामान्य लोकांना होणारे त्रास पोलिसांना दिसत नसल्याबद्दल वाहन चालकांमध्ये रोष दिसत होता.
नवा पूल नागरिकांसाठी बंद
29 डिसेंबर रोजी होणाऱ्या नव्या झुआरी पुलाच्या उद्घाटनाच्या तयारीसाठी नागरिकांसाठी खुला केलेला पूल 28 डिसेंबर रोजी बंद होणार आहे. 30 डिसेंबरपासून पूल वाहनांसाठी खुला करण्यात येणार आहे. उद्घाटनानंतर या पुलावरील वाहनांची वेगमर्यादा 40 किलोमीटर प्रतितास निश्चित करण्यात आली आहे.
रुग्णवाहिकांना फटका
वाहतूककोंडीचा फटका रुग्णवाहिकांना बसत आहे. मंगळवारीही त्याचा प्रत्यय आला. एक रुग्णवाहिका बराचकाळ वाहतूककोंडीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करत होती. अशा स्थितीत एखाद्या अत्यवस्थ रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याला जबाबदार कोण?, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.
वाहतूक पोलिस म्हणतात...
* वाहतूक कोंडीबाबत वाहतूक पोलिस अधीक्षक बोसुएट सिल्वा यांनी स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, गेल्या काही दिवसांपासून वाहने घेऊन येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढली आहे. ठिकठिकाणी महामार्गाचीही कामे सुरू आहेत.
* सध्या लोकांना या पुलावर चालत जाण्यास व आस्वाद घेण्यास सरकारने मुभा दिली आहे. हे लोक वाहने रस्त्याच्या बाजूला उभी करत आहेत. जुन्या झुआरी पुलावर होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे मागे-पुढे वाहने करताना किरकोळ अपघात घडत आहेत.
* काही गाड्या पुलावर बंद पडल्याने ही वाहतुकीची कोंडी गेल्या काही दिवसांपासून होत आहे. ब्रेकडाऊन झालेली वाहने बाजूला करण्यासाठी तसेच अपघातांचा पंचनामा करताना पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.