बहुजन समाजातील व्यक्तीला सन्मान मिळाल्यानेच ढवळीकरांचा थयथयाट!

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

सुदिन ढवळीकर यांनी भाजपकडून घराणेशाही चालल्याचा आरोप प्रसार माध्यमातून केला आहे, तो निखालस खोटा आहे.  विद्या गावडे यांच्या कार्यामुळेच त्यांना सरकारने हे पद दिल्याचे प्रदीप शेट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

फोंडा: राज्य सरकारच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी बहुजन समाजातील विद्या गावडे यांची भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलेली निवड ही सार्थ असून एका परीने बहुजन समाजाचा हा सन्मान असल्याचे सांगून ही निवड मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या डोळ्यांना खुपत असल्यानेच त्यांनी थयथयाट चालवला असल्याचा आरोप मडकई भाजप मंडळाचे अध्यक्ष प्रदीप शेट यांनी केला. मडकई भाजप मंडळाच्या पत्रकार परिषदेत हा आरोप करण्यात आला असून यावेळी मंडळाचे संतोष रामनाथकर, जयराज नाईक, सुभाष गावडे व सुरेखा गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

सुदिन ढवळीकर यांनी भाजपकडून घराणेशाही चालल्याचा आरोप प्रसार माध्यमातून केला आहे, तो निखालस खोटा आहे.  विद्या गावडे यांच्या कार्यामुळेच त्यांना सरकारने हे पद दिल्याचे प्रदीप शेट यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. भाजपचे नेते तथा माजी सभापती विश्‍वास सतरकर हे सध्या गोवा राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष असून त्यांच्याच भगिनी असलेल्या विद्या गावडे यांना महिला आयोगाचे अध्यक्षपद दिले असले तरी एका ग्रामीण भागातील महिलेचा हा सन्मान असल्याचे प्रदीप शेट म्हणाले. 

विद्या गावडे यांनी महिला आयोगाचे अध्यक्षपद भूषवल्यामुळे बहुजन समाजातील व्यक्तीचा हा सन्मान असून मडकई मतदारसंघातील बहुजन समाजाच्या व्यक्तीला अशाप्रकारचा सन्मान मिळवून देण्यासाठी आमदार सुदिन ढवळीकर यांनी कोणताच प्रयत्न केला नाही. सरकारमध्ये सामील असताना मडकईतील अशा प्रस्तावाना सुदिन ढवळीकर यांनी विरोधच केला. मडकई भाजप मंडळही सरकारमध्ये बेबनाव नको, म्हणून गप्प राहिले. आता सुदिन ढवळीकर यांना सरकारमधून काढून टाकल्याने खऱ्या अर्थाने मडकई मतदारसंघातील बहुजन तसेच अनुसुचित जाती जमातीच्या लोकांना न्याय मिळत असल्याचेही प्रदीप शेट यांनी सांगितले.

यावेळी जयराज नाईक यांनी मुख्यमंत्र्यांवर बेछूट आरोप करणाऱ्या सुदिन ढवळीकर यांचा निषेध केला. सुरेखा गावडे यांनीही आपल्या समाजाला मिळालेला हा सन्मान असल्याचे नमूद केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या