‘गिरीतील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला न दिल्यास रस्त्यावर उतरणार’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

म्हापसा ते पणजी हमरस्त्यासाठी स्वतःची शेतजमीन दिलेल्या गिरी पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या शेतजमिनीचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी असून त्यांची उरली सुरली रस्त्याशेजारची शेती मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचे उत्तर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस भोलानाथ घाडी यांनी सांगितले.

शिवोली: म्हापसा ते पणजी हमरस्त्यासाठी स्वतःची शेतजमीन दिलेल्या गिरी पंचायत क्षेत्रातील शेतकऱ्यांना अद्याप त्यांच्या शेतजमिनीचे पैसे मिळाले नसल्याच्या तक्रारी असून त्यांची उरली सुरली रस्त्याशेजारची शेती मोठ्या प्रमाणात नष्ट झाल्याचे उत्तर गोवा काँग्रेसचे सरचिटणीस भोलानाथ घाडी यांनी सांगितले. या गोष्टीची दखल घेत स्थानिक प्रशासनाने लवकरात लवकर शेतकऱ्यांना भरपाई न दिल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 

राष्ट्रीय हमरस्ता ६६ तयार करण्यासाठी गिरी पंचायत क्षेत्रातील शंभरेक शेतकऱ्यांनी स्वतःची शेतजमीन कुठलाही अडथळा निर्माण न करता सरकारच्या ताब्यात दिली होती. मात्र, हमरस्ता बनून फ्लायओवरसुद्धा तयार झाला, वाहतुकीत सुसूत्रता आली, परंतु शेतकऱ्यांनी हमरसस्त्यासाठी दिलेल्या जमिनीचा मोबदला अद्याप त्यांच्या हाती न पडल्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली आहे.  

यंदा मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने हमरस्त्याशेजारची माती मोठ्या प्रमाणात जवळच्या शेतात घुसली आहे. त्यामुळे दुष्काळात तेरावा या म्हणीप्रमाणे उरल्या सुरल्या शेतीचीही नासाडी झाल्याचे यावेळी स्थानिक शेतकरी समीर नाईक, गुरुदास लोटलीकर आदी शेतकऱ्यांनी सांगितले.  

महिन्याभरात सरकारी यंत्रणेकडून गिरीतील शेतकऱ्यांना भरपाई न मिळाल्यास स्थानिक शेतकऱ्यांच्या सहकार्याने रस्त्यावर उतरण्याचा इशारा भोलानाथ घाडी व स्थानिकांनी दिला आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या