राज्यातील ‘कोविड’  रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.४० टक्के: विश्‍वजित राणे

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

राज्यातील मृत्यूचे प्रमाण १ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.४० टक्के असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले.

पणजी: कोरोना झालेल्या व इतर आजारही असलेल्या अतिशय गंभीर रुग्णांसाठी जाहीर केलेल्या गोमेकॉतील तिन्ही वॉर्ड सोमवारपासून कार्यान्वित होतील. सध्या ठिकाणी सर्वोच्च आणि सर्व सुविधा उपलब्ध असणार आहेत. या ठिकाणी ११३ गंभीर रुग्णांना त्वरित या ठिकाणी स्थलांतर केले जाईल, अशी माहिती आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली. दरम्यान, राज्यातील मृत्यूचे प्रमाण १ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७९.४० टक्के असल्याची माहिती गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवानंद बांदेकर यांनी स्पष्ट केले.

कोरोनाविषयी तज्‍ज्ञांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीविषयी माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आरोग्‍यमंत्री बोलत होते. यावेळी त्‍यांच्‍यासमवेत डॉ. डिसा, डॉ. उत्कर्ष, डॉ. उदय काकोडकर यांची उपस्थिती होती. 

राणे म्हणाले की, मागील बैठकीनुसार कोणत्या सुविधांचा अंतर्भाव करण्यात आला, याचा आजच्या बैठकीत आढावा घेण्‍यात आला. यापूर्वी सांगितल्यानुसार गोमेकॉमध्ये अतिशय गंभीर असलेल्या रुग्णांना ईएसआय हॉस्पिटलमधून स्थलांतर केले जाणार आहे. त्यासाठी १४५, १४६ आणि १४७ तीन वॉर्ड आम्ही राखीव ठेवले आहेत. आयसीयूची आणखी गरज वाटत असून, या ठिकाणी काम करणाऱ्या डॉक्टर व इतर कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे, हे दिसून आले आहे. जो अतिरिक्त स्टाफ भरला जाणार आहे, त्याविषयी मुख्यमंत्र्यांकडे चर्चा करून त्यास मान्यता घेऊन ती पदे भरली जातील. आयसीयूसाठी प्रशिक्षित परिचारिका कमी पडत आहे. तिही पदे भरण्यासाठी चर्चा केली आहे. त्याचबरोबर सध्या अनेक रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू लागल्याने आणखी ऑक्सिजनच्या मशिनची आवश्‍यकता जाणवू लागली आहे. कारण कोणत्याही स्थिती ऑक्सिजनची कमतरता भासू नये, यासाठी आम्ही लक्ष केंद्रीत केले आहे. 

सोडेक्सोकडून जेवण
ईएसआय हॉस्पिटलमध्ये आम्ही बाहेरील जेवण घेणे बंद केले असून, सोडेक्सोकडून जेवण घेण्यास सुरवात केली आहे. ईएसआय हॉस्पिटलमध्ये रुग्णाला भेटण्यासाठी जे नातेवाईक येतात, त्यांच्यासाठी एक पास दिला जाईल आणि त्याला पीपीई किटची सक्ती असेल. याप्रसंगी आम्ही खासगी रुग्णालयात चार व्हेंटिलेटरही पुरविल्याचे राणे यांनी सांगितले. आरोग्य खाते जे साहित्य खरेदी करीत आहे, ते दर्जेदार आहेत, असे आरोग्‍यमंत्री राणे म्‍हणाले. 

दुसऱ्याचा जीव वाचवा : आरोग्‍यमंत्री
केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांच्यावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आल्याने त्यांची प्रकृती सुधारल्याची माहिती आज आरोग्य मंत्र्यांनी दिली. कारण प्लाझ्माची गरज किती महत्त्वाची आहे, हे पटवून देताना त्यांनी आयुषमंत्री नाईक यांचे उदाहरण दिले. गोमेकॉमध्ये सध्या केवळ १४ प्लाझ्मा पॅक शिल्लक असून, आत्तापर्यंत ६१ रुग्णांना प्लाझ्मा देऊन बरे करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना रुग्णाला केवळ त्यातून उपचार घेतलेल्याच रुग्णाचा प्लाझ्मा उपयोगी पडत आहे. त्यामुळे राज्यातून आत्तापर्यंत जे रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, त्यांनी प्लाझ्मा देण्यास पुढे यावे आणि इतर रुग्णांचा जीव वाचवावा, असे आवाहन राणे यांनी केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या