मुसळधार पावसाने डिचोलीला झोडपले; नद्या भरल्या, बहुतेक भागात जलमय स्थिती

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

डिचोलीसह साखळी आणि अन्य भागात सर्वत्र नदीकाठी पाणीच पाणी झाले आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. आजच्या पावसामुळे सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. विविधठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.

डिचोली: मागील आठवड्यापासून सक्रिय झालेल्या पावसाने कहर करताना आज डिचोलीतील बहुतेक भागाला झोडपून काढले व जनजीवन पूर्णतया विस्कळित करून सोडले. आजच्या मुसळधार पावसामुळे डिचोलीसह साखळीतील वाळवंटी आणि अस्नोड्यातील पार नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. साळ गावातून वाहणाऱ्या शापोरा नदीच्या पाण्याची पातळीही किंचित वाढली असली, तरी परिस्थिती धोक्‍याबाहेर आहे. 

डिचोलीसह साखळी आणि अन्य भागात सर्वत्र नदीकाठी पाणीच पाणी झाले आहे. ग्रामीण भागातही असेच चित्र दिसून येत आहे. आजच्या पावसामुळे सर्वत्र जलमय स्थिती निर्माण झाली आहे. विविधठिकाणी रस्ते पाण्याखाली गेले आहेत.  शहर तसेच अन्य भागांतील रस्त्यावर माती केरकचरा वाहून आल्याने चिखलमय स्थिती निर्माण झाली आहे. जनजिवनावरही पूर्णतया परिणाम झाल्याचे जाणवत आहे. सखल भागातील काही घरांनीही पाणी घुसल्याचे वृत्त आहे. शेतीही पाण्याखाली आली आहे. जोरदार पडलेल्या पावसामुळे डिचोलीतील काही भागात झाडांची किरकोळ पडझड झाल्याचे वृत्त आहे. मात्र ,या पडझडीत मोठी हानी झाली नसल्याची माहिती डिचोली अग्निशमन दलाकडून मिळाली आहे. दरम्यान, गावठण-साखळी येथे एका महिलेच्या मातीच्या जुनाट घराची पडझड झाली. 

पाण्याची पातळी वाढली
मागील आठवड्यात दोन दिवस संततधार पाऊस पडल्यानंतर काल रात्रीपासून पावसाचा जोर वाढला. आज सकाळी तर मुसळधार पावसाला सुरवात झाली. दुपारपर्यंत पावसाचा जोर होता. पावसामुळे साखळीतील वाळवंटी नदीच्या पाण्याची पातळी वाढताना. ही नदी ओसंडून वाहत आहे. दुपारपर्यंत पाण्याची पातळी ३.८५ मीटर एवढी झाली होती. आपत्ती टाळण्यासाठी जलसंपदा खात्याच्या सहकार्याने वाळवंटी नदीकाठी पंम्पिंगव्दारे पाणी सोडण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. अशी माहिती जलसंपदा खात्याकडून मिळाली आहे. डिचोलीतून वाहणाऱ्या नदीच्या पाण्याची पातळीही वाढली आहे. दुपारपर्यंत तर  दोन्ही पुलाच्या मध्यभागी असलेल्या सेतू संगम प्रकल्पापर्यंत पाणी पोचले होते. यावरुन पावसाचा अंदाज येतो. ४.२ मीटर ही डिचोलीतील नदीच्या पाण्याची धोक्‍याची पातळी आहे. वाळंवटीसह डिचोली नदीतील पाण्याची पातळी वाढली, तरी ती नियंत्रणात आहे. रात्री पावसाचा जोर वाढल्यास धोका उद्‌भवू नये, यासाठी आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सज्ज आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे  डिचोलीचे मामलेदार प्रवीणजय पंडित यांनी स्पष्ट केले आहे.

शेतकरी हवालदिल
ऐन भातशेती पिकाच्या तोंडावर पावसाने कहर केल्याने शेतकरी हवालदिल बनले आहेत. यावर्षी आतापर्यंत भातशेती चांगली बहरात आली होती. भाताची कणसेही धरली होती. मात्र कालपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विविध भागातील शेतीत पाणी भरल्याने भाताची रोपे आडवी झाली आहेत. यामुळे शेतकऱ्यांची अस्वस्थता वाढली असून, असाच मुसळधार पाऊस पडत राहिल्यास शेतीपिकाची नाशाडी अटळ आहे अशी भीती शेतकरी व्यक्‍त करीत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या