सांगे भागातील नदी-नाले तुडूंब; अनेक ठिकाणच्या बागायतींत पुराचे पाणी घुसले

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

काही ठिकाणी बागायती पाण्याखाली गेल्या आहेत, तर साळावली धरणाच्या पाण्यात आज बरीच वाढ झाल्याने संध्याकाळी सहापर्यंत पाण्याची उंची ४२.५८ मीटर इतकी नोंद झाल्याची माहिती जलसंपदा खात्याचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील दिवकर यांनी दिली आहे. 

सांगे: परतीचा पाऊस सुरू असतानाच पावसाने अचानक जोर धरल्याने नद्या, नाले परत एकदा तुडूंब भरून वाहू लागले आहेत. गेल्या तीन महिन्यात पाऊस पडून नद्या, नाल्यांना जितके पाणी आले नव्हते, त्यापेक्षा अधिक पाणी रात्रभर पडलेल्या पावसाने सांगे भागातील सर्व नद्या नाल्यांना पूर आला आहे. काही ठिकाणी बागायती पाण्याखाली गेल्या आहेत, तर साळावली धरणाच्या पाण्यात आज बरीच वाढ झाल्याने संध्याकाळी सहापर्यंत पाण्याची उंची ४२.५८ मीटर इतकी नोंद झाल्याची माहिती जलसंपदा खात्याचे कनिष्ठ अभियंता स्वप्नील दिवकर यांनी दिली आहे. 

कार रात्री आणि आज दिवसभर कोसळणाऱ्या पावसाच्या जोरदार सरींमुळे वातावरणात कमालीचा गारवा निर्माण झाला असून जनजीवन विस्कळित झाले आहे. ठिकठिकाणी नद्यांना पूर आल्याची माहिती मिळाली आहे. व्हालशे पुलावरून रात्री पाणी गेले. मात्र, दिवसभर वाहतुकीला कोणताही अडथळा निर्माण झाला नाही. पोत्रे नदीला पुराचे पाणी वाढल्याने सांगेतील प्रीती गावकर, सूर्याजी गावकर यांच्या बागायती पाण्याखाली गेल्या होत्या. 

उगे - सांगे येथे चिंचेचे झाड उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. अन्य ठिकाणी कोणत्याही पडझडीची माहिती मिळाली नाही. तासभर पावसाने उसंत घेताच नदीच्या पाण्याची पातळी घटली होती. संध्याकाळी उशिरा पाऊस थांबला होता, पण रात्री आठ वाजता पावसाने परत हजेरी लावली होती.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या