IFFI Goa 2022: इफ्‍फीमुळे नुकसान? 'खरी कुजबुज'

सरकार कुठे काम करते? पोलिस फक्त इफ्‍फी एके इफ्‍फी करताना दिसत होते.
IFFI 2022 |Goa News
IFFI 2022 |Goa NewsDainik Gomantak

एकदाचा यंदाचा इफ्‍फी संपला. शिमगा संपला तरी कवित्व उरते, तसे या इफ्‍फीचे कवित्व बरेच दिवस राहणार आहे. या इफ्‍फीमुळे प्रशासन संपूर्णपणे कोसळले होते. या काळात सरकार कुठे काम करते? पोलिस फक्त इफ्‍फी एके इफ्‍फी करताना दिसत होते.

नेहमीप्रमाणे बाहेरून सिक्युरिटी मागवली होती. त्यात परत या इफ्‍फीत गोमंतकीय कोठेच दिसत नव्हता. गोव्यात एकापेक्षा एक कलाकार, रसिक असताना नेहमीप्रमाणे केरळच्याच चित्ररसिकांचा वरचष्मा होता. इफ्‍फीमध्ये बिगर गोमंतकीयच अधिक रमलेले दृश्‍य दिसले. त्यामुळे इफ्‍फी गोव्याचा न वाटता ‘आयात’ केलेला इफ्‍फी वाटत होता.

इफ्‍फीमुळे निर्माण झालेल्या कचऱ्याचा त्रास मात्र आता पुढील बरेच दिवस पणजीकरांना सहन करावा लागणार आहे. पणजीमध्ये अनेक कलाकार, रसिक वास्तव्य करून आहेत. त्यांना 19 वर्षे पणजीत इफ्‍फी भरत असूनही अजून आपला कसा वाटत नाही, हा प्रश्‍नच आहे. मडगावकर रसिकांनीही यावर्षी इफ्‍फीकडे पाठ फिरविली.

गोबी मंच्युरियन जत्रोत्सवात नको

फोंड्यात सध्या जत्रोत्सवात गोबी मंच्युरियनचे स्टॉल थाटणाऱ्यांवर थेट कारवाई केली जात आहे. अन्न व औषध प्रशासन संचालनालयातर्फे ही कारवाई करण्यात येत असल्याने अनेकांनी या कारवाईचे स्वागतच केले आहे.

तसे पाहिले तर जत्रोत्सव म्हटल्यावर मिठाई ही आलीच. पण पूर्वीच्या काळी जत्रोत्सवात मिळणारे खाजे हे प्रसिद्ध होते. जत्रोत्सवाला गेल्यावर खाजे विकत घेतल्याशिवाय जत्रा परिपूर्ण होतच नसे. पण आता युवा वर्गाचा कल मंच्युरियन खाण्याकडे आहे.

त्याचा फायदा उठवत बिगर गोमंतकीय युपी व इतर राज्यातील लोकांकडून जत्रोत्सवात चक्क गोबी मंच्युरियनचे स्टॉल लावले जात आहेत, मात्र अस्वच्छ वातावरणात आणि अशुद्ध पाण्याचा वापर या गोबी मंच्युरियनात केला जात असल्याने आरोग्याच्यादृष्टीने ही कारवाई केली जात आहे. शेवटी आपले खाजे ते खाजे...बरोबर ना!

बाबूशचा सवता सुभा

क्लिनेथॉन रॅलीत अनेक मंत्री मान्यवर सहभागी झाले होते. व्यासपीठावर तर सगळेच चमकले. पण खरी कसोटी होती, प्रत्यक्ष कचरा गोळा करताना. रॅली सुरू झाली. तेव्हा महसूल मंत्री बाबू बाबूश मोन्सेरात हे पणजीतील काही नगरसेवक आणि इतरांसह एका बाजूला थांबले होते.

बराच वेळ त्यांची चर्चा सुरू रंगली. त्यावेळी बाबूशने रॅलीतून अंग काढले की काय? अशी चर्चा किनाऱ्यावर सुरू होती. शेवटी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना काही नेते मागेच राहणे पसंत करत होते.

कदाचित किनाऱ्यावरील दमट हवामानामुळे त्यांनी असे केले असावे, अशीही शंका काही जणांनी व्यक्त केली.

सागर किनारी फुलली हास्यकमळे

इफ्फीला जोडूनच आयोजिलेल्या क्लिनेथॉन रॅलीत उपस्थितांचे पुरेपूर मनोरंजन झाले ते जग्गूदादा म्हणजेच जॅकी श्रॉफ यांच्या दमदार हास्यकल्लोळाच्या सुरेख फटकेबाजीने. काय पात्रांव कशें आसा, असे कोकणातील काही वाक्ये उच्चारत त्यांनी गोमंतकीयांच्या काळजालाच हात घातला.

गायिका अमृता फडणवीस यांनी मजो गोयांचेर मोग आसा, अशी सुरुवात आणि शेवटी देव बरें करूं, अशा वाक्यांने भाषणाचा शेवट केला. हेमा सरदेसाई यांनी कोकणी गीत गाऊन कार्यक्रमाला चार चांद लावले. एकूणच ही रॅली मनोरंजनाची पर्वणी ठरली.

मग पोलिसांची गरज ती काय?

मडगाव जवळच्या रावणफोंड भागातील एटीएम मशीन चोरट्यांनी पळवून नेऊन ते फोडले व लाखोंची रक्कम पळवून नेल्यानंतर आता पोलिस यंत्रणेने बँकांना एटीएम केंद्रात सुरक्षा तैनात करण्यास सांगितले.

वरकरणी ही सूचना ठीक वाटत असली तरी एटीएम जवळ सुरक्षा रक्षक तैनात करणे, ही बँकांची जबाबदारी आहेच. पण पोलिसही आपल्यावरील जबाबदारी टाळत तर नाहीत ना, अशी चर्चा आता सुरू झाली आहे. यापूर्वी या यंत्रणेने मडगावातील सुवर्णकारांनाही सुरक्षा रक्षक, सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे बसविण्याची सूचना केली होती.

एरवी जरी ती ठीक असली, तरी एकप्रकारे त्याहून ही यंत्रणा आपली असमर्थताच दाखवून देते. कारण असे गुन्हेगार हे परप्रांतीय टोळीतील असतात, अशी टोळी राज्यात दाखल झाल्याची कोणतीच माहिती पोलिसांना मिळत नाही, हेच त्यातून सिध्द होते.

हैदराबादचे पोलिस गोव्यात येऊन येथील ड्रग्स व्यवसायाची पाळे-मुळे खणून काढू शकतात. गोव्याचे पोलिस या आंतरराज्य टोळीच्या गावात जाऊन त्यातील चोरट्यांना जेरबंद कसे करू शकत नाहीत.

किनारे स्वच्छ होणार!

राज्यातील किनारपट्टी स्वच्छ ठेवायला हवी, असे अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी जाहीरपणे सांगितले आणि गोव्यातील किनाऱ्याची स्थिती काय आहे? हे एखाद्या अभिनेत्याला सांगावे लागेल. यातून राज्याची पर्यटन स्थळांची स्थिती नेमकी काय आहे? याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला.

IFFI 2022 |Goa News
The Kashmir Files in IFFI 2022: 'द काश्मीर फाईल्स' वरील 'त्या' टिप्पणीचा सिनेकलाकारांकडून पुरता समाचार, म्हणाले....

राज्यातील पर्यटन बहरावे, असे प्रत्येक गोमंतकीयाला वाटते, पण स्वच्छतेच्या बाबतीत आपण कुठे आहोत, हा खरा प्रश्न आहे. त्यातल्या त्यात किनाऱ्यांच्या स्वच्छता मोहिमेत खुद्द मुख्यमंत्र्यांनी भाग घेतला, म्हणजे नजीकच्या काळात गोव्यातील किनारपट्टी चकाचक दिसेल, यात शंकाच नाही. काय म्हणता.... बरोबर ना...!

रितेशच्या अविश्‍वासामागे कोण?

फोंड्यात सध्या पालिकेच विद्यमान नगराध्यक्ष तथा कृषिमंत्री रवी नाईक यांचे पुत्र रितेश यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्‍वासाबाबत खमंग चर्चा सुरू आहे. वडील मंत्री असताना हा अविश्‍वास ठराव दाखल कसा झाला यावर उलटसुलट तर्क व्यक्त होत आहेत.

यामागे एक माजी नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा हात असल्याची वदंता आहे, तर यात म. गो. पक्षाचे सहा नगरसेवक असल्यामुळे डॉ. केतन भाटीकर हेही किंगमेकरच्या भूमिकेत असू शकतात, असेही बोलले जात आहे.

IFFI 2022 |Goa News
Goa Latest News: ‘बार्देश बाजार’चे चेअरमन धर्मा चोडणकर पायउतार

नाही तरी मागे नगरपालिकेने दुकानदारांचा कर अव्वाच्या सव्वा वाढल्यामुळे रितेश-भाटीकरांमध्ये चांगलीच जुंपली होती, पण हे रितेशला नव्हे तर रवींनाच आव्हान असल्याची सध्या फोंड्यात जोरदार चर्चा केली जात आहे.

‘ब’ गट नाट्यस्पर्धा आणि परीक्षक

यावर्षी गोवा कला अकादमीची ‘ब’ गट नाट्यस्‍पर्धा बरीच गाजली. यंदा बारा नाटके सादर झाली. त्यापैकी तीन नाटके नवीन पद्धतीची होती, तर इतर नाटके ऐतिहासिक होती. यावर्षी स्पर्धा गाजली ती परीक्षकांमुळे स्पर्धेला तीन परीक्षक होते; पण स्पर्धेच्या सुरवातीलाच परीक्षकांची आपआपसात जुंपली.

त्यांचे भांडण एवढे टोकाला पोहोचले की परीक्षक एकत्र न बसता वेगवेगळे बसू लागले. स्पर्धेतील परीक्षकांच्या भांडणाचा परिणाम निकालावर झाला. सध्या जोरात चर्चा आहे की, निकाल तयार करताना परीक्षकांचे जोरदार वाकयुद्ध झाले.

त्यात एका परीक्षकाने तर ‘आपले नाटक घेतले नाही तर निकाल फाडून टाकतो’, अशी धमकी दिली. शेवटी ‘तुझे एक आणि माझे एक’वर समझोता झाला, तर तिसरा परीक्षक मात्र त्या वादात पडायचे नाही म्हणून दूर राहिला. परीक्षकांची अशी नीती राहिली तर कलाकारांना अमरत्व नक्की मिळेल!

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com