विरोधकांच्या उपस्थितीत गुळेली ‘आयआयटी’ची सीमा आखणी सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 24 सप्टेंबर 2020

सीमा आखणीचे काम सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून वातावरण चिघळणार की काय, असे चित्र दिसत होते. परंतु आयआयटी विरोधकांनी मौन राहणेच पसंद केल्याने जे सरकार अधिकारी या ठिकाणी आले होते ते आपले काम करीत राहिले

गुळेली: गुळेली आयआयटी प्रकल्पाच्या सीमांची आखणी आजपासून (बुधवारी) सुरू झाली असून, मोठ्या पोलिस बंदोबस्तात अधिकाऱ्यांकडून काम सुरू आहे. आज सीमांची आखणी सुरू असताना विरोधकही मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. 

सीमा आखणीचे काम सुरू झाल्यानंतर आज सकाळपासून वातावरण चिघळणार की काय, असे चित्र दिसत होते. परंतु आयआयटी विरोधकांनी मौन राहणेच पसंद केल्याने जे सरकार अधिकारी या ठिकाणी आले होते ते आपले काम करीत राहिले.

आयआयटी विरोधक मेळावली पंचक्रोशी ग्रामबचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर, राम मेळेकर व इतरांनी यावेळी उपस्थित असलेल्या सत्तरी तालुका संयुक्त मामलेदार संजिवनी सातार्डेकर यांना आपले म्हणणे समजावून सांगितले.

एकूण सरकारी नियमानुसार आपण काम करत असल्याचे संयुक्त मामलेदारांनी यावेळी उपस्थित असलेल्या विरोधकांना सांगितले. 

मुरमुरे येथील धनगरवाड्यावरुन सीमा आखणीस सुरवात केली आहे. एकूण दहा लाख स्क्वे. मी. ही जमीन आयआयटीसाठी सरकारने दिली असून या जमिनीवर असलेली काजू बागायती, देवस्थान आदी वाचविण्यासाठी स्थानिक लोकांनी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितितर्फे आंदोलन छेडले आहे. 

यापूर्वी पंचायत मंडळाला घेराव, संबंधित सर्व खात्यांना निवेदन देण्याचे काम या विरोधी समितीने केले आहे.

सरकारतर्फे चार हजार स्क्वे. मी. जमीन देवस्थानसाठी सोडण्यात येईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.

आजच्या या सीमा आखणीमुळे कोणताच अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. दरम्यान, आजच्या या सरकारच्या सीमा आखणीच्या निर्णयावर विरोधक कोणता निर्णय घेतात आणि यापुढे कोणते पाऊल उचलणार त्याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

आजच्या या घटनेविषयी मेळावली पंचक्रोशी ग्राम बचाव आंदोलन समितीचे समन्वयक शशिकांत सावर्डेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, आमचे म्हणणे आम्ही उपस्थित अधिकारी वर्गाला सांगितले आहे. एकूण पूर्वीपासून आम्ही शांततेचा मार्गाने आंदोलन पुढे नेत आहोत. आजही आम्ही तेच केले. 

पण, पुढील निर्णय सर्वस्वी या भागातील नागरिक घेतील, असेही ते म्हणाले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या