मोप विमानतळाच्या जागेत अतिक्रमण; बांधकामे पाडण्याच्या आदेशाची अद्याप अमलबजावणी नाही

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकामांची पाहणी, पंचनामा केल्यानंतर सरकारी जमिनीवरील ही बांधकामे पाडून टाकण्याचा २३ जून रोजी आदेश दिला आहे. मात्र, आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही.

पणजी: मोप येथील प्रस्तावित हरीत आंतरराष्‍ट्रीय विमानतळ प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न गाजत असताना विमानतळासाठीच्या सरकारी जागेत अतिक्रमण झाल्याची माहिती मिळाली आहे. ही बांधकामे पाडण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी देऊनही अद्याप सरकारी यंत्रणा या बांधकामांवर कारवाई करण्यास धजावलेली नाही.

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी या बांधकामांची पाहणी, पंचनामा केल्यानंतर सरकारी जमिनीवरील ही बांधकामे पाडून टाकण्याचा २३ जून रोजी आदेश दिला आहे. मात्र, आजवर त्याची अंमलबजावणी झालेली नाही. प्रकल्पाच्या पूनर्वसन भागात गुरांचा गोठा वाटवा अशी ही दोन बांधकामे उभी करण्यात आली आहेत. कासारवर्णे गावातील सर्वे क्र. २०७ मध्ये ही बांधकामे  केल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या बांधकामांविषयी नागरी हवाई वाहतूक संचालनालयाने ७ मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले होते. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी पेडण्याच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले होते. गोवा जमीन  (बांधकामास प्रतिबंध) कायदा १९९५ च्या कलम ५ व ६ नुसार कारवाई करणे अपेक्षित धरले होते. बांधकामे कोणती ती जाणून घेण्यासाठी नागरी हवाई वाहतूक संचालनालयातील अधिकारी वैभव वझे यांच्याशी संपर्क साधावा असे आदेशात नमूद करण्यात आले होते. मात्र यापुढे चौकशी झाली मात्र बांधकामावरील कारवाई मात्र झालेली नाही.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या