राज्यात एका दिवसात ३१.७ मि.मी. पावसाची नोंद; उद्यापर्यंत ‘ऑरेंज अलर्ट’

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

राज्यात पावसाळी हंगामात आतापर्यंत तब्बल ३८०८.५ मि.मी. म्हणजेच १४९.९४ इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्यावर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा ३२ टक्के अधिक आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेने दिली.

पणजी: गोवा वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ठिकठिकाणी चांगला पाऊस पडला. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार राज्यात ठिकठिकाणी मिळून एका दिवसात ३१.७ मि.मी. एवढ्या पावसाची नोंद झाली. राज्यात पुढील दोन दिवसांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आले असून २२ सप्टेंबर पर्यंत राज्यातील काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.

बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार पाऊस पडत असल्याचे वेधशाळेचे म्हणणे आहे. राज्यात पावसाळी हंगामात आतापर्यंत तब्बल ३८०८.५ मि.मी. म्हणजेच १४९.९४ इंच इतक्या पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस गेल्यावर्षी याच कालावधीत पडलेल्या पावसापेक्षा ३२ टक्के अधिक आहे, अशी माहिती गोवा वेधशाळेने दिली.

राज्यातील वातावरणही पावसासाठी पोषक आहे. रविवारी केपे, काणकोण, सांगे, म्हापसा, मडगाव व अन्य भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. अन्य ठिकाणी देखील दिवसभर पावसाची रिपरिप होती. रविवारी केपे भागात ८ सें.मी., काणकोण व सांगे भागात प्रत्येकी ६ सें.मी., म्हापसा व मडगाव येथे प्रत्येकी ५ सें.मी., पेडणे व साखळी भागात प्रत्येकी २ सें.मी. तर पणजी, दाबोळी व मुरगाव भागात १ सें.मी. इतक्या पावसाची नोंद झाली.  

मिळालेल्या माहितीनुसार, पणजीत कमाल तापमान २९.७ अंश सेल्सियस तर किमान तापमान २३.४ अंश सेल्सिअस इतके नोंद झाले. तसेच मुरगावात कमाल तापमान ३०.४ तर किमान तापमान २४.२ अंश सेल्सिअस इतके होते.

बंगालच्या उपसागरातील वादळ आणि कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून गोव्यासह कर्नाटक आणि महाराष्ट्र राज्यातही पावसाचा जोर कायम आहे. बंगालच्या उपसागरातील परिस्थितीत काही बदल झालेला नसल्याने राज्यातील पावसात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या