रेड अलर्ट; पावसाच्‍या तडाख्‍यात शेती उद्‍ध्‍वस्‍त

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

गेल्‍या चोवीस तासांत सरासरी ९०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सांगे तालुक्‍यात सर्वाधिक १८० मि.मी. पाऊस पडला. तसेच वाळपई, फोंडा, साखळी, केपे, काणकोण येथेही पावसाने झोडपले. पणजीत सर्वांत कमी २५.२ मि.मी. एवढा पाऊस पडला.

पणजी: गेल्‍या दोन दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे भातशेतीबरोबरच बागायतींचेही मोठे नुकसान झाले. भाताला लोंबी येण्‍याची प्रक्रिया सुरू असतानाच ते आडवे झाल्‍याने शेतकऱ्यांना जबर फटका बसला. नदी, नाल्‍यांना पूर आल्‍याने शेती, बागायतींत पाणी घुसून मोठे नुकसान झाले. 

तिळारी व अंजुणे धरणातील पाण्‍याची पातळी वाढल्‍याने पाण्‍याचा विसर्ग सुरू केला आहे. त्‍यामुळे नदीकिनारी परिसरातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. उत्तर व दक्षिण गोव्‍यातील रस्‍तेही पाण्‍याखाली गेल्‍याने वाहतूक अन्‍य मार्गाने वळविण्‍यात आली. वेधशाळेने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्‍याची शक्‍यता व्‍यक्त केली आहे. 

गेल्‍या चोवीस तासांत सरासरी ९०.१ मि.मी. पावसाची नोंद झाली असून सांगे तालुक्‍यात सर्वाधिक १८० मि.मी. पाऊस पडला. तसेच वाळपई, फोंडा, साखळी, केपे, काणकोण येथेही पावसाने झोडपले. पणजीत सर्वांत कमी २५.२ मि.मी. एवढा पाऊस पडला. 

जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी झाडांची पडझड झाली, तसेच गावठण साखळी येथे एका घराची भिंत कोसळून चाळीस हजारपेक्षा अधिक रकमेची हानी झाली. म्हाऊस नदीत पडून एका गव्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. या गव्याला वन खात्याच्या कर्मचाऱ्यांनी पाण्‍याबाहेर काढले, पण तो वाचू शकला नाही. पारोडा येथे एक चारचाकी पाण्यात अडकली होती. स्‍थानिकांच्‍या सहकार्याने गाडीतील जोडप्याला सुरक्षित बाहेर काढण्यात आले. साखळी येथील वाळवंटी नदीतील पाणी बाजारात शिरू नये म्हणून पंपिंग सुरू करण्यात आले. तसेच डिचोली तालुक्यासह राज्यात ठिकठिकाणी आपत्कालीन नियंत्रण यंत्रणा सतर्क केली आहे.

अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे मुसळधार पाऊस पडत आहे. जोरदार वाऱ्यामुळे समुद्रही खवळलेल्या अवस्थेत आहे. मच्छीमारांनी तसेच पर्यटक, नागरिकांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा वेधशाळेने दिला. वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ कि.मी. प्रतितास इतका असणार आहे. त्‍यामुळे लाटांची उंची अधिक असल्याने धोका निर्माण होऊ शकतो. यासाठी समुद्रावर कार्यरत असणाऱ्या जीवरक्षकांनाही सूचित केले आहे.

रस्ते पाण्याखाली, जनजीवन विस्कळीत
मुसळधार पावसामुळे पणजीतील रस्ते काही काळापुरते तुंबले होते. पणजीतील गटारे तुंबल्‍याने रस्‍त्‍यावर पाणी साचले होते. मुसळधार पावसामुळे दक्षिण गोव्यातील पाड्डे पुलावर पाणी आल्‍याने रस्‍ता पाण्‍याखाली गेला. त्‍यामुळे पोलिसांनी अन्‍य मार्गाने वाहतूक वळवली.

३५ टक्क्यांनी अधिक पाऊस
या हंगामात आतापर्यंत सरासरी ३८९८ मि.मी. (१५६ इंच) इतका पाऊस पडला आहे, तर सामान्य पावसाची मर्यादा २८९२. १ मि.मी. इतकी आहे. या हंगामात पडलेला पाऊस हा सामान्य पावसापेक्षा ३५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या चोवीस तासांत कमीत कमी २६.५ अंश सेल्सिअस आणि जास्तीत जास्त २३. १ अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस सर्वाधिक पाऊस १८० मि.मी. इतका सांगे येथे पडला, तर सर्वांत कमी पाऊस पणजी येथे २५.२ मि.मी. इतका पडला. वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षी सरासरी १६० इंच इतक्या पावसाची नोंद झाली होती. 

२०१५ साली पडलेला पाऊस - २३८८.६ मि.मी. (२० टक्के अधिक) 
२०१६ साली पडलेला पाऊस - २९५७.६० मि.मी (१ टक्के अधिक) 
२०१८ साली पडलेला पाऊस - २४१०.५ मि.मी. (१९ टक्क्यांनी अधिक) 
२०१९ साली पडलेला पाऊस - ३९४३.८ मि.मी. (३३ टक्क्यांनी अधिक) 
२०२० साली पडलेला पाऊस - ३८९८.६ मि.मी. (३५ टक्क्यांनी अधिक)

  • आणखी दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता 
  • चोवीस तासांत ९०.१० मि.मी. पावसाची नोंद 
  • समुद्रावर वाहताहेत वादळी वारे 
  • कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मुसळधार 
  • अंजुणे धरणाची चार दारे खुली 
  • नदी, नाले, ओहोळ तुडूंब 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या