गोवा: बेकायदा हॉटेल्समुळे पर्यटनावर दुष्परिणाम

प्रतिनिधी
रविवार, 20 सप्टेंबर 2020

विरोधी पक्षनेते दिगंबर कामत ः पर्यटन खात्याकडे नोंदणी केलेल्यांनाच परवानगी द्या

मडगाव: गोवा सरकारने बेकायदा हॉटेल्स व होम स्टे यांना प्रोत्साहन दिल्यास पर्यटन उद्योग पूर्णपणे नष्ट होणार असल्याचा इशारा देत, गोवा पर्यटन खात्याकडे अधिकृत नोंदणी केलेल्या व्यावसायिकांनाच परवानगी द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली आहे.

 सरकारने बेकायदा व्यवसाय करणारे तसेच अनधिकृत एजंट यांच्यावर कारवाई करुरून पर्यटन क्षेत्रात पारदर्शकता आणणे गरजेचे आहे, असे  कामत यांनी म्हटले आहे. 

गोव्याच्या पर्यटन मंत्र्यांनीच हल्लीच गोव्यात सुमारे १.६० कोटी पर्यटक बेकायदा वास्तव्य करून गेल्याचे मान्य केल्याने आज पर्यटन व्यवसायावर सरकारचे नियंत्रण नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गोव्यातील अधिकृत नोंदणी करून सरकारला सर्व शुल्क व कर भरणारे हॉटेल व्यावसायिक अशा बेकायदा धंद्यामुळे त्रस्त आहेत व त्यांचा व्यवसाय बंद पडलेला आहे. सरकारला बेकायदा हॉटेल्स व होम स्टे चालविणाऱ्यांकडून कसलाच महसूल मिळत नाही, असे कामत यांनी सांगितले. 

‘राज्यातील ७० टक्के निवास व्यवस्था बेकायदा’
गोव्यात ८० टक्के देशी व २० टक्के विदेशी पर्यटक प्रत्येक वर्षी येतात असे आकडेवारी सांगते. केवळ विदेशी पर्यटकांच्या आकडेवारीत उघड होत असलेली विसंगती पाहिल्यास अनधिकृतपणे वास्तव्यास असणाऱ्या देशी पर्यटकांचा आकडा कितीतरी पटीने जास्त असल्याचे स्पष्ट आहे. गोव्यात एकूण ७० टक्के निवास व्यवस्थेचा व्यवसाय बेकायदा चालतो हे म्हणण्यास वरील आकडेवारी वाव देते, असा दावा दिगंबर कामत यांनी केला आहे.

संबंधित बातम्या