बेळगाव, दावणगेरी आणि महाराष्ट्रातून आयात सुरूच, पण विक्रीत घट

गोमंन्तक वृत्तसेवा
शनिवार, 1 मे 2021

गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन करण्यात आले, आयात केलेला माल कुजून गेला. त्यात विक्री घटल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आता दक्षता बाळगावी लागत आहे. पणजी मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्यांची ही व्यथा आहे. 

पणजी : गेल्या वर्षी अचानक लॉकडाऊन करण्यात आले, आयात केलेला माल कुजून गेला. एकतर पुढे व्यापार ठप्प झाला. त्यात विक्री घटल्याने आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे आता दक्षता बाळगावी लागत आहे. पणजी मार्केटमधील प्रत्येक व्यापाऱ्यांची ही व्यथा आहे. 

राज्यात लॉकडाउन सुरू झाले. मार्केटला जाणारे सर्व मार्ग पोलिसांनी आधीच बॅरिकेड लावून अडवून ठेवले आहेत. पण परराज्यातून येणाऱ्या भाजी, फळे आणि चिकनच्या कोंबड्यांच्या वाहनांना प्रवेश दिला जात आहे. साहजिकच मार्केटमध्ये व्यापारी आणि माल वाहतूक वाहनांची नेहमीची गर्दी होती. कर्नाटक, महाराष्ट्र आणि आता गोव्यातही लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याचा अजिबात परिणाम भाजी, फळे आणि कोंबड्यांच्या आयातीवर झालेला नाही. वाहतूक सुरूच आहे. पण येथील व्यापाऱ्यांना मात्र प्रचंड धास्ती लागून राहिली आहे. 

‘जीएसएल’ तर्फे गोव्याला ऑक्सिजन प्रकल्प 

माल नेहमीप्रमाणे येत आहे. पण मार्केटमध्ये मालाची उचल नेहमीसारखी नाही. भाजी, फळे आणि चिकन हे दीर्घकाळ टिकणारे पदार्थ नाहीत, त्यामुळे मागणी करूनही खरेदीदार आले नाहीत तर काय करायचे? असा सवाल फळ विक्रेते कुंदल सावंत यांनी उपस्थित केला. 

गोव्यात बेळगाव, दावणगेरी आणि महाराष्ट्र राज्यातून फळे आणि भाजी येते. या दोन्ही राज्यात लॉकडाऊन असतानाही मालाची आयात व्यवस्थित होत आहे. पण प्रत्यक्षात लॉकडाऊनच्या पहिल्याच दिवशी विक्रीत घट झाल्याने व्यापारी चिंतेत आहेत. 

ऑक्सिजन पुरविणाऱ्या कॉंग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांचा भाजप सरकारकडून छळ 

गतवर्षीचा अनुभव एकदम भयावह आहे. मालाची मागणी केली, पण विक्री झाली नाही.पुढे काय होणार या विवंचनेमुळे लोकांनी जिभेच्या चोचलयांवर नियंत्रण ठेवले. परिणामी भाजी, फळे कुजली. त्यानंतर व्यापार ठप्प झाला. दुहेरी नुकसानीचा सामना करावा लागला. सद्यस्थिती पाहता तसे होणार नाही याची खात्री कोण देणार? असा सवाल एका व्यापाऱ्याने व्यक्त केला. 

मागणीत अशीच घट राहिली तर आयात घटेल. त्याचा परिणाम दरवाढीत होईल, असा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे. सरकारने  अत्यावश्यक सेवांना मुभा दिली असली तरी कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि अचानक जाहीर झालेल्या लॉकडाऊनमुळे जनसामान्यांत भीती आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेवर होत आहे.

...तोपर्यंत अभ्‍यास सुरू ठेवा 

तर स्थानिक भाजीवरच गुजराण
परप्रांतातून येणारी भाजी, फळे, चिकन याची मागणी घटली तर गोमंतकीयांना स्थानिक भाजीपाल्यावर अवलंबून राहावे लागेल. मात्र येथील उत्पादन केवळ 40 टक्क्याहून कमी असल्याने ते राज्याला पुरणारे नाही.खरेदी करणा-यांनी नियमांचे पालन केल्यास सद्यस्थिती निवळेल,अशी आपेक्षा आहे.   

एरवी आम्हाला ग्राहकांची वाट पाहावी लागत नाही. बहुतेक कोंबड्या बेळगावहून आयात करतो. आता मात्र कोंबड्या आणाव्यात की नाही, या द्विधा मनःस्थितीत आहे. गतवर्षीचा वाईट अनुभव पाठीशी आहे. 
- सादिक बेपारी, चिकन विक्रेता

वाहतूक सुरू असली तरी गोव्यातील व्यापाऱ्यांकडून मागणीत घट झाली आहे. त्यामुळे भाजी काढणी थांबविली आहे. त्याचा फटका आम्हालाही बसणार आहे. गतवर्षी भाजी काढली, पण ती गुरांना चारा म्हणून वापरावी लागली होती. 
- रघू बडमंजी, शेतकरी अनगोळ-बेळगाव

संबंधित बातम्या