आवक कमी झाल्याने मासळीच्या दरात वाढ; समुद्रातील खराब हवामानाचा मच्छीमारीला फटका

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

एका बाजूने कोरोना महामारीचे संकट. त्यात समुद्रातील खराब हवामान यामुळे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याची माहिती अखिल गोवा पर्सिग ट्रॉलरमालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली.

नावेली: समुद्र खवळलेला असल्याने हवामान खात्याने मच्छीमारांना मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा दिला असून २२ ते २६ पर्यंत पुढील पाच दिवस समुद्रात ४५ ते ५५ कि. मी. वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. काही मोजकेच ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. मात्र, गोव्यात मासळीची आवक कमी असल्याने मासळीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

एका बाजूने कोरोना महामारीचे संकट. त्यात समुद्रातील खराब हवामान यामुळे मच्छीमार मोठ्या आर्थिक संकटात सापडले असल्याची माहिती अखिल गोवा पर्सिग ट्रॉलरमालक संघटनेचे अध्यक्ष हर्षद धोंड यांनी दिली. कोरोना काळात आपल्या मूळ गावी गेलेले कामगार गोव्यात न परतल्याने त्यांना त्यांच्या गावात खासगी बसगाड्या पाठवून गोव्यात आणण्यात आले आणि आता गोव्यात आणल्यावर हवामान खराब असल्याने मासेमारीसाठी जाता येत नाही. त्यामुळे कामगारांना काम मिळत नाही. खवळलेला समुद्र कधी शांत होईल ते सांगता येणे शक्य नसल्याने ज्यावेळी समुद्रातील हवामानात सुधारणा होईल, त्यावेळी समुद्रात मासेमारीसाठी ट्रॉलर पाठविण्यात येतील, अशी माहिती कुटबण जेटीवरील मच्छीमारांनी दिली.

मालीम जेटीवरील ट्रॉलरमालक सीताकांत परब यांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ सप्टेंबरपर्यंत समुद्रातील हवामान खराब असल्याने ट्रॉलर समुद्रात मासेमारीसाठी जाणार नाहीत. कोरोनामुळे ट्रॉलरवर काम करण्यासाठी कामगार न आल्यामुळे मोठे १० टक्के ट्रॉलर मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. सध्या गोव्यात शेजारील राज्यातील मासळी गोव्यात येत असली, तरी मासळीचे दर मात्र बऱ्याच प्रमाणात वाढले आहेत.

घाऊक मासळी विक्रेते विक्रम नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या समुद्र खवळला असून हवामान खराब असल्याने मासेमारीसाठी ट्रॉलर समुद्रात जात नसल्याने परराज्यातील मासळी गोव्यात येत आहे. आवक कमी असल्याने मासळीच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या