मुख्यमंत्र्यांच्या यादीत उद्योगांना खालचे स्थान: दामोदर कोचकर

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 सप्टेंबर 2020

व्यवसाय करण्यासाठी अनुकूल असणाऱ्यांच्या यादीत गोव्याची घसरण होऊन राज्य 24व्या स्थानी आले आहे. हे दृश्य बघून  आपल्याला अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचेही मत त्यांनी यावेळी या निवेदनात व्यक्त केले आहे.

पणजी: मुख्यमंत्र्यांच्या प्राधान्य यादीत उद्योगांना कायम खालचे स्थान असल्याचा आरोप गोवा व्यापारी संघाचे (GSIA) अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी केला आहे. गोव्यातील व्यवसाय वृद्धीबाबत राज्य सरकार उदासीन असल्याचेही त्यांनी व्यापारी संघाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

व्यवसाय करण्यासाठी अनुकूल असणाऱ्यांच्या यादीत गोव्याची घसरण होऊन राज्य 24व्या स्थानी आले आहे. हे दृश्य बघून  आपल्याला अजिबात आश्चर्य वाटत नसल्याचेही मत त्यांनी यावेळी या निवेदनात व्यक्त केले आहे. त्यांनी याबाबतीत मला 16 सप्टेंबरला फोन केला होता. मात्र, त्यानंतर त्यांनी कुठलीही प्रक्रिया केली नाही. यावरून ते उद्योगधंद्यांबाबत किती उदासीन आहेत हे दिसून येते, असेही कोचकर यावेळी म्हणाले. 

गोव्यातील उद्योगधंद्यांच्या सद्यस्थितीबाबत चिंता व्यक्त करताना ते यावेळी म्हणाले की, कोरोना महामारीच्या परिस्थितीत उद्योगधंद्यांची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. बाजार पडलेल्या अवस्थेत असून महामारीमुळे कामगारांची कमतरता आहे. कच्चा मालही पुरेसा उपलब्ध होत नाही. खप कमी असल्यामुळे मालाचे पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यात अनेक कामगार हे कोरोनाबाधितही होत असल्याने कामासाठी माणसे अपूर्ण पडत आहेत. अशा काळात गोव्यातील लघू व मध्यम उद्योजकांना त्यांच्या क्षमतेएवढे काम करता येत नाही आहे. कामं होत नसल्याने कामगारांचे पगारही वेळेवर होत नाहीत. एवढ्या अडचणी असताना राज्य सरकारकडून मदत मिळण्याव्यतिरिक्त शासन आणखीन अडचणी वाढवत आहे.  

राज्यातील खाणकाम उद्योग आणि पर्यटन व्यवसाय पूर्णपणे बंद झालेले असताना राज्य शासनाला आता उत्पादन क्षेत्रही बंद पाडायचं आहे का?, असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या