कोडली येथे मुक्‍या मातापित्याची सतावणूक होत असल्याची तक्रार

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

तारा गावकर हिने सांगितले की त्यांचे कुटुंब राहत असलेली जमीन आपले वडील संतोष भानू गावकर व काका आनंद भानू गावकर यांच्या नावावर आहे. मात्र आमची कोणतीच मान्यता न घेता आमच्या जमिनीतून शेजाऱ्यांसाठी रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे.

फोंडा: कोडली- दाभाळ पंचायतक्षेत्रातील मल्लारीमळ येथील आपल्या मालकीच्या जमिनीत अतिक्रमण करण्यात आले असून आपल्या मुक्‍या आईवडिलांना शेजाऱ्यांकडून नाहक त्रास केला जात आहे. सरकारनेच याप्रकरणी आम्हाला न्याय द्यावा, अशी मागणी या मुक्‍या आईवडिलांची कन्या तारा संतोष गावकर हिने पत्रकार परिषदेत केली. 

तारा गावकर हिने सांगितले की त्यांचे कुटुंब राहत असलेली जमीन आपले वडील संतोष भानू गावकर व काका आनंद भानू गावकर यांच्या नावावर आहे. मात्र आमची कोणतीच मान्यता न घेता आमच्या जमिनीतून शेजाऱ्यांसाठी रस्ता डांबरीकरण करण्यात आले आहे.  

आपली आई सुलक्षा संतोष गावकर व वडील संतोष गावकर यांना बोलता व ऐकता येत नाही. नेमका त्याचाच हा फायदा घेण्यात आला असून आता शेजाऱ्यांकडून आपण कामावर गेल्यानंतर आई वडिलाना नाहक त्रास केला जातो. 

विकलांग असलेल्या आपल्या आईवडिलांची सतावणूक केली जात असल्याने ती दोघे प्रचंड दडपणाखाली असून आजारी पडत आहे. त्यामुळे आपल्याला काम सोडून घरी थांबावे लागते. 

येथील सुमारे एकवीस हजार चौरस मीटर जमीन आमच्या मालकीची असून हा रस्ता नेमका कुणी केला यासंबंधी माहिती हक्क कायद्याखाली अर्ज केला तर उत्तर मिळत नाही. फक्त एकदाच दाभाळ पंचायतीतर्फे यासंबंधी पाहणी करण्यात आली, मात्र कारवाई कोणतीच झाली नाही. पोलिसही नुसते येऊन पाहून जातात, त्यामुळे आम्हाला न्याय मिळत नसून मुस्कटदाबी चालली आहे. 

जमिनीचे सर्व कागदपत्र आमच्या नावे असतानाही आम्हाला न्याय मिळत नसून आता सरकारनेच याप्रकरणी लक्ष घालून विकलांग असलेल्या आपल्या आईवडिलांना न्याय द्यावा, अशी मागणी या विकलांग मातापित्याची कन्या तारा गावकर हिने केली आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या