‘भाजपच्या उमेदवारीची स्वप्ने आताच पाहू नका’: इजिदोर फर्नांडिस

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 15 सप्टेंबर 2020

भाजपची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची स्वप्ने आताच पाहू नका. अजून विधानसभा निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी आहे, असा सल्ला उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी उमेदवारीवर दावा सांगणाऱ्या नेत्यांना दिला आहे.

काणकोण: भाजपची विधानसभा निवडणुकीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल याची स्वप्ने आताच पाहू नका. अजून विधानसभा निवडणुकीला दीड वर्षांचा कालावधी आहे. त्यासाठी या दीड वर्षात काणकोण मतदारसंघातील जनतेची विकासकामे करा. त्यानंतर उमेदवारीवर दावा सांगा, असा सल्ला उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी उमेदवारीवर दावा सांगणाऱ्या नेत्यांना दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना १७ सप्टेंबरला वयाची ७० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त भाजपने १४ ते २० सप्टेंबर या काळात समर्पण सप्ताहाचे आयोजन केले आहे. त्याबाबतची माहिती देण्यासाठी फर्नांडिस यांनी कार्यकर्ते, नेते यांची बैठक हत्तीपावल येथील एका खाजगी हॉटेलमध्ये  घेतली. 

मुख्यमंत्री, भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड यांच्याशी चांगले संबंध आहेत. म्हणून आगामी विधानसभेची उमेदवारी  मिळेल या भ्रमात कोणी राहू नये. राजकीय पक्ष उमेदवाराची कामगिरी पाहून उमेदवारी देत असतो. पक्ष कार्यकर्त्यांनी एकदिलाने काणकोणात पक्षवृद्धीसाठी काम केले पाहिजे, असे उपसभापती फर्नांडिस यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले. पक्षाचे काम पणजी येथील कार्यालयात बसून करता येत नाही. त्यासाठी तळागाळातील कार्यकर्त्यांना कार्यप्रवण करण्याची गरज सूरज नाईक गावकर यांनी व्यक्त केली. यावेळी महेश नाईक, पंकज नाईक गावकर, संजू पागी व अन्य भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या