मडगावात सराफाचा भरदिवसा सुऱ्याने भोसकून खून

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

रक्तबंबाळ स्थितीत स्वप्नील यांनी हल्लेखोरांना पकडण्याचे धाडस दाखवले. पण, तिघेही हल्लेखोर पलायन करण्यात यशस्वी ठरले.

सासष्टी: मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात बुधवारी दुपारी सराफी व्यावसायिक स्वप्नील वाळके (४१ वर्षे) यांचा सुऱ्याने भोसकून खून करण्यात आला. या घटनेने संपूर्ण गोवा हादरून गेला. रक्तबंबाळ स्थितीत स्वप्नील यांनी हल्लेखोरांना पकडण्याचे धाडस दाखवले. पण, तिघेही हल्लेखोर पलायन करण्यात यशस्वी ठरले. पोलिसांना घटनास्थळी एक देशी कट्टा, एक निकामी काडतूस, दोन जिवंत काडतुसे, सुऱ्याचे कव्हर अशा वस्तू सापडल्या आहेत. दुकानाच्या आतील व बाहेरील सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांना मिळाले आहे. त्यानुसार पोलिसांचा तपास सुरू आहे. हल्लेखोरांनी दुकानातून एकही वस्तू पळवली नाही, असे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 

ग्रेस चर्चच्या मागच्या बाजूच्या गजबज असलेल्या परिसरात दुपारी बारा वाजण्‍याच्या दरम्यान ही घटना घडली. सपना प्लाझा इमारतीजवळ वाळके यांचे कृष्णी ज्वेलर्स हे आस्थापन आहे. दुपारी बाराच्या दरम्यान तीन व्यक्तींनी त्याच्या आस्थापनात प्रवेश केला. त्या तिघांकडे चाकूसह रिव्हॉल्व्हरही होते. तिघेही हल्लेखोर चोरीच्या उद्देशाने दुकानात शिरले होते. स्वप्नीलने हिंमत दाखवून त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता त्याच्यावर हल्ला करण्‍यात आला व पोटात सुरा खुपसण्‍यात आला, असे सांगितले जात आहे. जखमी अवस्थेत स्वप्नील यांना पोलिसांच्या जीपमधून हॉस्पिसियो इस्पितळात दाखल करण्यात आले.  तथापि, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.  

हल्लेखोर फरारी
या प्रकरणातील तिघेही संशयीत फरार असून मडगाव पोलिस अन्य पोलिस स्थानकांच्‍या साहाय्याने खुन्‍यांचा शोध घेत आहेत. स्वप्नील रक्तबंबाळ अवस्थेत चोरांना अडविण्याचा प्रयत्न करत असताना त्यांचा हात झटकून चोरटे पळून जात असल्याचा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला असून सर्व स्तरातून त्वरित खुनींना पकडण्याची मागणी होत आहे. सराफी दुकानातून मोठमोठ्याने आवाज येऊ लागल्याने आजूबाजूचे लोक घटनास्थळी जमले. एका हल्लेखोराच्या हातात रक्ताने माखलेला चाकू असल्याने कुणीही त्यांना अडविण्यासाठी पुढे येण्यास धजावले नाहीत. हल्लेखोर पळून जात असताना घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी त्याच्यावर दगड फेकण्याचा प्रयत्न केला तरीही ते पळून जाण्यास यशस्वी झाले. दिवसाढवळ्या घडलेल्या या खुनी हल्ल्यामुळे मडगावात भितीचे वातावरण पसरले असून सराफी व्यावसासियांसह अन्य व्यावसायिकांमध्येही भीती निर्माण झाली आहे. 

श्‍वानपथकाकडून माग...
दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक पंकज कुमार सिंग यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामाचा आढावा घेतला. संशयितांचा माग काढण्यासाठी श्‍वानपथकाची मदत घेण्यात आली, तसेच ठसेतज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी देशी कट्टा (पिस्तुल), सुऱ्याचे कव्हर जप्त केले. हल्लेखोरांनी दुकानातून एकही वस्तू न चोरल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज मिळालेली असून त्यानुसार तपास सुरू आहे. स्वप्नील हे भाजपच्या राज्य कार्यकारिणी सदस्य व सामाजिक कार्यकर्त्या कृष्णी वाळके यांचे पूत्र आहेत. त्यांच्या मागे आई कृष्णी, पत्नी, दोन मुलगे व दोन बहिणी असा परिवार आहे. कोंब येथे राहणारे स्वप्नील पेशाने स्थापत्यविशारद आहेत. ते उत्तम वक्तेही होते. गोवा गोल्ड डिलर्स असोसिएशनचे ते सचिव होते व असोसिएशनच्या उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असे. भाजपचे संघटनमंत्री सतीश धोंड. राज्य सरचिटणीस दामू नाईक, युवा नेते शर्मद रायतुरकर, फातोर्डा मंडळाचे अध्यक्ष मनोहर बोरकर यांनी घटनास्थळी जाऊन या प्रकरणाची माहिती घेतली. भाजपचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे यांनी स्वप्नील वाळके यांच्या कोंब येथील निवासस्थानी भेट देऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्‍वन केले. 

रक्तबंबाळ अवस्‍थेत अतुलनीय धाडस
स्वप्नीलवर दुकानाच्या आतच हल्ला झाला असावा. एका नागरिकाने शेजारच्या इमारतीवरून काढलेल्या व्हिडिओत स्वप्नीलने दुकानाबाहेरच्या पदपथावर दोघा हल्लेखारांना पकडून ठेवल्याचे दृश्य दिसते. रक्तबंबाळ अवस्थेतही स्वप्नील यांनी दोघा हल्लेखोरांना पकडू ठेवण्‍याचे धाडस दाखवले. यापैकी एका संशयिताच्या हातात सुरा असून त्याच्या अंगावर टीशर्ट नाही. उघड्या अंगाने हातात सुरा धरलेल्या अवस्थेत त्याने स्वप्नील यांच्या पकडीतून सुटका करत धाव मारली. त्याचे टी शर्ट स्वप्नीलच्या हातात असल्‍याचे व्हिडिओत स्पष्टपणे दिसते.  हेल्मेट घातलेल्या त्याच्या दुसऱ्या साथीदारास स्वप्नील यांनी काही क्षण पकडून ठेवले. पण, त्यानेही स्वप्नीलचा हात झिडकारून पलायन केले. पण, त्यापूर्वी एकदोन क्षण मागे वळून स्वप्नील यांच्याशी काहीतरी बोलताना हेल्मेटधारक संशयित दिसतो.  हा प्रकार घडला तेव्हा आजुबाजूला काही नागरिक होते. पण, अचानक घडलेल्या या प्रकारने व हल्लेखोरांकडे असलेल्या सुऱ्यामुळे हे नागरिक भांबावून गेले. संशयित धावत असताना काही नागरिक त्यांच्या मागे गेले. पण, हल्लेखोरांनी जोरात धाव घेत पलायन केले. हल्लेखोरांनी पलायन केल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेतील स्वप्नील दोन पावले दुकानाच्या बाजूने चालताच खाली कोसळले. त्यांना शेजारच्या आस्थापनातील नागरिकांनी उचलून इस्पितळात नेण्याचा प्रयत्न केला. तोपर्यंत पोलिसांची जीप घटनास्थळी दाखल झाली. या पोलिस जीपमधून त्यांना हॉस्पिसियोत नेण्यात आले. तथापि, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. 

मडगावात आज भरदिवसा सराफाचा चाकूने भोसकून खून करण्यात आल्याची घटना धक्कादायक आहे. याप्रकरणी पोलिस महासंचालक तसेच अधीक्षकांशी चर्चा केली आहे. याप्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावून संशयिताविरुद्ध त्वरित कठोर कारवाई सुरू करून दोषींना अटक करण्यास सांगितले आहे. - डॉ. प्रमोद सावंत, मुख्‍यमंत्री

मडगाव शहरात आज दिवसाढवळ्या एक तरुण सराफी व्यावसायिक स्वप्‍नील वाळके यांचा त्यांच्या दुकानात खून झाला, हे ऐकून मला तीव्र धक्का बसला. राज्यात कायदा व सुव्यवस्था पूर्णपणे ढासळल्याचे हे ज्वलंत उदाहरण आहे. खुन्यांना ताबडतोब अटक झाली पाहिजे, अशी माझी मागणी आहे. आमच्या कौटुंबिक स्नेही व समाजसेविका कृष्णी वाळके यांचे ते सुपुत्र. हा आघात सहन करण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशी माझी प्रार्थना. - दिगंबर कामत, विरोधी पक्षनेते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या