सराफी व्यावसायिकांना संरक्षण द्या; गोवा ज्‍वेलर्स असोसिएशनची मागणी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

सर्व ज्वेलर्सवाल्याच्या स्वतःच्या रक्षणासाठी रिव्हॉल्‍ववर खरेदी करण्‍यास सुटसुटीत नियम तयार करून सर्व ज्‍वेलर्सवाल्यांना सरकारने आधार देण्याची मागणी गोवा ज्वेलर्स असोसिएशन उत्तर गोवाच्यावतीने अध्यक्ष दिलीप शिरोडकर यांनी केली.

म्हापसा: मडगाव येथील कृष्णा ज्वेलर्स या आस्थापनाचे मालक स्वप्नील वाळके या युवा सराफाचा हल्लेखोरांनी खून केला, त्याचा आम्ही निषेध करतो. राज्य सरकारच्या गृहखात्याने या हल्लेखोरावर कडक कारवाई करण्याची गरज आहे. तसेच सर्व ज्वेलर्सवाल्याच्या स्वतःच्या रक्षणासाठी रिव्हॉल्‍ववर खरेदी करण्‍यास सुटसुटीत नियम तयार करून सर्व ज्‍वेलर्सवाल्यांना सरकारने आधार देण्याची मागणी गोवा ज्वेलर्स असोसिएशन उत्तर गोवाच्यावतीने अध्यक्ष दिलीप शिरोडकर यांनी केली.

म्हापसा येथील कालिका भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत श्री. शिरोडकर हे बोलत होते. त्यावेळी त्यांच्यासमवेत सचिव हरिष नास्नोडकर, उपाध्यक्ष समीर कुडचडकर, खजिनदार बाळकृष्ण वेर्णेकर, उपखजिनदार गौरीश नागवेकर, उपसचिव सिध्दार्थ कारेकर, माजी अध्यक्ष सागर पेडणेकर, माजी सचिव धनेश शिरोडकर उपस्थित होते.

सचिव हरिष नास्नोडकर यांनी सांगितले आज गोव्यातील ज्वेलर्सवाल्यांना आपला व्यवसाय कसा करावा, असा प्रश्‍न पडला आहे. सर्व ज्वेलर्सवाले अनेक समस्‍यांतून जात आहेत. पोलिसाकडून मोठ्या ज्वेलर्सवाल्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. पोलिस अशा प्रकारच्या गुन्ह्यानंतर काही काळ ज्वेलर्सवाल्यांच्या आस्थापनासमोर गस्त वाढवतात पण नंतर काहीच होत नाही. कोरोना महामारीच्या काळात राज्यातील सीमा बंद होत्या काल त्या उघडल्यानंतर पुन्हा हल्लेखोर हल्ले करण्यास सज्ज झाले. त्याचा परिणाम म्हणून काल मडगाव येथील कृष्णा ज्वेलर्सचे मालक स्वप्नील वाळके यांचा खून केला आहे. अशा हल्लेखोरावर कडक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.

उपाध्यक्ष समीर कुडचडकर आम्हा सराफाना गुन्हेगारांपासून संरक्षण मिळत नाही. तेव्हा सर्व ज्वेलर्स वाल्यांनी ग्रहाकांची ओळख पटवून त्यांना आत घेतले पाहिजे. जसा ग्राहक ज्वेलर्सची पसंती पाहून खरेदीसाठी आत येतो तसा ज्वेलर्सवाल्यांनी ग्राहकाची खात्री करून त्याला आस्थापनात प्रवेश दिला पाहिजे. ग्राहकाला तोंडावरचे मास्क काढण्यास सांगितले पाहिजे. तसेच हेल्मेट घालून येणाऱ्या ग्राहकाला हेल्मेट सक्तीने काढण्यास भाग पाडले पाहिजे. आपल्या आस्थापनातील सर्व कॅमेरे नीट कार्यान्‍वित आहेत की नाही, याची वेळोवेळी पाहणी करण्याची गरज आहे.

खजिनदार बाळकृष्ण वेर्णेकर यांनी सांगितले की, आज मडगाव येथील युवा सराफाचा खून झाला. स्वप्नील वाळके यांनी रक्तबंबाळ अवस्थेत सुध्दा हल्लेखोराशी झुंज दिली. अशा या युवा सराफाला मानाचा मुजरा. राज्य सरकारने ज्वेलर्सवाल्यांना पूर्ण संरक्षण देण्याची गरज आहे. आम्ही आमचा वडिलोपार्जित व्यवसाय पुढे नेला आहे. त्यामुळे सरकारच्या नियमानुसार आमच्याकडे सोने चांदी व अन्य मौल्यवान वस्तू विक्रीस असतात. सरकारने आम्हाला रिव्हॉल्‍वर खरेदी करण्यास मान्यता दिली पाहिजे. गोव्यात १३० ज्वेलर्स वाल्यांची आमच्या संस्थेकडे नोंदणी आहे. 

माजी सचिव धनेश शिरोडकर यांनी माहिती देताना सांगितले २०१२ मध्ये कामाक्षी ज्वेलर्सच्या आस्थापनाचे मालक रत्नाकांत रायकर यांचा भरदिवसा खून होऊन सोने लुटले होते. त्याचा पाठपुरावा आम्ही आमच्या असोसिएशनच्या माध्यमातून केला होता. पण शेवटपर्यंत पोलिसांना खुनी सापडला नाही. आम्ही गुन्हा शाखेकडे रत्नाकांत रायकर यांच्या पत्नी समवेत पाठपुरावा करण्यासाठी गेलो होतो. भविष्यात अशा प्रकारचा प्रसंग कुठल्याही ज्वेलर्सवाल्यावर येऊ नये.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या