मडगाव बॉम्बस्फोटप्रकरणी निवाडा राखीव

प्रतिनिधी
गुरुवार, 17 सप्टेंबर 2020

‘एसआयटी’ने उच्च न्यायलयात निर्दोषत्वाला दिले होते आव्हान

पणजी:  एका दशकापूर्वी गोव्यात दिपावलीच्या पूर्वसंध्येला बॉम्बस्फोट घडवून खळबळ माजवलेल्या मडगाव येथील प्रकरणातील निर्दोष सुटलेल्या सहाजणांविरुद्ध राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष तपास पथकाने (एसआयटी) आव्हान दिलेल्या अर्जावरील अंतिम सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात पूर्ण होऊन त्यावरील निवाडा राखीव ठेवण्यात आला आहे. ही सुनावणी गेल्या सात वर्षापासून प्रलंबित होती. 

म्हापसा येथील विशेष न्यायालयाने या बॉम्बस्फोटप्रकरणी विनय तळेकर, धनंजय अष्टेकर, प्रशांत अष्टेकर, विनायक पाटील, प्रशांत जुवेकर व दिलीप माणगावकर या सर्वांना निर्दोष ठरविले होते. ही सुनावणी वारंवार तपास यंत्रणेच्या वकिलांकडून वेळ मागून घेतली जात होती. या आठवड्यात या आव्हान अर्जावर सुनावणी सुरू झाल्यानंतर सहाय्यक सॉलिसिटर जनरल प्रवीण फळदेसाई यांनी बाजू मांडली तर संशयितांच्यावतीने संजीव पुनाळेकर यांनी युक्तिवाद केला. 

विशेष न्यायालयाने संशयितांना निर्दोष ठरविताना त्यांच्याविरुद्ध सादर करण्यात आलेले पुरावे आरोप सिद्ध होण्यासाठी पुरसे नाहीत. या प्रकरणात तपास यंत्रणेने अधिकाधिक पुरावे जमा करून संशयितांविरुद्ध ते सिद्ध करण्याची सर्वशक्ती लावली होती मात्र त्यामध्ये असलेल्या त्रुटी व विसंगती यामुळे न्यायालयाने ते ग्राह्य धरले नव्हते. त्यामुळे तपास यंत्रणेने या निर्दोषत्वाला आव्हान देण्याचा निर्णय घेऊन उच्च न्यायालयात अपिल केले होते. 

दिवाळीच्या पूर्वसंध्येला नरकासूर प्रतिमा स्पर्धेच्या रात्री मडगाव येथील एका स्कुटरच्या डिकीमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. स्फोटात मालगोंडा पाटील व योगेश नाईक हे दोघेजण जागीच ठार झाले होते. या नरकासूर प्रतिमा स्पर्धेला बॉम्बस्फोट प्रकरणातील व्यक्तींचा विरोध होता त्यामुळे हा स्फोट घडवून आणण्याचे कटकारस्थान पूर्वनियोजित होते. त्यासाठी स्फोट घडवून आणण्याच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. इंटरनेटवरील माहितीच्या आधारे जिलेटीनचा वापर करून बॉम्ब करण्यात आला होता.

संबंधित बातम्या