गोव्यातील कदंब बससेवेचे वेळापत्रक गुगल मॅपवर

गोव्यातील कदंब बससेवेचे वेळापत्रक गुगल मॅपवर
Goa Kadamba bus service schedule on Google Map

पणजी: लोकांनी सार्वजनिक वाहतुकीचा मोठ्या प्रमाणात वापर करावा आणि असा वापर करणे त्यांच्यासाठी सुलभ जावे या हेतूने कदंब महामंडळाच्या बसगाड्यांची(Kadamba Corporation bus) गुगल जिओ फेन्सिंगच्या(Google Geo Fencing) साहाय्याने आता गुगल मॅपवर(Google Maps) नोंद करण्यात आली आहे. सध्या कोरोनाचा फैलाव अडविण्यासाठी जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कदंबच्या सेवेवरही परिणाम झाला आहे. मात्र, एकदा सेवा सुरळीत झाल्यानंतर या उपक्रमाचा लोकांना बराच फायदा होणार आहे.(Goa Kadamba bus service schedule on Google Map )

कदंबच्या 386 बसगाड्यांचे वेळापत्रक गुगल मॅपवर टाकण्यात आलेले असून त्यात बसगाड्यांच्या 2500 वेळा नोंदल्या गेलेल्या आहेत. गोवा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात आलेला आहे. यामुळे प्रवाशांना कुठली बस आपल्याला कुठल्या थांब्यावर मिळेल याची कल्पना येऊ शकणार आहे. उदाहरणार्थ म्हापसा-मडगाव मार्गावर प्रवास करणाऱ्या एखाद्या प्रवाशाला गुगल मॅपवर जाऊन या मार्गावर उपलब्ध असलेली बससेवा तपासून पाहता येईल. तसे केल्यानंतर कदंब बसेसच्या वेळा दिसू लागतील.

सध्या जिओ फेन्सिंग फिचरवर कदंबचे वेळापत्रक आणि मार्ग उपलब्ध आहेत. मात्र, बस गाठण्यासाठी ती कुठवर पोहोचली आहे हे गुगल मॅपच्या आधारे कळण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. कदंब महामंडळाकडून सर्व बसेसमध्ये जीपीएस यंत्रणा बसविण्याचे नियोजन चालले आहे. तशी यंत्रणा बसविण्यात आल्यानंतर बस कुठवर पोहोचली आहे याचा अंदाज प्रवाशांना येऊ शकणार आहे. यामुळे प्रवाशांना आपल्या प्रवासाचे नियोजन करणे सोपे जाणार आहे. त्याचप्रमाणे नोकरदार वर्गाला ‌देखील याचा भरपूर फायदा होणार आहे. जिओ फेन्सिंग फिचर हाताशी असल्याने लोक सार्वजनिक वाहतुकीचा आणखी जास्त वापर करू लागतील, असा विश्वास कदंब महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

खासगी बसगाड्यांच्या नोंदणीची योजना
सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणाऱ्या प्रवाशांना अधिक सोयीस्कर व्हावे यासाठी खासगी बसगाड्यांचीही या मंचावर नोंदणी करण्याची योजना आहे. खासगी बसगाड्यांच्या दहा हजार वेळा आहेत. एका खासगी बसकडून सरासरी आठ फेऱ्या मारल्या जातात. त्यांची या व्यवस्थेमध्ये नोंद केल्यानंतर प्रवाशांना प्रवासाची आखणी करणे अधिक सोपे जाईल, असे कदंबच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com