सहा महिन्‍यांनंतर कदंब धावली कोकणात; पहिल्‍याच दिवशी ३० टक्के प्रतिसाद

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

टाळेबंदीच्या काळात सीमा बंद झाल्याने कदंब वाहतूक बंद झाली. त्यामुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. सप्टेंबरपासून सीमा खुल्या झाल्याने ज्यांना ये - जा करण्यासाठी वाहन आहे, ते लोक गोव्यात पुन्हा रोजगारासाठी येऊ लागले आहेत. 

पणजी: सहा महिन्यानंतर कोकणात आज कदंब बसगाड्यांची सेवा सुरू केली. सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण याठिकाणी गेलेल्या बसगाड्यांना पहिल्या दिवशी ३० टक्के प्रतिसाद मिळाल्याची माहिती कदंब महामंडळाचे सरव्यवस्थापक संजय घाटे यांनी दिली. 

कोरोनामुळे सीमा बंद असल्याने कदंब बसेस महाराष्ट्रात टाळेबंदीच्या सुरुवातीच्या काळात फक्त खलाशांना आणण्यासाठी गेल्या होत्या. सिंधुदुर्गातून अनेकजण नोकरीच्या निमित्ताने गोव्यात येतात. परंतु, टाळेबंदीच्या काळात सीमा बंद झाल्याने कदंब वाहतूक बंद झाली. त्यामुळे अनेकांना रोजगाराला मुकावे लागले. सप्टेंबरपासून सीमा खुल्या झाल्याने ज्यांना ये - जा करण्यासाठी वाहन आहे, ते लोक गोव्यात पुन्हा रोजगारासाठी येऊ लागले आहेत. 

कदंब महामंडळाने आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात सावंतवाडी, वेंगुर्ला आणि मालवण अशा तीन ठिकाणी बसगाड्या सोडल्या आहेत. त्यात सावंतवाडीसाठी दिवसातून ४ आणि वेंगुर्ला व मालवणसाठी प्रत्येकी २ अशा नऊ फेऱ्या होत आहेत. आज बससेवेचा पहिला दिवस असल्याने ३० टक्के प्रतिसाद मिळाल्याचे घाटे म्हणाले. बसगाड्या सुरू झाल्याची लोकांना माहिती झाल्यानंतर ते येतील, असे ते म्हणाले. कदंब महामंडळाने सीमा खुली होताच बेळगाव व कारवार या ठिकाणी बसगाड्या सोडल्या आहेत. या सेवांना प्रवाशाचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. 

कर्नाटक आघाडीवर
कर्नाटक परिवहन वाहतूक महामंडळाने गोव्यात अनेक ठिकाणाहून बसेस सोडण्यास सुरवात केली आहे. हुबळी, धारवाड अशा ठिकाणाहून बसेस ये-जा करीत आहेत.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या