गोवा : काॅंग्रेस संपवण्याचा कामत आणि रेजिनाल्ड यांचा डाव

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 10 एप्रिल 2021

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक असलेल्या गोवा फाॅरवर्डसोबत युती करून कामत व रेजिनाल्ड यांनी काॅंग्रेसला संपवण्याचा घाट घातला आहे.

काॅंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते दिगंबर कामत व काॅंग्रेसचे कुडतरीचे आमदार रेजिनाल्ड लाॅरेन्स यांनी मडगाव पालिका निवडणुकीसाठी गोवा फाॅरवर्डसोबत केलेली युती म्हणजे फातोर्डा व कुडतरीतून काॅंग्रेसला संपवण्याचे कारस्थान असल्याचा आरोप काॅंग्रेसचे प्रवक्ते ट्रोझन डिमेलो यांनी केला. 

राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा (एनडीए) घटक असलेल्या गोवा फाॅरवर्डसोबत युती करून कामत व रेजिनाल्ड यांनी काॅंग्रेसला संपवण्याचा घाट घातला आहे, असा आरोप डिमेलो यांनी येथे पत्रकार परिषदेत केला. यावेळी काॅंग्रेसचे फातोर्डा प्रभारी डाॅ. आशीश कामत, फातोर्डा काॅंग्रेसच्या गटाध्यक्ष पियेदाद नोरोन्हा, कार्यकारी अध्यक्ष योगेश नागवेकर, सरचिटणीस जुझे सिल्वा उपस्थित होते. रेजिनाल्ड हे आगामी विधानसभा निवडणूक काॅंग्रेसच्या उमेदवारीवर लढणार नाहीत हे त्यांनी स्पष्ट केले आहे, तर कामत हे भाजपमध्ये प्रवेश करतील असे भाकीतही डिमेलो यांनी केले. 

मडगाव: अर्ज मागे घेतलेल्या 11 उमेदवारांचा मडगाव नागरी युतीच्या पॅनलला पाठिंबा

आमदारांपैकी एकट्या रेजिनाल्ड यांनाच सचिवालयात केबिन देण्यात येते. रेजिनाल्ड यांचे मुख्यमंत्र्यांशी सेटींग असल्यानेच त्यांना हे केबिन देण्यात आले आहे, असा आरोप त्यांनी केला. फातोर्डा गट काॅंग्रेस समिती भाजप व गोवा फाॅरवर्डच्या पॅनलचा पराभव करणार आहे, असेही त्यांनी सांगितले. कामत यांनी गोवा फाॅरवर्डशी केलेल्या युतीच्या प्रसंगी काॅंग्रेसच्या चिन्हाचा वापर केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करणारे पत्र आपण पक्षश्रेष्ठींना लिहिणार असल्याचे डिमेलो यांनी सांगितले. (Goa Kamat and Reginalds innings to end Congress)

काॅंग्रेस पक्ष संयुक्त लोकशाही आघाडीचा (युपीए) भाग असून एनडीएत असलेल्या पक्षासोबत युपीए कधीही युती करू शकत नाही. काॅंग्रेस सोबत युती हवी असेल तर गोवा फाॅरर्वडचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी आधी एनडीएतून बाहेर पडावे, असा मुद्दा आशीश कामत यांनी मांडला. पालिका निवडणुकीत फातोर्डा गट काॅंग्रेस समितीचे सहा उमेदवार असतील, असे कामत यांनी सांगितले. 

संबंधित बातम्या