कचरापेट्या खरेदी घोटाळ्याची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी: किरण कांदोळकर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सांगितले, की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस पक्षातील भ्रष्टाचारी आमदारांना भाजपात प्रवेश देऊन निष्ठावंत व प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे.

म्हापसा: गोव्यात भाजप राजवटीत अन्य पक्षातून आयात केलेल्या दोन आमदारांकडे अधिक संपत्ती असल्याचा  ठपका लोकायुक्तांनी ठेवला आहे. तसेच लेबरगेट घोटाळा व समुद्र किनारे स्वच्छता योजनेतील पर्यटन खात्याने केलेल्या कचरापेट्या खरेदी घोटाळ्यासंदर्भात राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत सखोल चौकशी करणार नाहीत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोटाळ्यासंदर्भात संबंधितांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी पत्राद्वारे थिवीचे भाजपचे माजी आमदार किरण कांदोळकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली आहे.

माजी आमदार किरण कांदोळकर यांनी सांगितले, की मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कॉंग्रेस पक्षातील भ्रष्टाचारी आमदारांना भाजपात प्रवेश देऊन निष्ठावंत व प्रामाणिक भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय केला आहे. विद्यमान उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकर व माजीमंत्री कुंभारजुवेचे आमदार पांडुरंग मडकईकर या दोन आमदारांनी मोठ्या प्रमाणात आपली संपत्ती वाढविली आहे. आयकर विभागाकडे दिलेल्या हिशेबापेक्षा जास्त आर्थिक व्यवहार झालेला असल्यामुळे गोव्याचे लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी सेवानिवृत्त होताना अनेक महत्वाचे निर्णय दिले आहेत. या दोन आमदारांवर सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्याचे निर्देश लोकायुक्तांनी दिले आहेत.

समुद्र किनारपट्टीवर ठेवण्यात आलेल्या कचरापेटी घोटाळा प्रकरणी चौकशी गोवा पोलिस खात्याच्या भ्रष्टाचार विरोधी पथकाने (एसबी) करावी अशी शिफारस लोकायुक्त न्यायमूर्ती मिश्रा यांनी केली आहे. कचरापेटी घोटाळ्यामध्ये पर्यटन खात्याचे अधिकारी अडकले आहेत. या घोटाळ्याला पर्यटनमंत्री जबाबदार असू  शकतात. किनारपट्टी स्वच्छता करण्यासाठी नेमलेल्या कंपनीला दिलेल्या कचरापेट्या पर्यटन खात्याने खरेदी केल्या नाहीत. परंतु खरेदी शुल्क पर्यटन खात्याने भरले आहे. यासंदर्भात सखोल चौकशी करण्याची शिफारस न्यायमूर्ती मिश्रा यांनी केली आहे.

हा कचरापेटी खरेदी घोटाळा आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नजरेस आणून दिला आहे. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह साजरा करण्यात आला होता. त्‍यावेळी अनेक किनारपट्टी भागातील आमदारांनी समुद्रकिनारे स्वच्छ करण्याचे काम केले आहे यावरून लक्षात येत की किनारपट्टी स्वच्‍छता करण्यासाठी नेमलेली कंपनी काहीच करीत नाही. फक्त या कंपनीने पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांमार्फत गोव्याला लुटण्याचे काम हाती घेतल्याचे लक्षात येते, असे कांदोळकर यांनी सांगितले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या