मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर; पारोडा रस्ता पाण्याखाली

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 22 सप्टेंबर 2020

दक्षिण गोव्याला गेले दोन दिवस पावसाने झोडपून काढले असून केपे, सांगे तालुक्यात जोरदार वृष्टी झाली आहे. त्यामुळे कुशावती नदीला पूर आला आहे. काल मध्यरात्रीच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अवेडे- पारोडा पुलावरून पाणी वाहू लागले.

मडगाव: केपे- सांगे तालुक्यात दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कुशावती नदीला पूर आला असून केपे- मडगाव रस्ता पाण्याखाली गेला आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे पारोडा येथील कालवा फुटला व रस्ता पाण्याखाली गेल्याने केपे- मडगाव मार्गावरची वाहतूक चांदरमार्गे वळवण्यात आली आहे. 

दक्षिण गोव्याला गेले दोन दिवस पावसाने झोडपून काढले असून केपे, सांगे तालुक्यात जोरदार वृष्टी झाली आहे. त्यामुळे कुशावती नदीला पूर आला आहे. काल मध्यरात्रीच नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने अवेडे- पारोडा पुलावरून पाणी वाहू लागले. केपे - पारोडा रस्ताही पाण्याखाली गेला असून आज संध्याकाळपर्यंत पाणी उतरले नाही. नदीच्या पाण्याच्या पातळी कमी झाल्याने दुपारपासून पुलावरून वाहणारे पाणी ओसरले. तथापि, केपे - मडगाव मार्ग अद्याप पाण्याखाली आहे. 

पारोडा बाजारातील रस्ता जलमय झाला असून मुळस येथील घरांच्या उंबरठ्यापर्यंत पाणी आले आहे. दुपारी पावसाचा जोर कमी झाल्याने पुराचे पाणी काही प्रमाणात ओसरले. पण, बाजार व मुळस परिसर जलमय आहे, असे पारोडाचे माजी सरपंच व पंच दीपक खरंगटे यांनी सांगितले. रस्ता पाण्याखाली गेल्याने केपे - मडगाव वाहतूक चांदरमार्गे वळवण्यात आली आहे, असे केप्याचे पोलिस निरीक्षक संतोष देसाई यांनी सांगितले.

पावसामुळे फोंड्यातील भातशेतीला धोका
फोंडा: अवकाळी जोरदार पावसामुळे फोंडा तालुक्‍यातील जनजीवन विस्कळित झाले आहे. काल (रविवारी) रात्रीपासून फोंड्यात संततधार पाऊस कोसळत असून दुपारी काही अंशी विश्रांती घेतलेल्या पावसाने संध्याकाळी पुन्हा जोर लावला. सकाळी कामाधंद्यासाठी बाहेर पडलेल्या व संध्याकाळी घरी परतणाऱ्या लोकांची पावसामुळे तारांबळ उडाली. दरम्यान, पावसामुळे तालुक्‍यातील भातशेती कुजण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

फोंड्यात गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे उभारलेल्या शेतीवर विपरित परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. हातातोंडाला आलेले भातपीक पावसामुळे कुजण्याची शक्‍यता आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या