कामगार नेते रोहिदास बाबूराव शिरोडकर यांच निधन

कामगार नेते रोहिदास बाबूराव शिरोडकर यांच निधन
Rohidas Baburao Shirodkar

फोंडा: सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय अशा विविध क्षेत्रात कार्यरत प्रसिद्ध चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, लेखक असे बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेले रोहिदास बाबूराव शिरोडकर (वय 65) यांचं काल (शुक्रवारी) दुपारी बांबोळी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळात उपचार घेत असताना निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यातून ते बरे झाले तरी पुढील उपचारासाठी बांबोळी इस्पितळात दाखल झाले होते. अंत्यदर्शन आज तळेवाडा-बेतोडा येथील निवासस्थानी तर अंत्यसंस्कार फोंड्यातील मुक्तिधाम स्मशानभूमीत सकाळी अकरा वाजता करण्यात येत आहे.(Goa labour leader Rohidas Baburao Shirodkar passed away)

नम्र, शांत, संयमी आणि परोपकार वृत्तीबरोबरच अन्यायाविरुद्ध लढा देण्यासाठी धाव घेणारे असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांचा मित्र परिवारही फार मोठा होता. एक उत्कृष्ट कलाकार म्हणून परिचीत असलेले रोहिदास शिरोडकर हे "रोबाशी आर्टस्‌'' या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांनी अनेक चित्रपटांची निर्मिती या संस्थेतर्फे केली होती. त्यात "ऋण ते फारीकपणाचे'', "त्याग'', "उद्‌ध्वस्त संसार'' आदींचा समावेश होता. अनेक नाटकांची निर्मितीही त्यांनी केली होती. काही पुस्तकेही त्यांची प्रसिद्ध झाली आहेत. गोमंतकीय युवा कलाकारांना लघुपट, चित्रपट व नाटकांत संधी देण्यासाठी त्यांचे नेहमीच प्राधान्य असे. त्यांना कला अकादमीचे पुरस्कारही प्राप्त झाले होते तसेच अनेक संस्था संघटनांनीही त्यांचा गौरव केला होता. 

कामगार संघटनेशी संबंधित असलेल्या रोहिदास शिरोडकर यांनी कामगारांचे प्रश्‍न धसास लावण्यासाठी झालेल्या आंदोलनात भागही घेतला होता. राजकारणाशी संबंध असलेल्या रोहिदास शिरोडकर यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश आले होते. उत्तर प्रदेशमधील मुलायमसिंग यादव यांच्या समाजवादी पक्षाचे ते गोवा प्रदेशाध्यक्ष होते, पण नंतरच्या काळात या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून गोव्याच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी या पक्षाचा त्याग करून समविचारी पक्षांना सहकार्य केले होते. तळेवाडा-बेतोडा येथील सद्‌गुरु पारवडेश्‍वर मठाशी त्यांचा संबंध होता. दिवंगत सद्‌गुरु पारवडेश्‍वर महाराज यांचे ते ज्येष्ठ बंधू होते. त्यांच्या पश्‍चात पत्नी, बंधू तसेच बहिणी, भाचे, पुतणे असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाबद्दल अनेक संस्था, संघटनांनी दुखवटा व्क्त केला आहे.

मान्यवरांकडून स्मृतींना उजाळा!
गोमंतकातील एक चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व हरपले असल्याचे उद्‌गार कला व संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांनी दुःख व्यक्त करताना काढले. कामगार नेता ख्रिस्तोफर फोन्सेका यांनीही कामगारांप्रती कळवळा असलेला एक नेता कालवश झाल्याचे म्हटले असून साहित्यिक मिलिंद म्हाडगूत यांनी एका गुणी कलाकाराला गोमंतकीय मुकले असल्याचे नमूद केले असून सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ता तथा मिशन हेल्थ एज्युकेशनचे संस्थापक मधू नाईक यांनी तसेच मडकई येथील प्रा. नामदेव नाईक यांनीही दुःख व्यक्त करताना स्मृतींना उजाळा दिला. 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com