मुक्तिदिनाच्या चैतन्याने नटली राजधानी

दैनिक गोमन्तक
रविवार, 20 डिसेंबर 2020

राज्यात सर्व ठिकाणी आज गोवा मुक्तिदिन साजरा करण्यात आला. हा सोनेरी दिवस प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने साजरा केला.

पणजी: राज्यात सर्व ठिकाणी आज गोवा मुक्तिदिन साजरा करण्यात आला. हा सोनेरी दिवस प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने साजरा केला. हा दिवस साजरा करण्यासाठी राजधानी पणजी सज्ज झाली होती. ठिकठिकाणी केलेली विद्युत रोषणाई, लावण्यात आलेली चित्रे तसेच गोमंतकीय संस्कृतीचे नजराणे पणजीची शोभा वाढवत होते. अनेकजण आज सायंकाळी हे रूप पाहण्यासाठी घराबाहेर पडले होते. 

केवळ स्थानिकांनीच नाही तर बाहेरून आलेल्या पर्यटकांनाही हे नजराणे खूप आवडले. या नजराण्यासोबत स्वतःला कॅमेराबद्ध करून घेण्याची हौस लोकांनी भागवून घेतली. आझाद मैदानाच्या चारी बाजूनी गोवा मुक्तीसाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे फोटो, मुक्तीच्या आठवणी आणि राज्यात असणाऱ्या वेगवेगळ्या योजनांचे मोठाले फ्लेक्स लावण्यात आले होते. तसेच चौकाचौकात राज्याच्या संस्कृतीची झलक दाखविणारे पोस्टर तसेच येथील जनजीवन आणि पारंपरिक संस्कृतीबंध दर्शविणारे कागदी पुतळे लावण्यात आले होते. ताळगाव रस्त्यावर लावण्यात आलेल्या चांदण्यांनी या सौंदर्यात अधिक भर टाकली होती. या सर्व गोष्टींमुळे रस्त्यांचे रुपडेच पालटले. 

काही दिवसात ख्रिसमस येणं असल्याने अनेक घरांत विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ही रोषणाईसुद्धा राजधानी पणजीच्या सौंदर्यात अधिक भर घालणारी ठरली. 

आणखी वाचा:

गोव्यातील विविधतेत एकता ; गोमंतकीयांच्या ऐक्याचे राष्ट्रपतींकडून कौतुक -

संबंधित बातम्या