मद्य व्यवसाय सुरू, तरीही अबकारी महसुलात घट

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 28 सप्टेंबर 2020

कोरोना काळात जमा झालेला महसुलाची तुलना गेल्यावर्षी त्याच काळातील महिन्यांबरोबर केल्यास सुमारे ५० कोटी महसुलाची तूट आहे. पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास सुधारणा होण्याची शक्यता अबकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

पणजी: राज्यात घाऊक व किरकोळ मद्यविक्री सुरू झाल्यापासून व मद्यालयांना गेल्या महिन्यापासून परवानगी देण्यात आली, तरीही अबकारी खात्याची महसूलप्राप्तीची गाडी अजूनही रूळावर आलेली नाही. कोरोना काळात जमा झालेला महसुलाची तुलना गेल्यावर्षी त्याच काळातील महिन्यांबरोबर केल्यास सुमारे ५० कोटी महसुलाची तूट आहे. पर्यटन व्यवसाय सुरू झाल्यास सुधारणा होण्याची शक्यता अबकारी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. 

अबकारी खात्याचा महसूल हा राज्यामध्ये विक्री होणाऱ्या मद्यविक्रीमधून मिळणारा कर, नवीन मद्यालयाच्या परवान्यासाठीचे शुल्क व कारवाई केलेल्या प्रकरणातून बजावण्यात आलेल्या दंडात्मक कारवाईतून हा महसूल जमा होतो. कोविड महामारीच्या काळात नव्याने परवाने देण्यात आलेले नाहीत, तसेच मार्च टाळेबंदीनंतर ते एप्रिल अखेरपर्यंत मद्य व्यवसाय बंदच होता. मार्च ते मे हा पर्यटनाचा मुख्य काळ असतो. मात्र, त्याचवेळी राज्याच्या सीमा बंद झाल्याने गोव्यात येणाऱ्या देशी व विदेशी पर्यटकांवर बंदी घालण्यात आली. त्यामुळे त्याचा परिणाम अबकारी महसुलावर पडला आहे. ही स्थिती जोपर्यंत कोरोना महामारी संसर्ग सुरू आहे, तोपर्यंत अशीच राहणार आहे. राज्यात आता देशी पर्यटक येऊ लागल्याने पर्यटन व्यवसायाला पुष्टी मिळून अबकारी महसूल वाढण्याची शक्यता आहे, असे मत या अधिकाऱ्याने व्यक्त केले. 

दरवर्षी पर्यटन मोसमाबरोबर काही पर्यटक पावसाळ्यातही मोठ्या प्रमाणात गोव्यात येतात. त्यामध्ये अधिक तर हे व्यापारी वर्गातील असतात. त्यामुळे अबकारी महसुलाची प्रतिमाह सरासरी ३५ ते ४० कोटी रुपये जमा होते. मात्र, कोरोना महामारीमुळे हे प्रमाण बरेच घसरले आहे. सरासरी प्रतिमाह २० ते २२ कोटी रुपये जमा झाले आहेत. अबकारी महसूल कमी झाल्याने खात्याने मद्यप्रकरणीची जी प्रकरणे सुनावणीनंतर निकालात काढली, त्यातील मालाचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठीची प्रक्रिया सुरू झाली आहे. बेकायदेशीर मद्याचा साठा केलेला तसेच अबकारी चेकनाक्यावर बेकायदा वाहतूकप्रकरणी जप्त करण्यात आलेल्या मद्याच्या बाटल्या या लिलावात काढण्यात येईल. पुढील महिन्यात हा लिलाव होईल. 

राज्यात अबकारी खात्याचे आठ ठिकाणी चेकनाके आहेत. त्यामध्ये पत्रादेवी, न्‍हयबाग, दोडामार्ग, केरी - सत्तरी, किरणपाणी, मोले - सांगे, काणकोण तसेच पोळे याचा समावेश आहे. अधिकाधिक दारूची तस्करी पत्रादेवी व पोळे या चेकनाक्यावर होते त्यामुळे या दोन्ही चेकनाक्यावर प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जाते. २०१६ ते २०१८ पर्यंत ज्या प्रकरणांची सुनावणी पूर्ण होऊन निकाली काढण्यात आले आहे. आतापर्यंत आठपैकी तीन चेकनाक्यांच्या हद्दीत जप्त केलेल्‍या मद्यसाठ्याला आयुक्तांनी संमती दिली आहे. त्यामध्ये सांगे तालुक्यात सुमारे १ लाख ३७ हजारांच्या मद्यसाठ्याचा, पेडणे चेकनाक्यावरील ३१ लाख ९८ हजारांचा मद्यसाठा तर काणकोण हद्दीतील ३ लाख २२ हजारांचा मद्यसाठा कारवाईवेळी जप्त केला. 

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या