Goa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले

Goa Fish Market: कसिनो, बार बंदच, मासळी मार्केट पूर्णपणे खुले
goa fish market

पणजी: Goa Lockdown राज्यस्तरीय संचारबंदी येत्या 21 जून सकाळी 7 वाजेपर्यंत वाढविण्यात आली असली तरी पालिका,(Municipal fish Market) पंचायत व मासळी मार्केट(Fish Market) उद्यापासून सुरू होणार आहेत. एका महिन्यापेक्षा जास्त दिवसांनी ती खुली होणार असल्याने मार्केटमध्ये होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण नसेल. त्यामुळे जरी संचारबंदी लागू असली तरी पालिका व मासळी मार्केटात सुरक्षित अंतर ठेवण्याचा फज्जा उडणार आहे. कसिनो(Casino) व मद्यालये (Bar)बंद ठेवण्यात आली आहेत. ( Goa Municipal Fish Market will open today Casino and Bar closed)

गेल्या 9 मे रोजी राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीवेळी काढण्यात आलेल्या आदेशात फक्त पालिका, पंचायत, मासळी मार्केट, आठवड्याचा बाजार यांना सूट देण्यात आली आहे. विवाह सोहळ्यासाठी परवानगी देण्यात आली असली तरी 50 पेक्षा अधिक उपस्थिती असू नयेत व अंत्यसंस्कारासाठी 20 पेक्षा अधिक लोक नसावेत असे निर्बंध घालण्यात आले आहेत. विवाह सोहळा यासाठी उपजिल्हाधिकारी किंवा जिल्हाधिकाऱ्यांकडून पूर्व परवानगीची सक्ती करण्यात आली आहे. 

राज्यात कोरोना संसर्गाचा फैलाव कमी झाला असला तरी सरकारने कोणताही धोका न पत्करता दुसऱ्यांदा पुन्हा सात दिवसांची वाढ केली आहे. दुकाने खुली ठेवण्याची वेळ सकाळी 7 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कायम ठेवली असली तरी गेल्या एक महिन्यानंतर पालिका व मासळी मार्केट पूर्णपणे खुले होणार असल्याने लोकांची गर्दी अपेक्षित आहे. पावसाळ्यापूर्व सामानाची खरेदी लोकांना करता आली नाही त्यामुळे अनेकांचे हाल झाले आहेत. 

पणजीत पालिका क्षेत्रातील जीवनावश्‍यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने संचारबंदीच्या काळात बंद ठेवण्यात आली होती मात्र गेल्या 7 जूनलाच काहीजणांनी आपापली दुकाने उघडून सुरू केली होती. आदेशाचे उल्लंघन होऊनही महापालिकेनेही दुकानांकडे दुर्लक्ष केले होते. पालिका क्षेत्रातील कोणती दुकाने खुली असतील व कोणती बंद असतील यासंदर्भात आता व यापूर्वी काढलेल्या आदेशात स्पष्टोक्ती नसल्याने काही दुकानदार संभ्रमावस्थेत होते. एकामागोमाग सर्वांनीच पालिका मार्केटात गेल्या आठवड्यात दुकाने खुली केली होती. महापालिकेच्या मार्केट समितीचे अध्यक्ष प्रमेय माईणकर यांनीही त्याला हरकत घेतली नव्हती. 

तापमान तपासणी!
राज्यातील कसिनो तसेच मद्यालये सुरू करण्यासाठी सरकारवर या व्यावसायिकांनी बराच दबाव आणला होता. मात्र कोरोना संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी ही स्थिती स्थिर होईपर्यंत सरकारने धोका पत्करला नाही. गोव्यात प्रवेश करणाऱ्यांना कोरोना चाचणी प्रमाणपत्र कायम ठेवले आहे. वैद्यकीय उपचारासाठी गोव्यात प्रवेश करणाऱ्यांनी त्यासंदर्भातचा पुरावा दाखवल्यास परवानगी दिली जाईल. जीवनावश्‍यक वस्तूच्या मालवाहतूक वाहनांवरील दोन चालक व एका हेल्पर याला कोरोनाची लक्षणे आहेत की नाही याची खात्री थर्मल गनने तपासणी केल्यानंतरच प्रवेश दिला जाणार आहे.

मोबाईल दुकानदार संभ्रमात
पणजी मार्केटमधील मोबाईल दुकानदार संभ्रमात आहेत. पणजी मार्केटच्या पहिल्या मजल्यावर बहुतांश दुकाने ही मोबाईल व कपड्याची आहेत. त्यामुळे त्यांना दुकाने उघडण्याची परवानगी दिली गेली की नाही, याबाबत विचारणा करण्यासाठी काही दुकानदारांनी पणजी महापालिकेकडे विचारणा करण्याचे ठरवले आहे. आज रविवार असल्याने महापालिका कार्यालय बंद असल्याने उद्या महापालिकेला विचारून दुकाने उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे मोबाईल दुकानदारांनी सांगितले. पणजी महापालिकेच्या मार्केट समितीचे अध्यक्ष नगरसेवक प्रमेय माईणकर हे संबंधित अधिकाऱ्यांना भेटून मार्केटमधील मोबाईल व कपड्यांच्या दुकानांबाबत माहिती घेऊन ती दुकानदारांपर्यंत पोचवणार आहेत.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com