गोवा लॉकडाऊन अटळ! राष्ट्रीय पातळीवर राज्याचा दुसरा क्रमांक; तरी मेजवान्‍या, पार्ट्या सुरूच

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 30 मार्च 2021

चाचणीच्या तुलनेत कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण गेल्या 14 दिवसांत 8.8 टक्क्यांवर गेले आहे. यामुळे गोव्याचा समावेश राष्ट्रीय पातळीवर आता ‘लाल’ विभागात झाला आहे.

पणजी : चाचणीच्या तुलनेत कोविडचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण गेल्या 14 दिवसांत 8.8 टक्क्यांवर गेले आहे. यामुळे गोव्याचा समावेश राष्ट्रीय पातळीवर आता ‘लाल’ विभागात झाला आहे. राष्ट्रीय पातळीवर चाचण्यांच्या तुलनेत कोविड रुग्ण सापडण्यात राज्याचा दुसरा क्रमांक लागणे ही धोकादायक बाब आहे. असे असतानाही 144 कलमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. मेजवान्या सुरू आहेत. लोक एकत्र येत आहेत. सरकारी यंत्रणा केवळ हतबल होऊन बघ्याची भूमिका घेत असल्याने कोविडचा प्रकोप येत्या काही दिवसांत राज्याला जाणवला तर आश्चर्य वाटू नये.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचा कोरोना अहवाल आला...

धुळवडीच्या दिवशी लोक एकत्र येतील, याची पुरेशी कल्पना सरकारी यंत्रणेला असूनही आज गोवा कोविडच्या हरित विभागात असावा असेच वर्तन सरकारी यंत्रणेचे होते. गटागटाने फिरणाऱ्यांना कोणी हटकत नव्हते की, किनारी भागात काल रात्री झालेल्या पार्ट्या थांबवून लोकांच्या आरोग्याची काळजी करणे सरकारी यंत्रणेला महत्त्‍वाचे वाटले नाही. राज्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी ‘आव जाव घर तुम्हारा’ अशी स्थिती सरकारने करून टाकली. मास्क परिधान न करता पर्यटक बिनधास्तपणे फिरत असून पर्यटनस्थळांवर होणारी त्यांची गर्दी सरकारी यंत्रणेला दिसत नाही, असे दिसते. अर्थचक्र चालले पाहिजे म्हणून पर्यटन क्षेत्राकडे कानाडोळा करणे राज्याला महागात पडू शकते. महाराष्ट्राच्या धर्तीवर गोव्याचीही लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल होऊ शकते.

वर्ष लोटले तरीही...

गेल्या वर्षी 25 मार्चला कोविडचा पहिला रुग्ण राज्यात सापडला होता. त्यानंतर आता वर्ष होऊन गेले. गेल्‍या वर्षभरात चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण सापडण्याचा दर सरासरी 10.7 होता. आज चाचण्यांच्या तुलनेत 8.8 रुग्ण सापडले. गेल्या दहा दिवसातील हा उच्चांक आहे. कोविडचे 1 हजार 429 रुग्ण सध्या राज्यात आहेत. गेल्या वर्षी 3 डिसेंबरला राज्यात 1 हजार 418 रुग्ण राज्यात होते.

10 लाखांमागे 568 जणांनी कोविडमुळे जीव गमावला 

राज्‍यात कोविडचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे. तो आता 96.09 टक्क्यांवर पोहोचला आहे. 1 मार्च रोजी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.5 टक्के होते. यामुळे कोविडचा नवा विषाणू हा उपचारांना तेवढा प्रतिसाद देत नाही, असे अनुमान काढता येते. त्याशिवाय आजवर 828 जणांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचे प्रमाण 1.43 टक्के आहे जे राष्ट्रीय सरासरीच्या तुलनेत जास्त आहे. या आकडेवारीच्या तुलना करता प्रत्येक 10 लाख लोकसंख्येमागे 523जणांचा मृत्यू कोविडमुळे झाला आहे. अगदी 2011 ची जनगणनेची साडेचौदा लाख ही लोकसंख्या जमेस धरली तरी 10 लाखांमागे 568 जणांनी कोविडमुळे जीव गमावला आहे.

जूनपर्यंत 50 टक्के जनतेकडून चाचणी शक्‍य
राज्यातील 34.1 टक्के लोकसंख्येने आरटी पीसीआर चाचणी करून घेतली आहे. या दराने 15ते 30 जून दरम्यान 50 टक्के जनतेकडून कोविड चाचणी करून घेतलेली असेल.

कोविड प्रकाराबाबत सरकारही अनभिज्ञ

कोविड विषाणूचा कोणता प्रकार राज्यात आहे, याविषयी आरोग्य यंत्रणेने खुलेपणाने माहिती दिलेली नाही. युके बी11.7, दक्षिण आफ्रिकेचा बी.1.351, ब्राझिलचा पी. 1 कि हे तिन्ही विषाणूंचे प्रकार राज्यात पोहोचले आहे की नाहीत याची माहिती आरोग्य खात्याने देण्याची गरज आहे. लसीकरणाला हे नवे विषाणू प्रतिसाद देत नसल्याची माहिती जगभरात प्रसारित होत आहे. सरकार एकाबाजूने लसीकरण मोहीम राबवत असतानाच त्यामुळे याची नीट माहिती जनतेला देणे गरजेचे बनले आहे.

गोवा विधानसभेचे माजी सभापती सुरेंद्र सिरसाट (वय 80 वर्षे) यांचे आज रात्री म्हापसा येथील खासगी इस्पितळात निधन झाले

मंत्री, आमदार ‘कोविड निगेटिव्‍ह’
पणजीचे आमदार आतानासिओ मोन्सेरात यांना विधानसभा अधिवेशन सुरू असताना कोविडची  लागण झाली. सध्या ते इस्पितळात उपचार घेत आहेत. त्यांच्या संपर्कात आल्याच्या संशयावरून मंत्री, आमदार व विधीमंडळ कर्मचाऱ्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे विधीमंडळ सचिवालयाकडून सुचवण्‍यात आले होते. त्यानुसार केलेल्या चाचणीत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, मंत्री गोविंद गावडे, आमदार दयानंद सोपटे, विनोद पालयेकर, रोहन खंवटे, विजय सरदेसाई, जयेश साळगावकर यांना कोविडची लागण झाली नसल्याची माहिती जाहीर झाली आहे. याच पार्श्वभूमीवर आज विधानसभा कामकाज नेहमीप्रमाण सुरू राहील, असे सभापती राजेश पाटणेकर यांनी स्पष्ट केले आहे.

गोव्यातील कॉंग्रेसचे लोकसभेचे खासदार फ्रान्सिस सरदिन्हा यांनी पक्षाचेच प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांच्यावर जोरदार टीका केली

संबंधित बातम्या