Goa Lockdown: कदंब बससेवा, मासळी मार्केट सात ते सात सुरू

Goa Lockdown: कदंब बससेवा, मासळी मार्केट सात ते सात सुरू
Goa Lockdown Panchayat Market Fish Market Kadamba bus service will continue

पणजी: राज्यात लागू केलेली चार दिवसांची अंशतः टाळेबंदी उद्यापासून असणार नाही, मात्र दिवसेंदिवस वाढत असलेल्या कोरोना संसर्ग तसेच मृत्यूच्या प्रकरणांमुळे कोरोना निर्बंधाची मुदत आज 3 मे सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 मे सकाळी 7  वाजेपर्यंत असे आठ दिवस वाढ करण्याचा सरकारने घेतला आहे. या काळात राज्यात जमावबंदी (कलम 144) लागू असेल. हे निर्बंध सकाळी 7 ते संध्याकाळी 7  वाजेपर्यंत लागू असतील. या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कलम 188 खाली कडक कारवाई केली जाईल. लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज संध्याकाळी घेतलेल्‍या पत्रकार परिषदेत केले. 

राज्यात टाळेबंदीच्या काळात लोकांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, की राज्यातील अंशतः टाळेबंदी पहाटे 6 वाजता संपणार आहे मात्र त्याच वेळेपासून पुढील आठ दिवसांसाठी कोरोना चे निर्बंध लागू होणार आहेत. सर्व अत्यावश्‍यक सेवा व उद्योग सुरू राहतील. ज्याच्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत त्यांनी कोरोना मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे करणे सक्तीचे आहे. पूर्वपरवानगीने विवाह सोहळ्यास 50 जणांचीच उपस्थिती व मृतदेहावर अंत्यसंस्कार 20 जणांनाच परवानगी असेल. शहर व पंचायत क्षेत्रातील बाजारपेठा, मासळी मार्केट सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंतच खुली असतील. कदंब बससेवा तसेच सार्वजनिक बससेवा सुरू राहणार आहे. अंशतः टाळेबंदीच्या काळात जे निर्बंध घालण्यात आले होते त्यातील बहुतेक गोष्टी कायम ठेवण्यात आल्या आहेत. 

लोकांना अनेक पद्धतीने कामाविना किंवा विनाकारण घराबाहेर पडू नका असे आवाहन करण्यात येत आहे. ही वेळ सहकार्य करण्याची आहे. सर्वांनी सहकार्य केल्यास कोरोना या महामारीवर मात करणे शक्य आहे. त्यामुळेच प्रत्येकाने कोरोना च्या निर्बंधाचे काटेकोरपणे पालन करावे अशी अपेक्षा आहे. कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी हे निर्बंध पाळणे खूप महत्त्वाचे आहे.

राज्यातील कोरोना संसर्ग व मृत्यू प्रकरणे कमी करण्यासाठी सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. इस्पितळातील डॉक्टर्स व परिचारिका दिवसरात्र जीव धोक्यात घालून सेवा देत आहेत. दिवसेंदिवस वाढ असलेल्या कोरोना रुग्णांना खाटा, औषधे व प्राणवायूचा साठा कमी पडू नये म्हणून सरकार प्रयत्न करत आहे त्यामुळे प्रत्येकाने आजपासून लागू केलेल्या निर्बंधाचे पालन करून सहकार्य करावे, अशी अपेक्षा आहे. 
 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com