Goa Lockdown: सांगे बाजारपेठ आजपासून बंद

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 30 एप्रिल 2021

पार्श्वभूमीवर सांगेत उपजिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. विविध माध्यमातून चर्चा केल्यानंतर तीन दिवस सांगे बाजार कडकडीतपणे बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

सांगे : कोविडच्या वाढत्या संक्रमणाला आळा घालण्यासाठी जनतेकडून टाळेबंदीची वाढती मागणी होऊ लागली आहे. सरकारने अंशत: टाळेबंदी जाहीर केली आहे. त्‍या पार्श्वभूमीवर सांगेत उपजिल्हाधिकारी कार्यालयात तातडीची बैठक घेण्यात आली. विविध माध्यमातून चर्चा केल्यानंतर तीन दिवस सांगे बाजार कडकडीतपणे बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या बैठकीला उपजिल्हाधिकारी सागर गावडे, मामलेदार मनोज कोरगावकर, सांगेचे आमदार प्रसाद गावकर, सांगे पोलिस निरीक्षक सचिन पन्हाळकर, सांगेच्या आरोग्यधिकारी डॉ. सीमा पै फोंडेकर, नागरी पुरवठा अधिकारी संजीव नाईक, सांगे व्यापारी संघांचे अध्यक्ष राजू देसाई व व्यापारी वर्ग उपस्थित होता. आमदार प्रसाद गावकर म्हणाले की, राज्यातील परिस्थिती हाताबाहेर जात आहे. अजूनही सांगेतील स्थिती नियंत्रणात आहे, ती हाताबाहेर जाऊ देऊ नका. शक्य असल्यास तीन दिवस पूर्णवेळ आपली आस्थापने बंद ठेवून संक्रमण साखळी तोडण्याचा सर्वांनी मिळून प्रयत्न करण्यासाठी आवाहन केले. 

गोवा वैद्यकीय महाविद्यालयाकडून ऑक्सिजन सिलिंडर पुरवणाऱ्या कार्यकर्त्यांची फसवणूक:   गिरीश चोडणकर 

यावेळी अनेकांनी आपापली मते व्यक्त केली, काही व्यापारी आपली आस्थापने खुली ठेवण्यासाठी सरकारने दिलेल्या नियमानुसार राजी होते. मात्र काही व्यापारी या मताला सहमत होऊ शकले नाही. इतरांनी दिवसभर सर्वच बाजार खुला ठेवला तर टाळेबंदी कसली? बाजार फिरणारे निमित्त करून बाजारात फिरतच राहणार. मग वाढत्या संक्रमणाला रोखणार कसे? त्यापेक्षा सकाळी सहा ते आठ अशा दोन तासांत दुध आणि पाव विक्रीसाठी सूट देण्यात येऊन इतर सर्व आस्थापने बंद ठेवण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. 

यावेळी उपजिल्हाधिकारी सागर गावडे म्हणाले, तीन दिवस दुकाने बंद पाळणे हा तुमचा निर्णय. पण आम्ही तुम्हाला दबाव घालू शकत नाही. जो काही निर्णय घेणार तो ठामपणे घ्या, असे आवाहन करण्यात आले. त्याच बरोबर कारणाशिवाय बाजारात फिरणाऱ्यांना पोलिसांनी लगाम घालणे जरुरी आहे. केवळ सांगे बाजारात बंद पाळून सांगेच्या इतर ग्रामीण भागात होणाऱ्या गर्दीवर उपजिल्हाधिकाऱ्यानी जातीने लक्ष घालण्याची मागणी करताना सांगेतील सर्व पर्यटनस्थळे सर्व नागरिकांना बंद करण्याची मागणी यावेळी करण्यात आली असता अशा ठिकाणांवर पोलिस बंदोबस्त वाढविण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी सागर गावडे यांनी स्पष्ट केले. 

लॉकडाऊन वाढविण्याबाबत गोवा सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही 

सांगेत भरणारा आठवडी बाजार हा अर्धा दिवसाचा असल्याने सांगे व आसपासचे लोक गर्दी करून सामान खरेदी करतात. बाजार घेऊन येणारे हे मडगाव, फोंडा, कुडचडे, केपे भागातील असल्यामुळे नागरिक बाजार तूर्त बंद करण्याची मागणी करीत होते. प्रशासनाने कितीही नियम पाळून बाजार करा म्हणून सांगितले तरीही लोक दुर्लक्ष करूनच बाजारात फिरतात. या पेक्षा बाजार बंद करण्याचा पालिकेने निर्णय घेतला तो योग्य असल्याचे नागरिक समाधानाने सांगत आहे.     काही दुकानदार अजूनही मास्क न  बांधता व्यवहार करीत आहे. ग्राहक वेगवेगळ्या भागातून येत असतात याची कल्पना असूनही बेफिकीर पणे वागत आहेत. केवळ पोलीस  मास्क न वापरणाऱ्यावर कारवाई करतात म्हणून टीका करणाऱ्यांनी आता पुढाकार घेऊन उघड्या तोंडाने फिरणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे.

लोकांच्या कडवट प्रतिक्रिया 
कोरोना होऊन मरण्यापेक्षा घरी उपाशी मेलेले बरे. निदान घरी चारजण तरी येतील. आज काय परिस्थिती हॉस्पिटलात गेलेला माणसाचे घरच्या माणसांना तोंडसुद्धा पाहता येत नाही. ही परिस्थिती बरी की दहा दिवस घरी पोटाला चिमटा काढून थांबलेले बरे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे. आम्ही घरी थांबू, पण संचारबंदी नसल्याने बाजारात फिरणारे संक्रमण गावात आणून सोडतात त्याचे काय? अशा संतप्त प्रतिक्रिया एका दुकानदाराने नाव उघड न करण्याच्या अटीवर व्यक्त केल्या.

45 वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणासाठी 1 लाखाहून अधिक डोस उपलब्ध:  डॉ. प्रमोद सावंत 

संबंधित बातम्या