निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्याविरुद्ध कारवाई करा; लोकायुक्तांची शिफारस

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 23 सप्टेंबर 2020

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्देशांची पायमल्ली पोलिसांकडून केली जात असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याकडे महासंचालक व महानिरीक्षक डोळेझाक करत आहेत.

पणजी: कांदोळी येथील जसविंदर सिंग याने कळंगुट पोलिसात दिलेल्या तक्रारीप्रकरणी गुन्हा नोंदवून तपास करण्यात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी कळंगुटचे निरीक्षक नोलास्को रापोझ यांच्याविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करताना निलंबित किंवा त्याची बदली करण्याची शिफारस गोवा लोकायुक्तांनी अहवालात केली आहे. कळंगुट पोलिस प्रमुखांनी जसविंद सिंग यांची तक्रार नोंदवून घेण्याची शिफारस केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने दिलेल्या निर्देशांची पायमल्ली पोलिसांकडून केली जात असल्याचे अनेकदा आढळून आले आहे. या पोलिस अधिकाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्याकडे महासंचालक व महानिरीक्षक डोळेझाक करत आहेत. जे अधिकारी ड्युटी नियमानुसार करत नाही त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याची तरतूद सर्वोच्च न्यायालयाने केली आहे तरी ती केली जात नाही, अशी लोकायुक्तांनी अहवालात टिप्पणी केली आहे. नोलास्को रापोझ यांना निलंबित करावे की बदली करावी हा अधिकार पोलिस महासंचालक व सरकारचा आहे असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. 

जसविंदर सिंग यांनी कळंगुट पोलिस स्थानकात तक्रार दिली होती त्यात काही संशयितांची नावे देऊन घुसखोरी, विश्‍वासघात, मालमत्तेची नासधूस केल्याचे नमूद केले होते. या घटनेसंदर्भातचे पुरावे देणारे सीसी टीव्ही फुटेजही दिले होते. तरीही रापोझ यांनी गुन्हा नोंदवून न घेता कोणतीच कारवाई केली नाही. याप्रकरणी चोरी व घुसखोरीचा गुन्हा सिद्ध होत असल्याने निरीक्षकांनी प्राथमिक चौकशी करत बसण्यापेक्षा गुन्हा नोंदविण्याची आवश्‍यकता होती, असे अहवालात लोकायुक्तने म्हटले आहे.

कांदोळी येथील तक्रारदारच्या रेस्टॉरंटमध्ये २४ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी १०.१५ च्या सुमारास संशयित काही गुंडाना सोबत घेऊन आला. त्यामध्ये एक पुरुष व दोन महिला तसेच इतर काहीजण होते. संशयिताच्या कर्मचाऱ्यानी सीसी टीव्ही कॅमेराचा केबल्स कापल्या. त्यानंतर त्यातील सामानही घेऊन गेले. या एकंदर प्रकरणावरून घुसखोरी व चोरीचा गुन्हा उघड होत असतानाही पोलिस निरीक्षकांनी तो केला नाही असा आरोप सिंग यांनी लोकायुक्तकडे केलेल्या तक्रारीत केला होता.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या