गोवा बनावटीची दारू जप्त

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई, म्हापशातील एकास अटक; ११ लाखांचा मुद्देमाल

बांदा: राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या सिंधुदुर्ग भरारी पथकाने आज सकाळी सावंतवाडी-बेळगाव रस्त्यावर कारिवडे-बुर्डी पुलानजीक सापळा रचून बेकायदा गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर मोठी कारवाई केली. तब्बल ८ लाख ७४ हजार ५०० रुपये किमतीच्या उंची दारूसह एकूण १० लाख ८४ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी उमेद देवेंद्र साठे (वय २५, रा. बार्देश-म्हापसा-गोवा) याच्यावर अटकेची कारवाई केली.

सावंतवाडीचे नगराध्यक्ष संजू परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन राज्य उत्पादन खाते बेकायदा दारू वाहतुकीवर कारवाई करत नसल्याचे वक्तव्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर आज उत्पादन शुल्क खात्याने मोठी कारवाई केली आहे. सविस्तर माहिती अशी, की गोव्याहून आंबोलीच्या दिशेने बेकायदा गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती उत्पादन खात्याचे जिल्हा अधीक्षक डॉ. बी. एच. तडवी यांना मिळाली होती. त्यांनी आज सकाळीच निरीक्षक एस. के. दळवी, दुय्यम निरीक्षक यू. एस. थोरात, डी. एस. वायदंडे, जवान आर. डी. ठाकूर, दीपक वायदंडे, आर. एस. शिंदे यांच्यासह सापळा रचला होता.
 

संबंधित बातम्या