मडगाव पालिका क्षेत्रात दररोज गोळा होतो ४२ टन कचरा

वृत्तसेवा
रविवार, 20 सप्टेंबर 2020

मडगाव पालिका क्षेत्रात दर दिवशी ३० टन ओला कचरा व १० ते १२ टन सुका कचरा मिळून सुमारे ४२ टन कचरा गोळा करून सोनसड्यावर नेऊन टाकला जातो, अशी माहिती पालिका अभियंता अजय नाईक देसाई यांनी दिली.

नावेली: मडगाव पालिका क्षेत्रात दर दिवशी ३० टन ओला कचरा व १० ते १२ टन सुका कचरा मिळून सुमारे ४२ टन कचरा गोळा करून सोनसड्यावर नेऊन टाकला जातो, अशी माहिती पालिका अभियंता अजय नाईक देसाई यांनी दिली.

मडगाव नगरपालिकेने सोनसड्यावरील कचरा प्रकल्प काही महिन्यांपूर्वी फोमेंतोकडून आपल्या ताब्यात घेतला आहे. ओल्या कचऱ्‍यावर प्रक्रिया करण्यात येत आहे, परंतु प्रकल्पाचे तंत्रज्ञान जुने असल्याने कचऱ्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी २१ दिवसांचा कालावधी लागत आहे. सोनसड्यावर सुका कचरा साठवून ठेवण्यात आला असून तीन बेलींग मशीनचा वापर करून बेलींग करण्यात येत आहे. सुका कचरा साठवून त्यावर शेड उभारण्यात येणार होत्या. मात्र, कंत्राटदाराने शेड उभारण्याच्या कामाला अद्याप सुरवात केली नसल्याचे देसाई यांनी सांगितले. सोनसडो कचरा यार्डात कचऱ्‍यावर प्रक्रिया करण्यासाठी आता सात बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात तीन  व त्यानंतर दुसऱ्या टप्प्यात चार बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. पालिका मंडळाने दोन दिवसांपूर्वी पालिका मंडळाची यासंदर्भात खास बैठक बोलावली होती. त्यात बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला.

काही दिवसांपूर्वी कचरा व्यवस्थापन खात्याचे मंत्री मायकल लोबो यांनी विरोधी पक्षनेते तसेच मडगावचे आमदार दिगंबर कामत, फातोर्डा मतदारसंघाचे आमदार विजय सरदेसाई यांच्या समवेत सोनसड्यावर भेट देऊन पाहणी केली होती व सोनसड्यावर बायोमिथेशन प्रकल्प उभारण्यात येणार असल्याचे सांगितले होते. 

सोनसड्यावर गेली अनेक वर्षे असलेल्या डंप कचऱ्यावर रेमिडीएशन करण्यात येणार असून एप्रिल महिन्यापर्यंत सोनसड्यावरील कचऱ्‍याचा डोंगर हटविण्यात येणार असल्याचे मंत्री लोबो यांनी सांगितले होते.

मडगावात मोठ्या प्रमाणात गांधी मार्केट व एसजीपीडीए मार्केटमध्ये दरदिवशी भाजी, चिकन, मटण ओला कचरा तसेच मडगाव फातोर्डा परिसरात हॉटेलचा ओला कचरा तयार होतो. ओला कचरा दरदिवशी गोळा करून सोनसड्यावर नेऊन टाकला जातो, तर सुका कचरा बेलींग करून कर्नाटक राज्यात सिमेंट तयार करणाऱ्या फॅक्टरीत पाठविण्यात येतो. एका ट्रकमधून ३६ बेलींग बंडल लोड करून पाठविण्यात येतात, अशी माहिती देसाई यांनी दिली.

संबंधित बातम्या