
Goa Marathi Film Festival : गोव्यात असंख्य चित्रपटांचे चित्रिकरण होते. येथे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवही होतो. याच गोमंतभूमीत चित्रपट संस्कृतीला अधिक प्रोत्साहन मिळावे, हा ध्यास मनी बाळगून मराठी-कोकणी चित्रपटांना राज्य सरकार सहकार्य करीत आहे. कलाकार आणि चित्रपटसृष्टीशी संबंधित घटकांनी सरकारसोबत राहावे, निश्चित चित्रपट उद्योग वाढीस लागेल, असे मत मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
व्हिन्सन वर्ल्डने आयोजित केलेल्या तेराव्या गोवा मराठी चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
आयनॉक्समध्ये झालेल्या या कार्यक्रमास व्यासपीठावर ज्येष्ठ अभिनेत्री निवेदिता सराफ, आयएफबीचे कार्यकारी संचालक अनिरुद्ध केसकर, विन्सन वर्ल्डचे श्रीपाद शेट्ये, संजय शेट्ये उपस्थित होते. यावर्षी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना जाहीर झालेला जीवनगौरव पुरस्काराचा त्यांच्यावतीने त्यांच्या पत्नी तथा अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी स्वीकारला. शाल-श्रीफळ, समई आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांच्या मांदियाळीत या महोत्सवाला प्रारंभ झाला.
स्टोरी टेलर पुस्तकाचे प्रकाशन
दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या स्टोरी टेलर या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री डॉ. सावंत व अभिनेत्री निवेदिता सराफ यांच्या हस्ते करण्यात आले. या पुस्तकाविषयी अहिरे म्हणाले की, आपण 60 चित्रपटांचे चित्रिकरण केले, परंतु चित्रपट कसा बनतो. त्यावेळचा उत्साह किंवा धोके काय असतात, याचे वर्णन या पुस्तकात आहे. 12 चित्रपटांचा अनुभव आपण या पुस्तकातून मांडला आहे, असेही त्यांनी सांगितले.
मी पुन्हा येईन!
‘अशोकमामा आले असते तर त्यांचे भाषण ऐकणे आवडले असते’, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले. यावर ‘पुढील वर्षी ते निश्चित येतील’, असे आश्वासन निवेदिता सराफ यांनी दिले. त्यावर ‘पुढील वर्षी पुरस्कार नसला तरी, मीपण पुढील वर्षी येईन’, असे मुख्यमंत्र्यांनी म्हणताच सभागृहात हशा पिकला.
ओटीटीवर गोव्यातील कलाकारांना स्थान
ओटीटी प्लॅटफॉर्म व गोवा यांचे नाते निर्माण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. गोव्यात जोरदारपणे चित्रिकरण व्हावेच, शिवाय येथील कलाकारांना ओटीटीवर संधी देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी गोमंतकीयांची पाठिंब्याची नितांत गरज असल्याचे मत अभिनेता पुष्कर श्रोत्री यांनी व्यक्त केले.
कलाकारांची मांदियाळी :
अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, मृण्मई देशपांडे, निना कुलकर्णी, ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, मिलिंद गुणाजी, जितेंद्र जोशी, ज्येष्ठ दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्यासह अनेक दिग्गजांची मांदियाळी उद्घाटन समारंभात पाहावयास मिळाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.